गुरुवार, १ ऑक्टोबर, २०२०

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 1 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या दहा विद्यार्थ्यांना परदेशातील पदवी आणि पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीचा लाभ मिळणेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

विहित नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे उपलब्ध आहे. दि. 20 ऑक्टोबर, 2020 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे सादर करावेत, असे आवाहन अमरावती येथील आदिवासी विकासचे शिक्षण सहायक आयुक्त पी. पी. पंडीतकर यांनी केले आहे.

****

आयआयएचटी बरगढ येथील प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

 

आयआयएचटी बरगढ येथील

प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ

 

अमरावती, दि. 1 : बरगढ (ओडिशा) येथील आयआयएचटी येथील प्रथम सत्राकरिता प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. इच्छुकांना आता दि. 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करता येऊ शकतील.

केंद्र शासनाच्या भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2020-2021 या शैक्षणिक सत्राकरीता तीन वर्षीय (सहा सत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडिशा) करीता आर्थिक दुर्बल घटकातील राखीव उमेदवाराकरीता प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर, सोलापूर, मुंबई, औरंगाबाद यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज दि. 12 ऑक्टोबर 2020 पर्यंत मागविण्यात येत आहे. प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in येथे उपलब्ध आहे. तसेच सदर अर्जाचा नमुना सर्व प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग  यांचे कार्यालयात देखील उपलब्ध आहे.

विदर्भातील 11 जिल्ह्यातील पात्र आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यानी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर अनुषांगिक माहिती प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर प्रशासकीय इमारत क्रमांक 2, आठवा माळा, बी-विंग, सिव्हिल लाईन, नागपूर-440001, दुरध्वनी क्रमांक 0721-2537927 यांच्याकडून प्राप्त करुन घ्यावी, तसेच अर्जाचा नमुना आणि विहित पात्रता कार्यालयाचे नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे, असे वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त स. ल. भोसले यांनी कळविले आहे.

000000

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 1 : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 1 ते 15 ऑक्टोबर 2020 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणाऱ्या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी

शिष्यवृत्तीसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 30 : राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे व त्यासाठी शिक्षण देण्याची योजना या विभागाचे दि. 31 मार्च 2005 च्या शासन निर्णयानुसार आयुक्तालय स्तरावर राबविण्यात येत आहे. तसेच दि. 16 मार्च 2016 च्या या शासन निर्णयान्वये या योजनेचा लाभ मिळणेसाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा रु. 6 लक्ष पर्यंत वाढविण्यात आली आहे.

परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज दि. 18 ऑक्टोबर, 2020 पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी जि. अमरावती येथे सादर करावे, असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी जि. अमरावती यांनी केले आहे.

****

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

मुख्यमंत्र्यांकडून अमरावती विभागाचा आढावा
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आवश्यकता पडल्यास जिल्हास्तरावर जम्बो कोविड सेंटर
घरोघरी सर्वेक्षणाची माहिती ॲप द्वारे तात्काळ भरावी


अमरावती, दि 26 : सध्या उपलब्ध असलेली आरोग्य यंत्रणा, मनुष्यबळ यावर कोरोनाविरुद्ध लढा द्यावयाचा आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यावरही मर्यादा आहेत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधेवर ताण येणार नाही, यासाठी राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचता येणार आहे. त्यामुळे ही मोहीम कोरोनाविरुद्ध निर्णायक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.



मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला. त्यात प्रामुख्याने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’, घरोघरी जाऊन करण्यात येणारे सर्वेक्षण आणि कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नागरिकांमध्ये करावयाच्या जनजागृतीबाबत आदीबाबत त्यांनी माहिती घेतली.
या बैठकीला अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, वाशिमचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यासह विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलिस महानिरिक्षक कृष्णकुमार मिना, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, एस राममूर्ती, जितेंद्र पापळकर, ऋषिकेश मोडक, एम. डी. सिंह आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, सध्या आहे त्या रुग्णसंख्यापेक्षा दुप्पट रुग्णसंख्या झाल्यास आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येणार आहे. त्यामुळे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करून कोरोनासह इतर आजाराचे रुग्ण शोधण्यात येत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. घरोघरी जाऊन करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाची माहिती ॲपद्वारे तात्काळ माहिती भरावी. त्यामुळे या सर्वेक्षणाची अंमलबजावणी दक्षतापूर्वक होत असल्याची खात्री होईल. मास्कचा वापर, परस्परांमध्ये अंतर राखणे, तसेच हात धुणे या सवयी आता अंगीकाराव्या लागतील. यामुळे कोरोनाचा प्रसार किंवा आळा घालण्यास मदत होईल.


राज्यातील जनजीवन सुरळीत आणण्यासाठी अनेक क्षेत्रे खुली करण्यात येत आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपली जबाबदारी कळण्यास मदत होईल. ही मोहीम नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कार्य करीत आहे. राज्यस्तरावरही या मोहिमे अंतर्गत जनजागृती करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यातील नो मास्क, नो सवारी या सारखे उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. अशा प्रकारचे उपक्रम राबवून नागरिकांना कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात खाटांची संख्या, ऑक्सीजन, औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत आहे. यानंतरही आवश्यकता पडल्यास जिल्हास्तरावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यासाठी तयारी करण्यात येईल. सध्या अनलॉक ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे काम करणारा तरुण वर्ग घराबाहेर पडेल. त्यांच्या माध्यमातून हा वायरस घरात जाऊ शकेल. त्यामुळे घरातील वयस्कर लोकांना याची लागण होऊ शकेल. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची सुरक्षा बाळगावी.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दिवाळीपर्यंत तरी प्रत्येक नागरिकाला खबरदारी घ्यावी लागेल. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचे सैनिक होऊन कोरोनाविरुद्ध लढावे लागेल. शासनालाही आरोग्यविषयक सुविधा निर्माण करताना सीमारेषा आखावी लागेल. तसेच आवश्यक असलेल्या औषधे आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्यावे लागेल. सध्यातरी कोरोनाची लस उपलब्ध होण्याची कोणतीही शक्यता दिसून येत नाही. या लसी उपलब्ध झाल्यानंतरही त्याची परिणामकारकता किती असेल याबाबतही चर्चा होत आहे. तसेच लसीकरणाची मोहीम किती वेळ चालेल, याबाबतही विचार करावा लागणार आहे.
कोरोनाविरूद्धच्या या मोहिमेत आता प्रत्येक नागरिकांना आपली जीवनशैली बदलावी लागेल. मास्क, हात धुणे, अंतर राखणे यामुळे कोरोनाच्या प्रसाराला शाळा घालण्यास मदत होत आहे. त्यामुळे या त्रिसूत्रीचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने पुढाकार घ्यावा. नागरिकांना समजेल अश्या बोली भाषा आणि स्थानिक लोककलावंताच्या मदतीने ही मोहीम गावागावात पोहोचता येणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
           

        00000

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

सुसर्दा परीक्षेत्रातील वृक्षतोडीचा तपास सुरु

 

सुसर्दा परीक्षेत्रातील वृक्षतोडीचा तपास सुरु

अमरावती, दि. 22 : दिनांक 13 सप्टेंबर रोजी सुसर्दा परीक्षेत्रातील सुसर्दा वर्तुळातील चेंडो नियतक्षेत्रात क. नं. 1233 मध्ये अवैध वृक्षतोडीची घटना घडली. या अवैध वृक्षतोडीबाबत POR क्र. 525/17 दि. 13 सप्टेंबर 2020 जारी करण्यात आला आहे. अवैध वृक्षतोडीमध्ये एकुण 12 थुट आढळले आहे. या वृक्षाच्या थुटांवरील काही माल गुन्हेगार सोबत घेवून गेले व काही माल घटनास्थळीच असल्याचे चौकशी दरम्यान असे निदर्शनास आले. यावेळी घटनास्थळी पडलेला माल जप्त करण्यात आला असून हा माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी वनपरीक्षेत्र अधिकारी, सुसर्दाद्वारे करण्यात येत आहे. या अवैध वृक्षतोडी संबंधात उपवनसंरक्षक, मेळघाट (प्रादेशिक) वनविभाग, परतवाडा व सहाय्यक वनसंरक्षक, धारणी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील तपास सुरु आहे, असे उपवनसंरक्षक यांनी कळविले आहे.  

000000

 

 

 

 

शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०२०

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे वेळीच व्यवस्थापन करावे

 

शेतकऱ्यांनी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे

वेळीच व्यवस्थापन करावे

Ø  कृषि विकास अधिकारी यांचे आवाहन

 

अमरावती, दि. 11: जिल्ह्यात कपाशी पिकाखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पिकाची परिस्थिती चांगली आहे. तरी ही शेतकऱ्यांनी या वर्षी कपाशी पिकावरील गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन वेळीच करावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

            खरीप हंगाम 2020 मध्ये सद्यस्थितीमध्ये कपाशी पिक फुलोरा व बोंड धरण्याच्या अवस्थेत आहे. यावर्षी सुध्दा कपाशी पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र यांनी उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्यानुसार उपाययोजना कराव्यात. गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करण्याकरीता प्रती हेक्टरी 5 फेरोमन ट्रॅपचा वापर करणे, लाईट ट्रॅप लावणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, वेळीच डोमकळी नष्ट करणे, तसेच शिफारशीप्रमाणे किटकनाशकांचा वापर करणे, आदी उपयायोजना कराव्यात.

            मागील वर्षी खरीप हंगामात किटकनाशके फवारणीमुळे शेतकरी, शेतमजूरांना विषबाधा झाली. यावर्षीच्या फवारणीमुळे विषबाधा होवू नये, या करीता सावध राहून खबरदारी घेणे आवश्यक आहे. किटकनाशके खरेदी करताना पिकावर येणाऱ्या किडीकरीता शिफारशीनुसार किटकनाशकाची खरेदी परवानाधारक कृषी केंद्रातुनच करावी, किटकनाशके खरेदीचे पक्के बिल घ्यावे, खरेदी केलेल्या किटकनाशकाची फवारणी शक्यतो सकाळी व संध्याकाळी हवेच्या दिशेने करावी, संरक्षण किटचा वापर करुनच किटकनाशकाची फवारणी करावी, किटकनाशके विषारी असल्याने त्यांची हाताळणी करतांना सदैव दक्ष राहावे, शेतकरी किंवा शेतमजुराने उपाशीपोटी फवारणी करु नये, सलग दिवस सतत फवारणी करु नये, आजारी किंवा शरीराला जखम असल्यास अशा व्यक्तीने फवारणी करु नये, जे मजूर फक्त किटकनाशके फवारणीचे काम करताता त्यांनी आरोग्य विभागाकडून नियमित तपासणी करावी, फवारणी करतांना विषबाधा झाल्यास प्रथमोपचार करुन ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होवून उपचार करुन घ्यावे, किटकनाशके फवारणी करताना कृषी विभागामार्फत तालुकास्तरीय व गावस्तरीय तसेच शेतीशाळेकडून होत असलेल्या मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा, याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी कोवीड 19 चे संदर्भात दक्षता घेऊन बोंड अळी नियंत्रणाचे प्रभावी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, कृषी विभाग, अमरावती यांनी केले आहे.

00000

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी

अमरावती, 10 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती यांच्या शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत आय टी आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी व व्यवसाय व्यतिरिक्त (औरंगाबाद/पुणे येथे) कंपनीमध्ये काम करण्यास इच्छुक प्रशिक्षणार्थ्यांनी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र अमरावती येथे त्वरीत नोंदणी करावी. तसेच प्रत्यक्ष शिकाऊ उमेदवारी भरती मेळावे ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याचे संस्थेच्या प्राचार्य श्रीमती एम. डी. देशमुख यांनी कळविले आहे.

00000

एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कुल मध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड

 

एकलव्य मॉडेल रेसिडेंसियल स्कुल मध्ये

विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड

अमरावती, 10 : अमरावती विभागातील एकलव्य रेसिडेंसियल पब्लिक स्कुल चिखलदरा जि. अमरावती, सहस्त्रकुंड जि. नांदेड व बोटोणी जि. यवतमाळ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन स्पर्धा परिक्षेऐवजी मागील वर्षाच्या (शैक्षणिक वर्ष 2019-20) पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे निवड करण्यात येणार आहे, असे  आदिवासी विकास अमरावतीचे अपर आयुक्त श्री. विनोद पाटील यांनी माहिती दिली.

आदिवासी विकास अमरावती यांचे अधिनस्त येत असलेल्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 12 जिल्ह्यातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद, नगरपालीका व महानगरपालीकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सव शासनमान्य अनुदानित/विनाअनुदानीत प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यानी मागील शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्राच्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.

mtpss.org.in या लिंकवर ज्या जिल्ह्यातील ज्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र यापूर्वी भरलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी/पालकांनी/संबधीत शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची गुणपत्रिका वरील लिंकवर अपलोड करावी. याबाबत विद्यार्थ्यांस गुणानुक्रमे निवड झाल्यास आयुक्तालयाकडून एस.एम.एस. द्वारे कळवियात येईल, असे अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांनी कळविले आहे.

00000

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

विभागीय आयुकत कार्यालयात आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन

 




विभागीय आयुकत कार्यालयात

आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना अभिवादन

अमरावती, 7 : आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त संजय पवार यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. तसेच गजेंद्र बावणे, प्रमोद देशमुख यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नाझर श्री. पेठे यांच्याह अधिकारी- कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.