सबलीकरण योजनेतील लाभार्थ्यांना
अन्य योजनांचे लाभ द्यावेत
- पियुष सिंह
अमरावती, दि.9: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभीमान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना
शेतीशी निगडीत अन्य योजनांचे लाभ देण्यात यावेत, म्हणजे त्यांचे जीवनमान उंचावण्यास
मदत होईल, असे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाच्या
दक्षता व नियंत्रण विभागस्तरीय समितीची बैठक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आज झाली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त पियुष सिंह होते. विशेष पोलीस महानिरिक्षक
मकरंद रानडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत अनुसूचित जाती,
अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार विभागात दाखल झालेले गुन्हे, गुन्ह्यांचा
तपास आणि त्या संदर्भातील कारवाई, या प्रकरणातील अत्याचारग्रस्त व्यक्तींना देण्यात
आलेली मदत, रमाई घरकुल (आवास) योजना, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात आलेली
कामे, तसेच जिल्हा निधी मधून अपंगासाठी राबवण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला.
अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये
दाखल झालेल्या प्रकरणांचा तपास वेळेत पूर्ण व्हावा आणि दोषारोपपत्र दाखल करण्यास विलंब
होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, असे आयुक्तांनी सांगितले.
रमाई घरकुल योजनेतील मंजुरी
प्रलंबीत राहणार नाही, याबाबत काळजी घेण्याची सुचना देवून त्यांनी कर्मवीर दादासाहेब
गायकवाड सबळीकरण योजनेत शेतजमीन दिल्यानंतर संबंधित लाभार्थ्यास शेतीशी निगडीत विविध
वैयक्तिक योजनांचा लाभ दिला जावा, म्हणजे लाभार्थ्याला
उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देत त्याचे जीवनमान उंचावण्याचा हेतू साध्य होवू शकेल,
असे त्यांनी सांगितले. याबाबतीत आजवर झालेल्या प्रयत्नांची आणि त्यानूसार देण्यात आलेल्या
लाभाची माहिती संकलीत करण्यास त्यांनी सांगितले.
या बैठकीला विभागातील सर्व
जिल्ह्यातील सामाजिक न्याय, पोलीस आणि अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे
सुत्रसंचालन प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांनी केले व माहिती सादर केली.
****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा