गुरांच्या लंपी त्वचारोगावर
पशुपालकांनी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन
अमरावती दि. 21
(विमाका) : लंपी आजार गो व महिष वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य आजार आहे.
वेळेवर
उपचार केल्यास हा रोग निश्चित बरा होतो. पशुपालकांनी घाबरुन न जाता या आजाराबाबत दक्षता
घ्यावी व बाधित जनावरांवर वेळीच उपचार करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी
पुरुषोत्तम सोळंके यांनी केले आहे.
लंपीची कारणे व लक्षणे
या रोगाचा संसर्ग ‘कॅप्रीपॉक्स’
विषाणू मुळे होतो. या आजारासाठी कारणीभूत असणारे विषाणु देवी विषाणु गटाचे असतात. लंपीचा
प्रसार जनावरांना डास, चावणाऱ्या माश्या,
गोचिड, चिलटे, बाधित जनावरांचा स्पर्श, दुषित चारा-पाणी यापासुन होतो.
गोवर्गीय सर्व वयाच्या
जनावरांना हा आजार होऊ शकतो. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावराच्या
शरीरावर कडक व गोल गाठी येतात. जनावरे चारा कमी खातात अथवा बंद करतात. पाणी पिण्याचे
प्रमाण अत्यंत कमी होते. बाधीत जनावरांना सुरुवातीस मध्यम स्वरुपाचा ताप येतो.
डोळ्यातून व नाकातून चिकट स्त्राव वहातो, सर्व अंगावर गाठी येऊ लागतात. या गाठी विशेषता:
डोके, मान, पाय व कासेत येतात. जनावरातील दूध उत्पादन क्षमता अत्यंत कमी होत जाते. काही जनावरांच्या पायावर सूज येते.
जनावरांच्या फुप्फुस, श्वासनलिका, अन्न नलिकेवर मोठया प्रमाणात पुरळ येतात. बाधित
जनावरे दोन ते तीन आठवड्यात बरी होतात.
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी
चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा तात्काळ ताप मोजावा. नजीकच्या पशुवैद्यकीय
दवाखान्याशी संपर्क साधुन उपचार करावा. बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळी
ठेवावी. कोणत्याही संभाव्य रोगी जनावरांस निरोगी जनावरांच्या कळपापासुन विलग ठेवावे.
रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या जनावरास गावातील चराऊ कुरणावर इतर निरोगी जनावरांसह सोडू
नये. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने डास, माश्या,
गोचिडसारख्या किटकांवर औषधांचा वापर करुन त्यांचा नायनाट करावा. निरोगी जनावरांच्या
अंगावर कीटक येवू नयेत म्हणुन त्यांच्या अंगावर औषध लावावे व गोठ्यामध्ये कीटकनाशक
फवारणी करावी. आजारी व निरोगी जनावरांवर औषध फवारणी करू नये. रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील
जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच जनावरांच्या स्थानीक बाजारांमध्ये
नेऊ नये. बाधित जनावराच्या गाठीचे रुपांतर जखमेत झाल्यास जखमेत जंतूसंसंर्ग होऊ
नये यासाठी जखमेवर औषधी लावावी. पशुवैद्यकाच्या मार्गदर्शनानुसार लसीकरण करून घ्यावे.
प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 मधील
कलम 490 (1) अन्वये पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळुन आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय
संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आदींनी लेखी स्वरूपात नजीकच्या पशुवैद्यकीय
संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी शासकीय पशु वैद्यकीय दवाखाना, पशुसंवर्धन
विभागाचा टोल फी क्र. १८००२३३०४१८ अथवा मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेचा टोल फ्री
क्र. १९३२ यावर संपर्क साधावा, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा