मंगळवार, २६ फेब्रुवारी, २०१९

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अमरावती विभागात पावणेदहा लाख कुटुंबांना लाभ


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना


अमरावती विभागात पावणेदहा लाख कुटुंबांना लाभ


            अमरावती, दि. 26 :  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभानंतर लाभ वितरणाच्या कार्यवाहीने गती घेतली असून, अमरावती महसूल विभागातील पाचही जिल्ह्यातील एकूण 9 लाख 71 हजार 953 शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत. 
            विभागातील 7 हजार 312 गावांत 16 लाख 98 हजार 397 खातेदार शेतकरी आहेत. योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी महसूल, कृषी व विविध विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या गतिमान कार्यवाहीनुसार विभागातील 7 हजार 298 गावांची माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार पात्र शेतकरी कुटुंबाची संख्या 9 लाख 71 हजार 953 आहे.
संकलित माहिती पोर्टलवर अपलोड करण्याच्या कामानेही वेग घेतला असून, 7 हजार 53 गावांतील  7 लाख 60 हजार 89 पात्र कुटुंबाची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आहे.
अशी आहे जिल्हानिहाय संख्या
पात्र लाभार्थी कुटुंबांची अमरावती जिल्ह्यातील 2 लाख 37 हजार 18, अकोल्यातील 1 लाख 15 हजार 762, यवतमाळमधील 2 लाख 11 हजार 29, बुलडाणा जिल्ह्यातील 2 लाख 78 हजार 13 आणि वाशिम जिल्ह्यातील 1 लाख 30 हजार 131 अशी संख्या आहे. 
कार्यवाहीसाठी प्रत्येक स्तरावर समित्या
            या योजनेच्या कार्यवाहीसाठी अमरावती विभागात विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुका व ग्रामस्तरीय संनियंत्रण समित्या गठित करून ग्रामपातळीवर माहिती संकलित करण्याची प्रमुख जबाबदारी तलाठ्यांवर  सोपविण्यात आली आहे. त्यांना सहकार्याची जबाबदारी ग्रामसेवक आणि कृषीसेवकांवर आहे. त्यानुसार गत दोन आठवड्यात तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, सूचना केंद्राचे अधिकारी समन्वयाने माहिती संकलनाचे व ती वेळेत अपलोड करण्याचे काम करत आहेत.  शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक ही माहिती प्राप्त करुन विहित नमुन्यात नोंद करुन पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात येते.   
        योजनेत अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्रति शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य तीन टप्प्यांत मिळणार असून, पहिल्या टप्प्यातील दोन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या कार्यवाहीने वेग घेतला आहे.  
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा