बुधवार, २१ जानेवारी, २०२६

विशेष लेख: ‘हिंद की चादर’ विशेषांकासाठी ‘हिंद की चादर’ धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम

विशेष लेख: ‘हिंद की चादर’ विशेषांकासाठी ‘हिंद की चादर’ धर्मस्वातंत्र्य व मानवतेचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम धर्म, सत्य आणि मानवतेसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे नववे शीख गुरु श्री गुरु तेग बहादूर सिंह जी यांचे बलिदान भारतीय इतिहासात अजरामर आहे. “हिंद की चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर जी हे केवळ शीख समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण भारतवर्षातील धर्मस्वातंत्र्याचे महान रक्षक होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शीख समाज, सिंधी समाज, बंजारा समाज आणि लुबाणा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती येथे भव्य “हिंद की चादर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि. 23 नोव्हेंबर रोजी अमरावतीतील राजकमल चौक येथे झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्लोक मेहला नववाच्या पठणाने झाली. त्यानंतर भावपूर्ण शबद कीर्तन सादर करण्यात आले. उपस्थित जनसमुदायाला गुरु तेग बहादूर जी यांच्या जीवनकार्याचा, त्यागाचा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा इतिहास सविस्तरपणे सांगण्यात आला. गुरु तेग बहादूर जी – धर्मस्वातंत्र्याचे महान रक्षक गुरु तेग बहादूर सिंह जी (1621–1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांनी जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात उभे राहत काश्मिरी पंडितांच्या धर्मरक्षणासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांनी कोणत्याही एका धर्मासाठी नव्हे, तर सर्व धर्मांच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. दिल्लीतील चांदणी चौक येथे त्यांनी दिलेले बलिदान आजही मानवतेचा, सहिष्णुतेचा आणि धैर्याचा सर्वोच्च आदर्श मानले जाते. अमरावती येथील या ऐतिहासिक कार्यक्रमाला खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, डीसीपी श्री गणेश शिंदे, (गुरुद्वारा गुरुसिंग सभाचे अध्यक्ष,) अमरजोत सिंग जग्गी, (गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभाचे कार्यकारी अध्यक्ष,) रविद्रसिंग सलुजा, (मुख्य संपादक, प्रतिदिन अखबार) नानक आहुजा, (पूज्य पंचायत, कावर नगर) अॅड. वासुदेव नवलानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा एक विशेष भाग म्हणून विशेषतः तयार करण्यात आलेल्या प्रचार वाहनाला जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले. यावेळी संजिता महापात्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती, यांची उपस्थिती होती. “हिंद की चादर” हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम नसून, तो समाजात ऐक्य, सहिष्णुता आणि इतिहासाबद्दलची जाणीव निर्माण करणारा व्यापक प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे विशेष कौतुक करावे लागेल. नागपूर येथे होणाऱ्या “हिंद की चादर” कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी विविध समन्वय बैठकांचे आयोजन करून प्रशासन व समाज यांच्यात उत्कृष्ट समन्वय साधला. अमरावती येथे आयोजित “हिंद की चादर” कार्यक्रमाने गुरु तेग बहादूर जी यांच्या विचारांना नवसंजीवनी दिली. धर्मस्वातंत्र्य, मानवता आणि सत्यासाठी उभे राहण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून जनतेला मिळाली. विविध समाजघटकांचा सहभाग आणि शासनाचे सक्रिय सहकार्य यामुळे हा उपक्रम एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी पर्व ठरला. गुरु तेग बहादूर जी यांचा संदेश आजही तितकाच समर्पक आहे — “सर्व धर्मांचा सन्मान करा, अन्यायाविरुद्ध उभे रहा आणि मानवतेचे रक्षण करा.” लेखक: डॉ. निक्कू खालसा सचिव, गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा, अमरावती संकलन- जिल्हा माहिती अधिकारी अमरावती.

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात

नांदेड, दि. २०: हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गौरवशाली इतिहासाची, अतुलनीय बलिदानाची व समाजहितासाठी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने नांदेड येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्हाभरातील शाळांमध्ये चित्रकला, वक्तृत्व, गायन व निबंध अशा चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. शालेय व तालुकास्तरावरील निवड प्रक्रियेनंतर प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पाठविण्यात आले होते. नांदेड येथील गुरु ग्रंथसाहेबजी भवन येथे या जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. या स्पर्धांचे कामकाज जिल्हा निवड समिती यांच्या देखरेखीखाली पार पडले. समितीमध्ये डॉ. अमोल निळेकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, शिक्षण विस्तार अधिकारी रोहिदास बस्वदे यांचा समावेश होता. तसेच सचखंड पब्लिक स्कूलचे प्राचार्य अनिल कौर खालसा यांनी गुरु ग्रंथसाहेबजी भवन व आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. या स्पर्धेतून निवड झालेल्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ०००

नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी “हिंद दी चादर”

नांदेड #नांदेड येथे दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी “हिंद दी चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी शहरातील विविध ठिकाणी सेवा स्टॉल्सची उभारणी करण्यात येत आहे. या सेवा स्टॉल्सवर भाविकांसाठी चहा, पाणी, नाश्ता, फलाहार आदी सुविधा निःशुल्क स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सेवाकार्यासाठी विविध सेवाभावी संस्था, व्यापारी व व्यावसायिक आस्थापना, उद्योजक, शासकीय कार्यालये, बँकिंग क्षेत्र तसेच सेवा देण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी नोंदणी केली आहे. अधिकाधिक भाविकांना उत्तम सेवा देता यावी यासाठी आणखी जास्तीत जास्त संस्था व नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे. शिख पंथाचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमानिमित्त नांदेड शहर व पंचक्रोशीतील गावकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळावा, यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी लंगर साहिब गुरुद्वारा येथे भेट देऊन बाबा बलविंदरसिंगजी यांच्याशी चर्चा केली. #हिंददीचादर #गुरूतेगबहादुर

‘हिंद दी चादर’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन सज्ज -जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, दि. २० :- श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी असरजन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ५२ एकर मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यासह अनेक मंत्री, संत-महंत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली. कार्यक्रमाच्या अनुषंगाने मैदानावर युद्धपातळीवर काम सुरू असून तयारी अंतिम टप्प्यात आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून, मैदानालगत दोन भव्य टेन्ट सिटी उभारण्यात आल्या आहेत. एका टेन्ट सिटीत सुमारे १४ हजार भाविकांची निवास क्षमता असून, यासोबतच शहरातील मंगल कार्यालये व शाळांमध्येही निवास व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रमस्थळी स्वच्छता, स्वयंसेवक व्यवस्था, विविध प्रकारचे मोफत सेवा स्टॉल्स, तसेच मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ५० हजार नेत्र तपासणी व विशेष कर्करोग तपासणी स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. भाविकांसाठी भव्य लंगर व्यवस्था करण्यात आली असून, याचा लाभ सुमारे १० लाख भाविकांना घेता येणार आहे. निवास, भोजन, वाहतूक, आरोग्य व सुरक्षा याबाबत सर्व विभाग समन्वयाने काम करीत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आतापर्यंत करण्यात आलेल्या व पुढील कालावधीत राबविण्यात येणाऱ्या प्रचार–प्रसिद्धी उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. 00000

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा – अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

शहीदी समागम कार्यक्रम जागतिक स्तरावर नेण्यासाठी समन्वयाने काम करा – अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमाची आढावा बैठक नांदेड, दि. २० :- ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम कार्यक्रम नांदेडपुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर पोहोचावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने, काटेकोर नियोजनासह जबाबदारीने काम करावे, असे निर्देश नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. नांदेड येथे होणाऱ्या या शताब्दी वर्ष कार्यक्रमाच्या आयोजनाचा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्स) सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, विभागीय माहिती उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, कार्यक्रमस्थळी पुरेसे पिण्याचे पाणी, स्वच्छ व पर्याप्त शौचालय व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी. कार्यक्रमाची प्रचार–प्रसिद्धी व्यापक प्रमाणात करण्यात यावी. स्थानिक स्तरावर होणाऱ्या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग आवश्यक असून सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया व मुद्रित माध्यमांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जावी, असेही निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती व प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी शाळा स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून त्याची माहिती पोर्टलवर अपलोड करावी. तसेच सिनेमागृहांमध्ये भक्तिगीत प्रसारित करणे, प्रत्येक जिल्ह्यात होर्डिंग्ज लावून कार्यक्रमाचा संदेश पोहोचवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्य कार्यक्रमास महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना सहज सहभागी होता यावे, यासाठी पार्किंग क्षेत्रापासून कार्यक्रमस्थळापर्यंत योग्य वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. 0000  

मंगळवार, २० जानेवारी, २०२६

सत्य, सहिष्णुता आणि त्यागाचा दीपस्तंभ : गुरु तेग बहादुर साहिब

सत्य, सहिष्णुता आणि त्यागाचा दीपस्तंभ : गुरु तेग बहादुर साहिब
शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब जी (एप्रिल 1621 – नोव्हेंबर 1675) यांनी अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात निर्भयपणे लढा देत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. सत्य, धर्म, सहिष्णुता आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानामुळे त्यांना ‘हिंद दी चादर’ म्हणून गौरविण्यात आले.

महाटिईटी 2025 चा अंतरिम निकाल जाहिर • निकाल http://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध

अमरावती दि. 20 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-2025) या परीक्षेतील पेपर क्रमांक एक व पेपर क्र. दोन चा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार परीक्षार्थी च्या लॉगिन मध्ये ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2025 परीक्षेचे आयोजन रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले होते. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET-2025) पेपर क्रमांक 1 व पेपर क्र. 2 ची अंतिम उत्तरसूची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर 12 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पेपर क्रमांक एक व पेपर क्र. दोन साठी प्रविष्ट झालेल्या परीक्षार्थींना अंतरिम निकाल दि. 16 जानेवारी रोजी http://mahatet.in या संकेतस्थळावर उमेदवार/ परीक्षार्थ्यांचा लॉगिनमध्ये ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल. अंतरिम निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करावयाची असल्यास अथवा त्रुटी/आक्षेप http://mahatet.in या संकेतस्थळावर 21 जानेवारी, सायंकाळी 6 वाजेपर्यंत उमेदवार/परीक्षार्थींना लॉगिन मधून ऑनलाईन पद्धतीने आक्षेप नोंदविता येईल. अन्य मार्गाने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची संबंधित सर्व उमेदवार परीक्षार्थींनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत करण्यात आले आहे.

गुरु तेग बहादूर साहिबजींच्या 350 व्या शहादत सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण

'श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद दी चादर” हा भव्य व ऐतिहासिक कार्यक्रम 24 आणि 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याचे निमंत्रण केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांना राज्यस्तरीय समागम समिती सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिले. नवी दिल्ली येथे राज्यस्तरीय समागम समितीच्या (महाराष्ट्र राज्य) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सदिच्छा भेट घेऊन निमंत्रण दिले. केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी 25 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले. यावेळी पोहरादेवीचे महंत बाबुसिंग महाराज (सहअध्यक्ष), समन्वय समितीचे अध्यक्ष रामसिंग महाराज, नांदेड येथील गुरुद्वारा प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग, समन्वयक श्री. रामेश्वर नाईक, सहसमन्वयक जसपाल सिंग, सदस्य चरणदीप सिंग (हॅप्पीसिंग), सतिश निहलानी आणि सहनिमंत्रक तेजासिंग बावरी आदी उपस्थित होते. नांदेड येथील मोदी मैदान येथे आयोजित या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे २५ जानेवारीला दुपारी २ ते ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. तसेच, पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर धाम सरकार) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील निमंत्रण स्वीकारले असून ते २४ जानेवारीला या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. 0000

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी नांदेड सज्ज ! १० लाख भाविकांची मांदियाळी - विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

नांदेड नगरी एका ऐतिहासिक सोहळ्यासाठी सज्ज होत आहे. शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांचा ३५० वा 'शहीदी समागम' हा भव्य कार्यक्रम येत्या २४ आणि २५ तारखेला पार पडणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक या सोहळ्यासाठी नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. सूक्ष्म नियोजन आणि विविध समित्या कार्यक्रमाच्या दृष्टीने प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले आहे. भाविकांच्या सोयीसाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत. यात बुटांच्या व्यवस्थेपासून ते भोजनापर्यंतच्या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. भाविकांसाठी ८ ठिकाणी अखंड 'लंगर' (महाप्रसाद) सुरू राहतील. तसेच, त्यांच्या निवासाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रम ठिकाणी आरोग्य शिबिरे उभारण्यात आली आहेत. यासोबतच शासकीय योजनांचे आणि विविध उद्योजकांचे स्टॉल्सही उपलब्ध असतील. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही नांदेडमध्ये येतील. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही कडेकोट तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाचा अल्पसंख्याक विभाग या कार्यक्रमासाठी 'नोडल एजन्सी' म्हणून काम पाहत आहे. हा कार्यक्रम एका समाजापुरता मर्यादित नाही. यात लबाना, बंजारा,सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल आदींसह आणि इतर सर्व समुदायांचे लोक मोठ्याप्रमाणात सहभागी होत आहेत. जनतेचे योगदान महत्त्वाचे आजच्या धावपळीच्या जगात 'त्याग आणि सेवा' हीच खरी माणुसकी आहे. हा विचार जपण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे मराठवाडा आणि महाराष्ट्रातील जनतेसह देशभरातील जनतेने या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ज्यांना या महायज्ञात सेवा (स्वयंसेवक म्हणून) द्यायची आहे, त्यांनी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले. 00000

विशेष लेख - भारतीय संस्कृतीचा गौरव- श्री गुरु तेगबहादुर

विशेष लेख - भारतीय संस्कृतीचा गौरव- श्री गुरु तेगबहादुर साहिब ‘हिंद दी चादर’, म्हणजेच भारतभूमीचे कवच, अशी शीखांचे नववे गुरु तेगबहादुर साहिब यांची जगाला ओळख आहे. गुरु तेगबहादुर साहिब यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि श्री गुरु तेगबहादुर साहिबजी ३५० वी शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने नागपुरातील यशस्वी आयोजनानंतर आता नांदेड येथे २४ आणि २५ जानेवारी रोजी भव्य अशा आध्यात्मिक समागम कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. या निमित्ताने गुरु तेगबहादुर साहिब यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख: सत्याचा मार्ग आणि अहिंसेचे तत्त्व हे भारतीय विचारांचे एक अविभाज्य अंग आहे. हे तत्त्व केवळ शारीरिक हिंसा न करण्याइतपत मर्यादित नसून, अगदी मनातही कोणाबद्दल द्वेष बाळगू नये, असा त्याचा व्यापक अर्थ आहे. भारतीय संस्कृतीने जगाला विविधतेत एकता जोपासण्याचा मंत्रही दिला. ‘एकम सत् विप्रा बहुधा वदंती’ म्हणजेच सत्य एकच आहे, परंतु विद्वान लोक ते वेगवेगळ्या प्रकारे मांडतात, हे ऋग्वेदातील सूत्र भारतीय संस्कृतीतील धार्मिक सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा मूळ आधार मानले जाते. जिथे पाश्चात्य संस्कृती उपभोगावर भर देते, तिथे भारतीय संस्कृती त्याग आणि बलिदानाला महत्त्व देते. या मूळ विचारांचे स्मरण येथील जनसमुदायाला सातत्याने करून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी या भारतभूमीत जन्म घेतला. जगाला समता, सेवा आणि भक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या शीख समुदायाच्या तेजस्वी परंपरेत जन्मलेले गुरु तेगबहादुर साहिब हे अशाच महापुरुषांपैकी आहेत. गुरु तेगबहादुर यांचे बलिदान हा भारतीय मध्ययुगीन इतिहासातील समर्पणाच्या भावनेचा महत्त्वपूर्ण आणि शाश्वत अध्याय ठरतो. श्री गुरु नानकदेव असोत, श्री गुरु तेगबहादुर साहिब असोत की श्री गुरु गोविंद सिंह साहिब असोत, या साऱ्या महापुरुषांनी परकीय जुलूमशाहीच्या काळात भारतभूमीतील जनतेचे स्वत्व, आत्मसन्मान जागविण्याचे तसेच दिशाहीन समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे श्री गुरु तेगबहादुर साहीब यांचे स्मरण झाले की आजही त्यांचे विचार आणि मानवतेसाठी त्यांनी दिलेल्या बलीदानाचा इतिहास डोळ्यापुढे सरकतो. जन्म आणि पार्श्वभूमी गुरु तेगबहादुर साहिब यांचा जन्म १६२१ मध्ये अमृतसर येथे शीखांचे सहावे गुरु श्री हरगोविंद साहिब यांच्या घरी झाला. गुरु हरगोविंद साहिब यांच्या पाच पुत्रांपैकी ते धाकटे होते. ते अध्यात्मिक रंगात रंगलेले, अंतर्मुख आणि मौनप्रिय होते. गुरुपदाच्या गादीची जबाबदारी स्वीकारल्यावर गुरु तेगबहादुर साहिब यांनी शीख समाजाला संघटित करण्याचे प्रयत्न सुरु केले. १६६५ च्या सुमारास त्यांनी आनंदपूर नावाचे स्थळ वसवले. पुढे ते ‘आनंदपूर साहिब’ म्हणून प्रचलित झाले. शीख धर्मातील अत्यंत पवित्र अशा स्थळांपैकी ते एक मानले जाते. गुरु तेगबहादुर साहिब यांनी तत्कालीन बंगाल, बिहार, आसामसह देशातील अनेक भागांना भेटी देऊन आपल्या विचारांचा प्रचार–प्रसार केला. १६६६ मध्ये पाटणा (पाटणा साहिब) येथेच त्यांच्या घरी गुरु गोविंदसिंह यांचा जन्म झाला. ते शीखांचे दहावे गुरु होत. साहित्य, उपदेश आणि आध्यात्म गुरु तेगबहादुर साहिब हे केवळ धर्मगुरुच नव्हते, तर ते उत्तम साहित्यिक आणि रचनाकारही होते. त्यांनी आपल्या अनेक रचनांच्या माध्यमातून शीख तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. सहज सोप्या भाषेसह त्यांचा भावप्रवाह अतिशय सशक्त आहे. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू प्रामुख्याने वैराग्य, नाम ‘सिमरन’ (देवाचे स्मरण) आणि जीवनातील नश्वरता हाच ठरतो. त्यांचे विवेचनाचे विषयही धार्मिक, तत्त्वमिमांसक आणि जीवनातील क्षणभंगुरता दर्शवणारे आहेत. गुरु तेगबहादुर साहिब यांच्या रचनांना गुरु ग्रंथ साहिबमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यांच्या रचनांना सामान्यतः ‘शबद’ किंवा भजन म्हटले जाते. ज्यांत ईश्वर, मानवी संबंध, सेवा, मन–शरीर, मृत्यु, प्रतिष्ठा आणि मानवी स्थिती यांसारख्या विषयांचा व्यापक आवाका आढळून येतो. संघर्षाचा कालखंड गुरु तेगबहादुर सिंह साहीब यांच्या जीवनकार्याचा हा कालखंड भारतीय इतिहासातील अत्यंत आव्हानात्मक असा काळ मानला जातो. परकीय आक्रमकांनंतर दाखल झालेल्या तत्कालीन शासकांची सत्ता भारताच्या बऱ्याच भागात स्थिरावली होती. या सत्तेच्या कट्टरतेचा आणि आक्रमक विस्ताराचा असा काळ होता. मध्ययुगातील हाच काळ तत्कालीन शासकांच्या जुलमी राजवटीचाही मानला जातो. सत्ताधीश हे धार्मिकदृष्ट्या संकीर्ण आणि अत्यंत कडव्या मनोवृत्तीचे होते, असे इतिहास सांगतो. त्यामुळे स्वाभाविकपणे अन्य समुदायांसाठी हा काळ अतिशय खडतर आणि अस्थिरतेने परिपूर्ण असा काळ मानला जातो. अशा या प्रतिकूल परिस्थितीत गुरु तेगबहादुर यांनी अत्याचाराचा प्रतिकार अत्याचाराने नव्हे तर त्यागाने केला. सर्वोच्च बलिदान गुरु तेगबहादुर साहीब यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा अध्याय म्हणजे त्यांचे सर्वोच्च बलिदान. साधरणतः १६७५ सालचा तो काळ होता. सत्ताधाऱ्यांच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या काश्मिरी पंडिताचे काही प्रतिनिधी आनंदपूर साहीब येथे गुरु तेगबहादुरांकडे मदत मागण्यासाठी आले होते. या लोकांना सक्तीने धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात होते. काश्मिरी पंडितांची ही व्यथा ऐकून गुरु तेगबहादुर साहीब अतिशय धीरगंभीर झाले होते. अशा संकटापासून वाचण्यासाठी आता बलिदानाची गरज आहे, असे उत्तर त्यांनी यावर दिले. ‘जर आमच्या गुरुंनी धर्मांतर केलं, तर आम्ही सर्व स्वतःहून तुमचा धर्म स्वीकारू’, असे सत्ताधीशाला जाऊन सांगण्याची सूचना त्यांनी काश्मिरी पंडितांना केली. पुढे गुरु तेगबहादुर साहीब हे दिल्लीला पोहचल्यावर बादशहाने त्यांना कैद केले. त्यांना प्रलोभने दाखविली गेली, धर्म स्वीकार करण्यास सांगण्यात आले. गुरुजींनी या दोन्ही गोष्टी नाकारल्या. त्यांच्या समक्षच त्यांच्या शिष्यांना शहीद करण्यात आले. पण, गुरु तेगबहादुर साहीब हे आपल्या निश्चयापासून अजिबात ढळले नाहीत. त्यांनी बादशहाचे आदेश मानण्यास नकार दिला. संतापलेल्या बादशहाने त्यांचे शीर धडावेगळे करण्याचे आदेश दिले. तो आदेश अखेर अंमलात आणला गेला. गुरु तेगबहादुर साहीब यांचे सर्वोच्च बलिदान ज्या ठिकाणावर झाले, ते ठिकाण आज दिल्लीच्या चांदणी चौक परिसरातील ‘सीस गंज साहिब’ गुरुद्वारा म्हणून ओळखले जाते. ‘जर माझ्या बलिदानानं निरपराध लोकांच्या श्रद्धेचं रक्षण होणार असेल, तर तेच माझं सर्वोच्च धर्मकार्य ठरेल’, असा संदेश त्यांनी त्यावेळी दिला होता. हे शब्द केवळ त्यागाचे नव्हते, तर संपूर्ण मानवतेच्या रक्षणाची घोषणा करणारे होते. धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेची सर्वोच्च मूल्य जपण्यासाठीच त्यांनी हा निर्णय घेतला होता. ‘सीस गंज साहिब’ गुरुद्वारा आजही त्यांचा त्याग आणि मानवतेप्रती समर्पणाची साक्ष देतो. मानवतेचा संदेश शीखांचे गुरु असूनही गुरु तेगबहादुर साहीब यांनी देशाचे रक्षण करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले होते. ते सर्व धर्मांना समान मानणारे होते. सर्व मानव हे एकाच परमात्म्याचे पूत्र आहेत, अशीच त्यांची शिकवण होती. धर्म म्हणजे कर्तव्य आणि आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे, हा संदेश त्यांनी समस्त मानवजातीला दिला आहे. त्यांचा हा संदेश आजही प्रासंगिक ठरतो. रमाकांत दाणी, प्रसिद्धी समन्वयक, संचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूर. 00000