पोषण महिन्यानिमित्त जिल्ह्यात
विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी
-
मुख्य कार्यकारी अधिकारी
अविश्यांत पंडा
अमरावती, दि. 21 (विमाका) : सातत्यपूर्ण आरोग्य
तपासणी शिबिरे, त्याद्वारे कुपोषित बालकांचा शोध घेऊन उपचार मिळवून देणे, पालकांच्या
मनावर परिसरात उपलब्ध आहाराचे महत्व बिंबवणे व जल व्यवस्थापन या चतु:सुत्रीवर आधारित
विविध कार्यक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतले आहेत, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी
अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज केले.
राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त मोझरी
येथे ‘स्वस्थ बालक बालिका स्पर्धे’तील पारितोषिक प्राप्त बालक व पालकांचा गौरव
करताना ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके, गटविकास अधिकारी
चेतन जाधव, बालविकास प्रकल्प अधिकारी चित्रा वानखेडे, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर
घोरमाडे, निलेश लेवाडकर, यांच्यासह अनेक अधिकारी
उपस्थित होते.
जि. प. महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘माय-बाबांसाठी थोडे तरी’, ‘सासवांची शाळा’, ‘एक
दिवस मेळघाटासाठी’, ‘लोकप्रतिनिधी दिवस’, ‘गाव तिथे बंधारा’ आदी कार्यक्रम हाती घेण्यात
आले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात आज ‘स्वस्थ बालक बालिका स्पर्धे’चे आयोजन
करण्यात आले. त्यात बालकांचे वजन, उंची, लसीकरण, आहार आणि जंतनाशक गोळ्यांचा वापर
या निकषांवर तपासणी करण्यात आली. गावातील
पाच सदस्यीय समितीने निवड केली. सुदृढ बालकांना पारितोषिक देऊन त्यांच्या
पालकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
बालकांच्या उत्तम भविष्यासाठी
आहार अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचे महत्व पालकांनी जाणून घेतले पाहिजे. या दृष्टीने
पोषण दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
००००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा