औद्योगिक
क्षेत्रातून सर्वात जास्त रोजगार निर्मिती
-पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
अमरावती, दि. 22 : लोकांचे जीवनमान उंचावण्याची क्षमता औद्योगिक क्षेत्रात आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करण्याचे राज्याने ठरविले आहे. राज्याच्या प्रयत्नांमुळे आज सर्वाधिक रोजगार निर्मिती औद्योगिक क्षेत्रातून झाली असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी केले.
आज येथील औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात नव्या उद्योग भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषद सदस्य विजय काळमेघ, नगराध्यक्ष ॲड. कमलकांत लाडोळे, नगरसेवक राजेश शाहू, अजय गोंडाणे, औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता राजेश जांजड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता श्री. नवघरे, उद्योजक संघटनेचे अध्यक्ष किरण पातूरकर, प्रकाश पुंड आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे-पाटील म्हणाले, राज्यात औद्योगिक विकास महामंडळाने दिड लाख हेक्टर जमिन संपादित केली आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सुमारे 364 औद्योगिक क्षेत्र कार्यरत आहे. महामंडळाकडे असणाऱ्या पाच धरणांमधून सुमारे दहा हजार कोटी रूपयांची ठेव जमा करण्यात आली आहे. समृद्धी महामार्ग, हायब्रीड ॲन्युटीच्या माध्यमातून होणारे रस्ते यामुळे विकासाचा वेग वाढला आहे. नांदगाव पेठ येथील वस्त्रोद्योग पार्कमध्ये 18 उद्योग सुरू झाले आहे. यातून सुमारे दहा हजार कोटींची गुंतवणुकीतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष 50 हजार रोजगार उपलब्ध झाला आहे.
उद्योग सुरू करण्यासाठी महामंडळाकडून पुरक वातावरण तयार करण्यात आले आहे. जागा, पाणी, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी आदी उपाययोजना करण्यात आल्या आहे. या प्रयत्नांमुळे पारदर्शकता येण्यास मदत झाली. औद्योगिक क्षेत्रात बदल घडविण्याचे काम राज्य शासनाने केले आहे. महामंडळाच्या पाठीशी शासन उभे राहिल्याने हा बदल घडला आहे. फुड पार्क, आयटी पार्क, वस्त्रोद्योग पार्क अशा विविध वसाहती उभ्या राहिल्याने औद्योगिक विकास झाला आहे. उद्योजकांना सर्वच सेवा एका ठिकाणी मिळावी, यासाठी उद्योग भवनाची इमारत उभी राहणार आहे. ही इमारती गतीने पूर्ण करण्यात येईल, असे श्री. पोटे-पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आमदार श्री. बुंदिले, श्री. पातूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. जांजड यांनी प्रास्ताविक केले. सुधाकर फुके यांनी आभार मानले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा