शनिवार, २३ फेब्रुवारी, २०१९








मेळघाट अॅक्शन प्लान राबवून बालमृत्यूचे प्रमाण रोखणार
-अमरावतीत झालेल्या सर्व विभागीय बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची ग्वाही
* दुर्गम ठिकाणी तज्ज्ञांचे शिबीर घेणार
*आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधांवर भर
* संपर्क यंत्रणा, दळणवळण बळकट करणार
अमरावती, दि. २३ : मेळघाटातील दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचण्यास रस्ते, संपर्क यंत्रणा आणि वीज सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन कुपोषण, मातामृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यासाठी सर्व विभागांची मदत घेण्यात येईल. यासाठी मेळघाट अॅक्शन प्लान राबवून मृत्यूचे प्रमाण रोखण्यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मेळघाट परिसराचा दौरा आटोपून आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात श्री. शिंदे यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर प्रदीप व्यास विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री, आरोग्य अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, सहसंचालक डॉ. अर्चना पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल कर्डीले आदिंसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
आरोग्यमंत्री श्री. शिदे म्हणाले, मेळघाटात आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे. मात्र पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचे आहे. तसेच रुग्ण आणि आरोग्य यंत्रणेतील संपर्क हा देखिल मोठा प्रश्न आहे. संपर्क होत नसल्याने कमी अंतरावरील रुग्णांना देखिल आरोग्य सुविधा पूरविण्यात अडचणी येत आहे. यावर मोबाईल किंवा वायरलेस यंत्रणा उभारण्याबाबत विचार व्हावा. दुर्गम भागात तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मिळावी यासाठी ग्रामीण रुग्णालयस्तरावर शिबीर घेण्यात येतील. पावसाळ्याच्या काळात शिबिराचा लाभ होत असत्याने त्या ठिकाणी डॉक्टरांच्या राहण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 
मेळघाटात आवश्यक तेवढ्या रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच महिला आणि बालकांना कुपोषणापासून रोखण्यासाठी पूरक आहार देण्यात यावा. आदिवासी भागातील रुग्ण बिगर आदिवासी भागात उपचारासाठी गेल्यास त्याला आदिवासी भागातील लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. दुर्गम भागात जिथे संपर्क यंत्रणा नाही तेथे रुग्णवाहिकेला बोलावण्यासाठी वनविभागाच्या संपर्क यंत्रणेचा वापर करावा  अशा सूचनाही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. या भागातील नागरिकांचे हिमोग्लोबीन प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी डोस देण्यात यावेत. दुर्गम भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी नेब्युलायझर, वार्मर आदींचे वाटप करण्यात आले आहे. आदिवासी रुग्ण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचावा यासाठी प्रमुख आदिवासी व्यक्तींची मदत घेतली जाणार आहे. तसेच आदिवासी कक्ष उभारून रुग्णांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.
मेळघाटातील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी श्री. शिंदे यांनी सुक्ष्म आढावा घेतला. आदिवासी, वन, आरोग्य, बांधकाम आदी विभागांच्या सहकार्याने दुर्गम भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. सर्व विभागांनी समन्वयाने कार्य केल्यास कुपोषण, माता आणि बाल मृत्यू रोखण्यास निश्चितच मदत होईल. धोरणांची अंमलबजावणी करतांना येणाऱ्या अडचणी मांडून त्या सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील. चांगले कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास आरोग्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिला.
मेळघाटात 82 आरोग्यवर्धिनी केंद्र निर्माण करण्यात आले आहे. यातून त्याठिकाणी डॉक्टरांची सुविधा उपलब्ध होईल. पहिल्या टप्प्यात 60 आणि दुसऱ्या टप्प्यात 22 डॉक्टर उपलब्ध होतील. मेळघाटतील नागरिकांना उपलब्ध आरोग्यविषयक सुविधा माहिती व्हाव्यात यासाठी व्यापक जनजागृतीची मोहिम हाती घेण्यात यावी. यातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम हाती घेण्यात यावेत. यासाठी त्यांना समजेल अशा लोकभाषेत, सोप्या भाषेत पोस्टर, होर्डींग लावण्यात यावी. यासाठी एजन्सी नेमण्यात यावी.
          अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, आशा यांच्या मदतीने एकत्रित येऊन समन्वयाने कार्य केल्यास कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. मेळघाटात रस्त्यांचे जाळे कमी असल्याने याठिकाणी मोठी रुग्णवाहिकेपेक्षाबाईक ॲम्ब्युलंस प्रभावी ठरू शकतील. यासाठी आवश्यकत तेवढ्या बाईक ॲम्ब्युलंस उपलब्ध करून देण्यात येतील, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा