गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

एकलव्य निवासी शाळेतील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 एकलव्य निवासी शाळेतील प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Ø  प्रवेशासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत

Ø  संकेतस्थळावर माहिती अपलोड करावी

अमरावती, दि. 5 : अमरावती विभागातील आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या चार एकलव्य निवासी शाळांमध्ये सन 2021-22 शैक्षणिक वर्षात इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या शाळा प्रवेशासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन आदिवासी विभागातर्फे करण्यात आले आहे.

अमरावती विभागातील 4 एकलव्य शाळांमधील सहावीसाठी मुले 120, मुली 120 सातवी मुले 37 मुली 38, आठवीमध्ये मुले 18, मुली 10, नववीमध्ये मुली 4 याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास यांचे अधिनस्त येत असलेल्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद यांच्या कार्यक्षेत्रामधील 12 जिल्ह्यात असलेल्या सर्व शासकीय आश्रमशाळा व अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश पुर्व स्पर्धा परिक्षा घेण्यात येते, मात्र सद्याच्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष 2021-22 करीता विद्यार्थी प्रवेशासाठी स्पर्धा परिक्षा न घेता प्रवेशोच्छूक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील जे विद्यार्थी पाचवीमध्ये प्रविष्ट होते आणि सद्या सदरील विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सहावीमध्ये प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत सहावीमध्ये प्रवेश घेण्याकरिता मागील वर्षाचे पाचवीचे गुणपत्रक ऑनलाईन आवेदन पत्रासोबत अपलोड करावे लागणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता सातवीमध्ये प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्याचे मागील वर्षांचे सहावीच्या वर्गाचे गुणपत्रक, इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे सातवीच्या वर्गाचे गुणपत्रक आणि नववीमध्ये प्रवेश घेण्याकरीता विद्यार्थ्याचे मागील वर्षाचे आठवीच्या वर्गाचे गुणपत्रक अपलोड करावे लागणार आहे.

                  सदर गुणांच्या आधारे गुणानुक्रम विद्यार्थ्याची निवड होणार आहे. ऑनलाईन अर्जामध्ये संपुर्ण माहिती नमुद केल्याप्रमाणे पालकांच्या रहिवासाचा पत्ता विचारात घेवून एकलव्य निवासी शाळा, चिखलदरा, जि. अमरावती, वाईखुर्द, ता. वरुड जि. अमरावती, प्रकल्प कार्यालय धारणी. एकलव्य निवासी शाळा, सहस्त्रकुंड जि. नांदेड, प्रकल्प कार्यालय किनवट, एकलव्य निवासी शाळा, बोटोणी, जि. यवतमाळ प्रकल्प कार्यालय पांढरकवडा या ठिकाणी असलेल्या एकलव्य निवासी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गुणानुक्रम प्रवेश देण्यात येणार आहे. https://admission.emrsmaharahtra.com या संकेतस्थळावर आवेदनपत्र व मार्कलिस्ट दि. 31 ऑगस्ट 2021 पर्यत अपलोड करावी, याबाबत विद्यार्थ्यास गुणानुक्रम निवड झाल्यास आयुक्तालाकडून एसएमएसद्वारे कळविण्यात येईल, असे आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त विनोद पाटील यांनी कळविले आहे.

00000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा