तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन
मेळावा
अमरावती, दि. 7 : अमरावती जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतून दहावी
(एस.एस.सी.) उत्तीर्ण झाल्यानंतर शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
वर्ष 2019-2020 च्या सत्राच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता
यावे, यासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचा मेळावा नुकताच 4 जून
रोजी शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे सपन्न झाला.
या मेळाव्यात शिक्षणाधिकारी
सौ. निलिमा टाके, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य
पी. एम. भंसाली, गटशिक्षणाधिकारी गणेश बोपटे, मुख्याध्यापक महासंघाचे उपाध्यक्ष श्री.
खंडागळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचे
समुपदेशन व मार्गदर्शन देण्यासाठी नागपूर अमरावती सहसंचालक तंत्र शिक्षण संचालनालय
व शासकीय तंत्रनिकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
रोजगाराच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाची कास धरणे अत्यंत आवश्यक असल्याचे
अधिव्याख्याता हेमंत जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले. पदविका प्रवेश प्रक्रियेविषयी
त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ. मोगरे यांनी
तंत्र शिक्षणाकरीता लागणारा खर्च हा अत्यल्प असून तंत्रशिक्षण प्राप्त पदविकाधारकांसाठी
नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
सहसंचालक डॉ. जाधव
म्हणाले की, शासनाच्या विविध योजनाद्वारे विद्यार्थ्यांना पदविका शिक्षण पूर्ण करता
येऊ शकते. उद्याच्या भारत निर्मितीसाठी तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थी वळावे, यासाठी शाळांच्या
मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. मेळाव्यात जमलेल्या सर्व
मुख्याध्यापकांना तंत्रशिक्षण घेण्याकरीता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे
शिक्षणाधिकारी श्रीमती टाके यांनी सुचविले. मेळाव्यास माध्यमिक शाळेचे 182 मुख्याध्यापक,
निवासी आश्रमशाळेचे 19 मुख्याध्यापक असे एकूण 201 मुख्याध्यापक उपस्थित होते.
मुख्याध्यापकांनी
विचारलेल्या शकांचे निरसन प्राचार्य मोगरे यांनी केले. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी
त्यांच्या शाळेतच तंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी नोंदणी (रजिस्ट्रेशन) आदी आवश्यक सुविधा
पुरविण्यात येईल. त्याचप्रमाणे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विनामुल्य सुविधा केंद्र उपलब्ध
करुन देण्यात आले आहे त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यास अभूतपूर्व
प्रतिसाद लाभला. कार्यक्रमामध्ये शासकीय तंत्रनिकेतन अमरावतीबाबत माहिती उत्तरवार यांनी
दिली. अमरावती विभागातील शासकीय तंत्रनिकेतन अचलपूरचे ठळक वैशिष्टये प्राचार्य पी.
एस. भंसाली आणि शासकीय तंत्रनिकेतन मूर्तिजापूरचे ठळक वैशिष्ट्ये चतुर मॅडम यांनी सांगितले.
सागर पासेबंद यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. सुधीर बाजड,
उपप्राचार्य तसेच निकोसे, गावंडे, प्रान्जले, परघने आदीं शिक्षकवृंदानी व कर्मचाऱ्यांनी
विशेष मेहनत घेतली.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा