शनिवार, ३० जानेवारी, २०२१



विभागीय आयुक्त कार्यालयात
मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली

अमरावती, दि. ३० : देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मे झालेल्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी विभागीय आयुक्त पीयूष सिंह, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसिलदार वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

राज्यमंत्र्यांकडून नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा आढावा- राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.

 

राज्यमंत्र्यांकडून नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा आढावा

नगरपंचायतीमधील विकासकामांसाठी पुढाकार घ्यावा




-         राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.

अमरावती, दि. 28 : नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींचा विकास करणे आवश्यक आहे. यासाठी नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी प्रयत्न करावा. नगरपंचायतीमधील विकासकामांसाठी पुढाकार घेऊन कामे करण्यात यावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.

आज येथील विश्रामगृहात राज्यमंत्री श्री. कडू यांनी नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचा आढावा घेतला. नगरपंचायतीच्या क्षेत्रात असणाऱ्या 258 पारधी कुटुंबाच्या घरापैकी 70 घरांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच इतर घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच वस्तीसुधार योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. पाणी पुरवठ्यासाठी जीवन प्रधिकरणाकडे पाठपुरावा करावा. तसेच चौदाव्या वित्त योजनेतून पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा. वस्तीसुधार योजनेतून रस्ते, नाल्यांचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. घरकुल पूर्ण करण्यासाठी रेतीचा प्रश्न येत आहे. यासाठी घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी अर्ज केल्यास त्याला पास देण्याची सुविधा दिली जाईल. गेल्या तीन वर्षांपासून अपंग कल्याणचा निधी वितरीत करण्यात आलेला नाही, हा निधी लवकरच वितरीत करण्यात येईल. स्मशानभूमीमध्ये विजेची सुविधा नसल्याने याठिकाणी तातडीने वीज पुरवठा करण्यात येईल, असेही श्री. कडू यांनी बैठकीत सांगितले.

00000

 

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 29  : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार  मुंबई पोलिस कायदा 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 29 जानेवारी  2021 ते 13 फेब्रुवारी 2021 पर्यत हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे अपर  जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.

                                         000000

 

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

पुनर्वसनाची कामे नागरिकांच्या सोयीने व्हावीत - राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

 








पुनर्वसनाची कामे नागरिकांच्या सोयीने व्हावीत

-         राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

अमरावती, दि. 28 : जिल्ह्यातील चंद्रभागा, वर्धा, निम्न पेढी आदी महत्वाचे सिंचन प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन करावे लागले आहे. विविध प्रकल्पांमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करताना पायाभूत सुविधांची कामे नागरिकांच्या सोयीने करावीत, प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणी या सुविधा प्राधान्याने देण्यात याव्यात, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.

जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या तक्रारी आज येथील सिंचन भवनात श्री. कडू यांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी प्रकल्पनिहाय तक्रारी ऐकून घेतल्या. तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी निर्देश दिले.

श्री. कडू म्हणाले, जिल्ह्यातील पुनर्वसन झालेल्या गावांना येत्या काळात भेटी देण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी यांनी वस्तुस्थिती मांडावी. वस्तुस्थिती आणि अधिकारी यांच्या अहवालात विसंगती आढळू नये. धरणाच्या बुडीत क्षेत्रामुळे दुसऱ्या बाजुला असलेल्या शेतीमध्ये जाणे शेतकऱ्यांना शक्य नाही. तसेच नदीतील रस्तेही नाही. त्यामुळे पर्यायी रस्ता होणे गरजेचे आहे. या भागात सुमारे तीन हजार हेक्टर शेती आणि सहा गावांचा संपर्काचाही प्रश्न आहे. याठिकाणी रस्त्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. बोपापूर, बोडी, बोरगाव यासह ज्या बुडीत क्षेत्रातील रस्त्यांचा प्रश्न आहे, त्याठिकाणचे प्रश्न सोडविण्यात यावे.

बुडीत क्षेत्रातील नागरिकांचे पुनर्वसन कठोरा येथे करण्यात आले आहे. नदीकाठील जी घरे बुडीत क्षेत्रात येतात, त्यांचे पुनर्वसन प्राधान्याने करावे. सावरखेड येथील पुनर्वसन पूर्ण करावे. यासाठी आवश्यक असणारा सर्व्हे करण्यात यावा. नागरिकांनी पूर्ण गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केल्यामुळे त्याचा स्वतंत्र प्रस्ताव सादर करावा. वासेवाडी येथील बाधित क्षेत्र, भूसंपादन झालेले क्षेत्र याची माहिती सात दिवसांच्या आत सादर करावी.

निम्न पेढी प्रकल्पाची अधिसूचना नव्या भूसंपादन धोरणाच्या आधी झालेली असली तरी लाभ मात्र नव्या धोरणाप्रमाणेच देण्यात आला आहे. मात्र शासनाच्या निर्देशानुसार ज्या अधिकच्या सुविधा देण्यात आलेल्या आहे, त्या देता येणे शक्य नाही. मात्र मोबदला देतांना एकरकमी दिल्यास तो सोयीचा ठरणार आहे. आधी पुनर्वसन, नंतर धरण हे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळे पुनर्वसन हे वेळेत आणि योग्य पद्धतीनेच होणे गरजेचे आहे. याठिकाणी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी दिले.

00000

वनक्षेत्रातील गावांसाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावा - राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

 








वनक्षेत्रातील गावांसाठी एकत्रित प्रस्ताव सादर करावा

-         राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू

अमरावती, दि. 28 : मेळघाटातील 24 गावांमध्ये वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. वीज पोहोचवितानाच याठिकाणी रस्ते, पाणी आदी पायाभूत सुविधा निर्माण होण्यासाठी या गावाचा एकत्रित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले.

आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मेळघाटातील 26 गावांच्या मुलभूत समस्यांविषयी बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार राजकुमार पटेल, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

श्री. कडू म्हणाले, मेळघाटातील वन्य क्षेत्रातील 26 गावापैकी दोन गावांचा विजेचा प्रश्न सुटला आहे. उर्वरीत 20 गावांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यापैकी चार गावांत वीज पोहोचणे शक्य होईल. इतर गावांत वीज पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. यासाठी या गावांमध्ये सोलार प्रकल्प देण्यासाठी विचार होणे गरजेचे आहे. गावात वीज आल्यास ही गावे आर्थिकदृष्ट्या सशक्त होण्यास मदत मिळेल. वीज पोहोचविण्यासाठी 32 कोटींचा प्रकल्प तयार आहे. मात्र वन कायद्यामुळे अडचणी येत आहे. वीज पोहोचविण्यासाठी करण्यात येणाऱ्या कामांना पर्यावरणाच्या परवानगीची आवश्यकता आहे. या परवानगी मिळविण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी यांनी प्रयत्न करावेत.

गावांमध्ये तातडीने वीज पोहोचविण्यास अडचणी येत असल्यामुळे प्रत्येक गावासाठी सोलार प्रकल्प केल्यास लाभ होणार आहे. सोलार प्रकल्पाच्या देखभालीचा खर्च अधिक असल्यामुळे हा प्रकल्प उभारतेवेळीच संबंधित कंपनीसोबत पाच वर्षाचा देखभालीचा खर्च विचारात घ्यावा. मेळघाटातील बहुतांश गावे उंचावर असल्यामुळे याठिकाणी पाण्याचा प्रश्नही आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा परिषद आणि जीवन प्राधिकरणाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच ही गावे दुर्गम क्षेत्रात असल्यामुळे या गावात रस्त्यांचाही प्रश्न आहे. रस्ते नसल्यामुळे या गावात परिवहनाची सुविधा देणे शक्य नाही. त्यामुळे रस्ते निर्मितीवरही लक्ष देण्यात यावे.

मेळघाटातील गावे कोअर क्षेत्रात असल्यामुळे याठिकाणी वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे नुकसान होते. त्यामुळे शेतीच्या कुंपनासोबतच वन्य क्षेत्रालाही कुंपन करण्याची गरज आहे. त्यासोबतच शेतीचे नुकसान करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. वनक्षेत्रातील 70 गावांचा प्रश्नही निकाली निघणे आवश्यक आहे. यासाठी शबरी आवास योजनेमध्ये प्रस्ताव पाठवावा. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मध्यस्थी करणे गरजेचे आहे.

वनक्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करताना या गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल, अशा ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे. तसेच पुनर्वसन करण्यात येणाऱ्या गावात रस्ते, पाणी, वीज तसेच पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या मिळाव्यात यासाठी प्रयत्न करावे. तसेच ज्या गावात अभिसरण आणि ठक्करबाप्पा योजनांमधून निधी उपलब्ध होऊ शकेल, त्यातून पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचनाही श्री. कडू यांनी दिल्या.

00000

 

 

सोमवार, २५ जानेवारी, २०२१






विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदन

अमरावती, दि. 26 : विभागीय आयुक्त कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी उपायुक्त गजेंद्र बावणे, विजय भाकरे, प्रमोद देशमुख, अजय लहाने, सहायक आयुक्त विवेकांनद काळकर, श्यामकांत मस्के, तहसिलदार वैशाली पाथरे, नायब तहसिलदार निकिता जावरकर, मधुकर धुळे तसेच अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ध्वजवंदनानंतर पोलिस पथकाने मानवंदना दिली.

00000

 

राष्ट्रीय मतदार दिन निर्भयपणे मतदान करुन लोकशाही बलशाली करु - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

 







राष्ट्रीय मतदार दिन

निर्भयपणे मतदान करुन लोकशाही बलशाली करु

-          जिल्हाधिकारी शैलेश नवाल

अमरावती, दि. 25 : मजबूत लोकशाही असलेले राष्ट्र म्हणून भारताची संपूर्ण जगात ओळख आहे. लोकशाहीवर निष्ठा व्यक्त करणारी कृती म्हणजे मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणे होय. निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपण लोकशाही अधिक बलशाली बनवू. त्यामुळे कुणाच्याही दबावाखाली न येता, आमिषाला बळी न पडता मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नवमतदार युवक-युवतींना केले.

 आज 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ देण्यात आली.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितिन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी निवडणूक श्रीमती वर्षा पवार, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसिलदार संतोष काकडे, नायब तहसिलदार सुनिल रासेकर, संदीप टांक, प्रविण देशमुख, दिनेश बढीये यांच्यासह बडनेरा मतदार संघाचे मतदान केंद्र अधिकारी उपस्थित होते.  

नवीन मतदारांना ओळखपत्राचे वाटप

18 वर्षावरिल मतदान नोंदणी केलेल्या युवक-युवतींना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ओळखपत्र वितरीत करण्यात आले व गुलाबपुष्प देऊन नवमतदारांचा गौरव करण्यात आला. युवा मतदारांमध्ये अबरार खान अजीज खान, सैय्यद नाजीम, रुपेश शेंडे, शितल मेश्राम, दादाराव शिरसाठ, शुभम सोंळके, केताली माहोरे, नंदीनी खाडे, आनंद गवळी, राहुल ढवळे, मोनीका म्हात्रे, समीश्रा टाले यांना मतदान ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पारदर्शक व निर्भयपणे मतदान करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे असे सांगुन शुभेच्छा दिल्या.

निवडणूक प्रक्रियेत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडऱ्यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार केला. बडनेरा मतदार संघातील सागर अठोर, सरोज शेगोकार, अमीत घिमे, सतीश शिरसाठ, वैशाली भोरे व मोहम्मद सलीम या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देवून गौरव केला. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.  

 

00000

 

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शपथ

 







विभागीय आयुक्त कार्यालयात

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त शपथ

अमरावती, दि. 25 : विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यात आली. विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांना शपथ दिली.

या कार्यक्रमास महसूल उपायुक्त गजेंद्र बावणे, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, करमणूक शुल्क उपायुक्त विजय भाकरे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

00000