जिल्ह्यात ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिके
निरामय जीवनासाठी योग आवश्यक
-
जिल्हाधिकारी शैलेश नवाल
अमरावती,दि. 21:
शरीर आणि मन या दोन्ही बाबी संतुलित ठेवण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. योगशास्त्रातून
आयुष्यात संयम व शिस्त येते. निरोगी व निरामय जीवन जगण्यासाठी योग कलेचा दैनंदिन आयुष्यात
समावेश करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग,
शिक्षण विभाग, भारत स्वाभिमान (न्यास) पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, जेसीआय
सेंच्युरियन व योग क्षेत्रात कार्यरत विविध संस्था यांच्या सहकार्याने विभागीय क्रिडा
संकुलात आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनानिमित्त योग प्रात्यक्षिके व साधनेचा कार्यक्रम
झाला, त्यावेळी ते बोलत होते.
विभागीय क्रीडा संकुलात आज योगदिनानिमित्त
आयोजित कार्यक्रमासाठी सकाळी साडेसहापासूनच शहरातील अनेक मान्यवर, व्यावसायिक, गृहिणी,
विविध शाळा- महाविद्यालयांचे विद्यार्थी आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची मोठी उपस्थिती
होती. सातच्या सुमारास संकुलातील सभागृहात योग प्रात्यक्षिकांना सुरुवात झाली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे जिल्हा समन्वयक व योगप्रशिक्षक
निरज अग्रवाल व त्यांच्या सहका-यांनी योग प्रात्यक्षिकांबद्दल मार्गदर्शन केले. योगाच्या अवलंबामुळे केवळ शारीरीकच नव्हे, तर मानसिक
कणखरपणा प्राप्त होतो व शांततेची अनुभूती मिळते, असे प्रशिक्षकांनी यावेळी सांगितले.
प्रात्यक्षिकांद्वारे शरीर व मन संतुलन, समूह साधनेतून निर्माण होणारा नाद यांचा एक
वेगळा अनुभव यानिमित्ताने सर्वांना घेता आला.
शहरात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ परिसर, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय
महाविद्यालय, श्री
शिवाजी विज्ञान महाविद्यालय, विद्याभारती महाविद्यालय, महर्षी
गुरुकुल योगसाधना केंद्र, जिजाऊ सभागृह, पतंजली योग केंद्र,
मोझरी गुरुकुंज, पोलीस मुख्यालय, एसआरपी कँप, मध्यवर्ती कारागृह परिसर, श्री संत गाडगेबाबा
समाधी मंदिर, भारतीय महाविद्यालय, समर्थ विद्यालय, सेंट फ्रान्सिस विद्यालय, एलआयसी
कार्यालय आदी विविध ठिकाणी योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. तालुका
मुख्यालयातही योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते, असे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव
यांनी सांगितले.
क्रीडा उपसंचालक श्रीमती प्रतिभा
देशमुख, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा