शुक्रवार, ७ जून, २०१९

प्रधानमंत्री पिक विमा योजना


प्रधानमंत्री पिक विमा योजना
मृग बहारासाठी पुनर्रचित हवामानवर आधारित फळपिक विमा योजना
अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत
सहभागी होण्याचे कृषी विभागाव्दारे आवाहन

अमरावती, दि. 7 : अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानवार आधारित विमा योजना सन 2019 या वर्षाकरीता मृग बहारातील अधिसुचित फळपिकांना लागु करण्यात आली आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन फळपिक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी विभागाव्दारे करण्यात आले आहे.
योजनेचा उद्देश :
नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकुल परिस्थतीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्पकतेत वाढ हे हेतु साध्य करणे आदी या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
मृग बहारामध्ये समाविष्ट पिके :
संत्रा फळपिक - वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यासाठी, मोसंबी- बुलडाणा, अमरावती, डाळींब- बुलडाणा, अमरावती, वाशिम, लिंबु- बुलडाणा, वाशिम, अकोला जिल्ह्यासाठी अशाप्रकारे मृग बहारामध्ये जिल्हानिहाय फळपिके समाविष्ठ करण्यात आली आहे.
विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता :
पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजने अंतर्गत राज्यात सन 2018 साठी सर्वसाधारणपणे राज्यस्तरीय पिककर्ज दर समितीने निश्चीत केलेल्या पीककर्ज दराप्रमाणे पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या योजनेंअतर्गत विमा हप्ता दर हा वास्तवदर्शी दराने आकारला जाणार आहे. तथापि शेतकऱ्यांना फळपिक निहाय प्रति हेक्टरी विमा संरक्षित रक्कमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम विमा हप्ता म्हणुन शेतकऱ्यांना भरावी लागेल.
यवतमाळ, अमरावती व वाशिम या जिल्ह्यासाठी बजाज अलायन्झ इन्शुरन्स कंपनी लि. पुणे- 400013 (टोल फ्री क्र- 18002095959), तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यासाठी एचडीएफसी एगों जनरल इन्शुरंस लि. पुणे 411001 (टोल फ्री क्र- 18002660700) या विमा कपंनींना नियुक्त करण्यात आले आहे.
योजनेचे वैशिष्ट्ये :
सदर योजना ही या आदेशान्वये अधिसुचित केलेल्या क्षेत्रातील फळपिकासाठी असेल. या पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकांसाठी बंधनकारक असुन बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित फळपिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपटीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असुन शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
जोखमीच्या बाबी -
योजनेत समाविष्ट अधिसुचित फळपिके, विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके), विमा संरक्षण कालावधी, विमा संरक्षित रक्कम, प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई रक्कम सहपत्र-2 मध्ये नमुद केल्याप्रमाणे राहील. मृग बहार 2019 साठी अधिसुचित फळपिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी खालील प्रमाणे निर्धारीत करण्यात आलेला असुन सदरचे निर्धारीत केलेले हवामान धोके लागु झाल्यानंतर संबंधित विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देय होईल.
प्रस्ताव सादर करण्याची मुदत -
कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हप्त्यासह प्रस्ताव सादर करण्याबाबत पुढीलप्रमाणे तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.  शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्ताची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधुन प्राथमिक सहकारी संस्था/बँक/आपले सरकार सेवा केंद्र/विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे/शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक संत्रा व लिंबु फळपिकासाठी 14 जुन, मोसंबीसाठी 1 जुलै, तर डांळिब फळासाठी 15 जुलै आहे.  
शेतकऱ्यांनी  (कर्जदार व बिगर कर्जदार) विमा हप्त्याची रक्कम इलेक्ट्रॉनिक पध्दतीने संबंधीत विमा कंपनीस हस्तांतरीत करणे व एकत्रीत विमा घोषणापत्रे (डिक्लरेशन) आणि विमा प्रस्ताव व्यापारी बँक/ग्रामीण बँक/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेकडून संबंधीत विमा कंपनीस सादर करण्याचा व पिकविमा योजनेच्या संकेतस्ळावर योजनेत सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांची माहीती नोदविण्याचा दिनांक मोसंबी फळपिकासाठी दि. 16 जुलै, संत्रा व लिंबु फळासाठी दि. 29 जुन तर डाळिंब फळपिकासाठी दि. 31 जुलै आहे. (योजनेतील शेतकरी सहभागाच्या अंतिम दिनांकानंतर 15 दिवसांच्या आत सहभागी व्हावे.)
विमाक्षेत्र घटक:
अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत अधिसुचित फळपिकांखाली एकुण 20 हेक्टर व त्यापेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या महसुल मंडळात योजना राबविण्यात येत आहे. संबंधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकाऱ्यांकडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार शासन निर्णयामध्ये अशी महसुल मंडळे समाविष्ट करण्यात आली आहेत.
यावर्षीच्या प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राज्यात सन 2019 मध्ये मृग बहाराकरीता अधिसुचित फळपिकांना लागु करण्याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा