गुरुवार, २७ जून, २०१९

शेतकरी बांधवांनी खरिप हंगामाचे योग्य नियोजन करावे


शेतकरी बांधवांनी खरिप हंगामाचे योग्य नियोजन करावे

अमरावती, दि.27: यंदा मान्सुनचे आगमन लांबणीवर झाल्याने शेतकऱ्यांनी योग्य रित्या पिकाचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना सर्व प्रकारची पारंपारिक पिके 30 जुन पर्यंत घेता येतील त्यामुळे 75 ते 100 मिली मिटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. पिकांच्या अदलाबदलीवर भर देण्याबरोबर जास्तीतजास्त क्षेत्रावर आंतरपिक पध्दती राबवावी सोयाबीन व कापूस पिकांमध्ये तूर हे आंतरपिक घ्यावे. तुरीचे पिक ऊशीरा पर्यंत घेता येईल. प्रामुख्याने प्रमाणीत बियाण्यांचा वापर करावा. सोयाबीनचे सुधारीत जातीचे दोन वर्षापासून वापरलेले घरचे बियाणेही वापरण्यास योग्य ठरते. मात्र बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याप्रमाणे बियाणे मात्रा पेरणीसाठी वाढवावी. बियाण्यास पीएसबी व रॉयजोबीएक या सारख्या जैवीक खताची तसेच ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची प्रक्रीया करुनच पेरणी करावी. जनावरांसाठी चारा पिकांना स्थान द्यावे.ज्वारी, बाजरी व मक्याचा त्यात समावेश करावा.
शेतकऱ्यांनी वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या मुलभूत तत्वांवर भर देण्याची गरज आहे. यात एकात्मीक अन्नद्रव्य व्यवस्थापन, सेंद्रीय खताचा वापर,जैवीक खतांचा वापर व व्यवस्थापन या महत्वाच्या बाबींचे नियोजन करण्याची गरज आहे. रासायनिक खतावर भर देण्याऐवजी त्यांचा तंतोतत व काटेकोरपणे वापर करावा. दिवसेंदिवस जमिनीतील लोह व गंधकाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे तेव्हा या घटकांची शिफारस गरजेनुसार करावी. किड व रोगांसाठी प्रतिबंधक उपाय योजना करीता निबोंळी अर्काचा वापर करावा.पावसाच्या पाण्याचा थेंब अन थेंब जमिनीत जिरवण्याची गरज आहे, त्यासाठी जलसंधारण कामाअंतर्गत विहीर पुर्नभरण, नाल्याची कामे, बांधबंदिस्ती व चर खोदण्याची गरज आहे. त्यामुळे पाणी शेतातच मुरेल.
फळबागा व्यवस्थापनातर्गत संत्रा, मोंसबी, डाळींब बागेस नत्र, स्फुरद, पालाश व शेणखत प्रत्येक झाडास 5 टोपले देवून पाणी टाकावे. शेतकऱ्यांनी शेतातील बांधावरील,रस्तेच्या कडेवर व इतर ठिकाणी असलेल्या कडुनिंबाच्या वृक्षांखाली पडलेल्या निंबोळया त्वरीत गोळा करुन  स्वच्छ करुन वाळवून साठवणूक करावी व त्यांचा हंगामामध्ये फवारणीसाठी उपयोग करावा.
विभागात कृषि यांत्रिकीकरण याजनेअंतर्गत विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम आणि कोरडवाहू शेती विकास योजना इत्यादी योजनांच्या माध्यमातून व्यक्तिगत शेतकरी त्याचप्रमाणे शेतकरी गटांनी रुंद सरी वरंबा पध्दतीने लागवड करण्याकरीता बीबीएफ प्लँटर या सुधारीत कृषि अवजारांचा वापर करावा. बीबीएफ प्लँटर द्वारे रुंद सरी वरंबा पध्दतीने सोयाबीन लागवड केलेल्या क्षेत्रात एकरी सरासरी 4 ते 5 क्विंटल अतिरिक्त उत्पादन घेता येणे शक्य आहे. बीबीएफ प्लँटर द्वारे सोयाबीन पिकाची लागवड केल्यास हेक्टरी 20 किलो किमान बियाण्याची बचत होते. शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी करीता बीबीएफ प्लॅटर वापरण्यास प्राधान्य द्यावे.
शेतकरी बांधवानी कृषि कार्यालयाशी संपर्क साधून पिकांचे योग्य व्यवस्थापन व नियोजन करावे असे आवहन सुभाष नागरे, विभागीय कृषि सहसंचालक, यांनी केले आहे.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा