पाण्याची समस्या सोडविण्यासाठी
सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत
- खासदार डॉ. अनिल बोंडे
अमरावती, दि.5 (विमाका):- मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई गावात
उद्भवलेली पाण्याची समस्या तातडीने सोडविण्यात यावी. तसेच महापालिका राबवित असलेल्या
अमृत पाणी पुरवठा योजनेअंतर्गत अमरावती-नेर पिंगळाई-मोर्शी मार्गावरील पाणीपुरवठा करणारी
नादुरूस्त जलवाहिनी बदलविण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला असून त्याचा पाठपुरावा
करण्यात यावा. यासंदर्भात महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम
विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सुचना खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात
विविध विषयांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर,
कार्यकारी अभियंता श्री थोटांगे, शहर अभियंता रवी पवार, चेतन गावंडे आदी यावेळी उपस्थित
होते.
भुयारी गटार योजनेला गती देण्यासाठी
आवश्यक निधी मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावे. रस्त्यावरील अपघातांना आळा बसावा तसेच
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यावरील गटारींना झाकणे लावावी. शहरात फेरीवाल्यांचे
प्रमाण बघता त्यांच्यासाठी असलेल्या नियमांची माहिती, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी
व राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे.
फेरीवाल्यांना गणवेश, ओळखपत्र देण्याबाबत व त्यांचा विमा उतरविण्याबाबतची संपुर्ण माहिती
त्यांना देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. अशा सुचना श्री बोंडे यांनी यावेळी
केल्या. नेहरू मैदान, लाल शाळा, शहीद स्मारकाचे नुतनीकरण व सौंदर्यीकरणाबाबत प्रस्ताव
शासनाकडे सादर करण्यात यावा. सिटी मोबॅलिटी योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या विकासकामांची
माहिती श्री बोंडे यांनी यावेळी घेतली. वास्तुशिल्प अभियंता संजय राऊत यांनी सादरीकरण
केले.
तुषार
भारतीय, किरण पातुरकर, चेतन गावंडे, सुरेखा लुंगारे, राधा कुरील, सुनिल काळे. रश्मी
नावंदर, आदी यावेळी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा