बुधवार, ४ नोव्हेंबर, २०२०

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

 

प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी

शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर पर्यंत प्रस्ताव सादर करावे

अमरावती, दि. 4 : अमरावती विभागात बुलडाणा, अकोला, वाशिम , अमरावती व यवतमाळ या जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना रबी हंगाम वर्ष 2020-21 मध्ये राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेकडे विमा हफ्त्यासह आपले प्रस्ताव 15 डिसेंबर पर्यत सादर करावे. तसेच कर्जदार शेतकरी पिक विमा काढण्यास इच्छुक नसल्यास त्या शेतकऱ्यांनी लेखी अर्ज बँकेस सादर करावा. असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक सुभाष नागरे यांनी केले.

प्रधानमंत्री पिक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजने अंतर्गत विमा हप्ता दर 30 टक्के पेक्षा जास्त नमुद केला आहे. त्यासाठी वाढीव विमा हप्ता अनुदान भार राज्य शासनावर आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हत्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा  रब्बी हंगामासाठी 1.50 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादीत ठेवण्यात आला आहे.  या योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगाम सन 2020-21 ते 2022-23 या तीन वर्षाकरीता जोखिमस्तर सर्व पिकांसाठी 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.

विमा क्षेत्र घटक योजना

ही योजना क्षेत्र हा घटक धरून राबविण्यात येणार असून पिक विमा निहाय अधिसुचित विमा क्षेत्र घटक म्हणजेच मंडळ किंवा गट आणि तालुका किंवा तालुका गट राहणार आहे. या  योजनेअंतर्गत पिक कापणी प्रयोगाव्दारे मिळणारे उत्पन्नाचे अंदाज हे अचुक व दिलेल्या कालमर्यादेमध्ये प्राप्त करण्याकरीता उपग्रहाव्दारे प्राप्त प्रतिमांच्या साहाय्याने पिक कापणी प्रयोग आयोजित करणे, तसेच पिकांच्या मिळणारे उत्पन्नाचे अंदाजासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणेबाबत केंद्र शासनाने सुचित केले आहे.

या वर्षीच्या रब्बी हंगाम सन 2020-21 मध्ये पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा. यासंबंधीच्या अधिक माहितीकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, यांनी केलेले आहे.

मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०२०

शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीत कोविडची नियमावली काटेकोर पाळावी - विभागीय आयुक्त पियूष सिंह

 



 शिक्षक मतदारसंघाचा निवडणुकीत

कोविडची नियमावली काटेकोर पाळावी

                        - विभागीय आयुक्त पियूष सिंह

* राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक

अमरावती, दि. 3 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीमध्ये राज्य शासनाने कोविड संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त संजय पवार, तहसिलदार वैशाली पाथरे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. सिंह यांनी सुरवातीला निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशन पत्र गुरूवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत भरता येईल. या दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येईल. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार असल्याची माहिती दिली.

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करतेवेळी दोन वाहने आणि उमेदवारासह दोन व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रचार करतांना परस्परांतील अंतर पाळावे लागणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरावा लागणार आहे. एक उमेदवार जास्तीत जास्त चार अर्ज दाखल करू शकेल. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना दहा हजार रूपये तर अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रूपये अनामत रक्कम भरावी लागेल. तसेच उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र सादर करावे लागेल.

सध्यास्थितीत 34 हजार 690 मतदारांची नोंदणी झालेली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे ज्यांना नोंदणी करावयाची आहे, त्यांनी तातडीने नोंदणी करावी. या निवडणुकीसाठी 77 मतदान केंद्र प्रस्तावित आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडची लागण झालेल्या मतदारांना पोस्टल मतपत्रिका पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी नियमावली विहित केली आहे. तसेच मतदान केंद्रावर दोन व्यक्तींमध्ये परस्पर अंतर पाळण्यात येणार असल्याची माहिती श्री. सिंह यांनी दिली.

00000

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

निमंत्रण

 

निमंत्रण

 

 प्रति,

मा. संपादक/प्रतिनिधी (सर्व माध्यमे),

अमरावती

 

महोदय,

             विभागीय आयुक्त मा. श्री. पियूष सिंह हे मंगळवार, दि. 3 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय, सभागृह क्रमांक 2 येथे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2020 ची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहेत.

या पत्रकार परिषदेला आपण उपस्थित रहावे अथवा आपला प्रतिनिधी पाठवावा, ही नम्र विनंती.  

 

 

उपसंचालक (माहिती)

विभागीय माहिती कार्यालय,

अमरावती

पत्रकार परिषद :

स्थळ : अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय, सभागृह क्रमांक 2

विषय : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 2020

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित

 

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित

    * 1 डिसेंबर रोजी होणार मतदान

 * 3 डिसेंबर रोजी मतमोजणी

* आदर्श आचारसंहिता लागू

अमरावती, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020 कार्यक्रम घोषित आज घोषित केला. यानुसार दि. 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होणार असून, दि.  3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

            या निवडणूक कार्यक्रमानुसार निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन पत्र गुरूवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत भरता येणार आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार आहे.

            या निवडणुकीसाठी मंगळवार, दि. 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर दि. 3 डिसेंबर 2020 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया सोमवार, दि. 7 डिसेंबर रोजी पुर्ण होणार आहे. या निवडणुकीबाबत आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. या आदर्श आचारसंहितेचे पालन संबंधितांनी करावे, असे आवाहन अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक 2020चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले आहे.

00000

 

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी किशोर तिवारींचा मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा

 

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी

किशोर तिवारींचा मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा

अमरावती, दि. 2 : शेतकऱ्यांच्या समस्या, नुकसान भरपाई, सिंचन, वीज पंप यासारखे महत्त्वाचे विषय सोडविण्यासाठी कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानामध्ये विदर्भातील अकरापैकी फक्त एका जिल्ह्यात नुकसान झाल्याचा निष्कर्ष काहींनी काढल्यामुळे शेतकरी अडचणी सापडला आहे. राज्य शासनाच्या १६ ऑक्टोबर २०२० च्या शासन निर्णयात यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या शेती आणि इतर घरे, कपडे, भांडी इत्यादींच्या नुकसानी संदर्भात तरतुदी दिल्या आहेत. या शासन निर्णयात अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात आणि नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान झाले नसल्याचे नमूद केले आहे.

याच शासन निर्णयात विदर्भातील ११ पैकी भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. भंडारा जिल्ह्यात शेतीचे २ कोटी ११ लाख ४३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. या जिल्ह्यात घरे, कपडे, भांड्याचे नुकसान १९ लाख ८५ हजार रुपयांचे, मृत जनावरांचे ५ लाख ८२ हजार तर मोठ्या प्रमाणातील पडझडीचे नुकसान २ कोटी ८६ लाख ५६ हजार रुपयांचे झाले असल्याचे नमूद केले आहे. अमरावती विभागात घरे, कपडे, भांडी यांचे नुकसान सर्व जिल्ह्यांत झाल्याचे दर्शविले आहे. हे पाच जिल्ह्यांचे मिळून नुकसान १ कोटी ९४ लाख ५२ हजार रुपये आहे. यातील अमरावती आणि अकोला या दोनच जिल्ह्यांमध्ये ४ लाख ८२ हजार रुपयांचे नुकसान झालेले नमूद आहे. नागपूर विभागात पाच आणि अमरावती विभागात तीन अशा विदर्भातील आठ जिल्ह्यांमध्ये जनावरांचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे शासनाचे सर्वेक्षण आहे.

या आकडेवारीनुसार संपूर्ण विदर्भात अतिवृष्टीमुळे शेती, घरे, झोपड्या गोठे, जनावरे अशा विविध प्रकारांमध्ये सर्व मिळून ७ कोटी २२ लक्ष ९० हजार नुकसान झाले आहे. त्यामुळे १० हजार कोटींपैकी ९ हजार ९९८ कोटी रुपये विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात दिल्या जाणार आहे. अकोला जिल्ह्याला मिळणाऱ्या २६ लाख रुपयांच्या नुकसान भरपाईत फक्त १० लाख रुपयांची वाढ केली आहे. उर्वरित महाराष्ट्राला जिरायतीसाठी हेक्टरी १ हजार तर फळ पिकांसाठी २५ हजार रुपये मिळणार आहेत. मात्र शासन निर्णयाप्रमाणे विदर्भाला जिरायत ६ हजार ८००, तर फळ पिकांसाठी १८ हजार रुपये याप्रमाणे मदत मिळणार आहे. पावसाने झालेल्या पडझडीने अमरावती जिल्ह्यात ५७.८१ आणि  बुलढाणा जिल्ह्यात ५२.७१ लाख रुपयांची नुकसान भरपाई देऊ केली आहे. या दोन जिल्ह्यामध्ये शेतीचे नुकसान झालेले नसल्याचे म्हटले असल्याने, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार आहे, असे श्री. तिवारी यांनी सांगितले.

0000000

 

शनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०

विभागीय आयुक्त कार्यालयात 
महर्षी वाल्मिकी, सरदार पटेल यांना अभिवादन
अमरावती, दि. 31 : विभागीय आयुक्त कार्यालयात महर्षी वाल्मिकी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले.
महर्षी वाल्मिकी आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त संजय पवार यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सहायक उपायुक्त शामकांत मस्के, तहसीलदार वैशाली पाथरे, नाझर श्री. पेठे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०२०

दहावी व बारावीची पुरवणीपरीक्षा डिसेंबरमध्ये

 

दहावी व बारावीची पुरवणीपरीक्षा डिसेंबरमध्ये

अमरावती, दि. 29 : राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणीपरीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेवून प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्ध्तीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दि. 2 नोव्हेंबर पर्यंत सादर करावे.

विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे त्यांच्या माध्यमिक शाळा, उच्च माध्य. शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. श्रेणीसुधार करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहे नोव्हेंबर-डिसेंबर 2020 व फेब्रुवारी-मार्च 2021 अशा लगतच्या दोनच संधी उपलब्ध राहतील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

*****

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क बँकेत जमा करावे

 

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क बँकेत जमा करावे

अमरावती, दि. 29 : माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी इयत्ता दहावी व बारावीच्या शैक्षणिक सत्र 2020 मधील विद्यार्थ्याचे परिक्षा शुल्क ॲक्सीस बँकेत जमा करून घेण्याबाबत कार्यवाही सुरु करावी. ॲक्सीस बँकेचे चलन ऑनलाईन तयार होणार असून महाविद्यालयांनी ते त्वरीत डाऊनलोड करावे.

सर्व महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परिक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्क्म माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईएफटी/ आरटीजीएसव्दारे चलनवरील नमूद बँक अकाऊंटवर व आयएफएससीकोड प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावी, असे राज्य मंडळाचे सचिव यांनी कळविले आहे.

*****

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २०२०

शेतकरी मिशनच्या ‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची’ मोहिमेतून असंख्य रुग्ण कोरोनामुक्त

 

शेतकरी मिशनच्या ‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची’

मोहिमेतून असंख्य रुग्ण कोरोनामुक्त

 

अमरावती, दि. 8 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी मिशनच्या ‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची’ या मोहिमेद्वारे अनेक गरजू रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यात येत असून असंख्य रुग्ण कोरोनामुक्त होत आहे. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्यां कोरोनाग्रस्तासांठी ही मोहिम आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिली. कोरोनाग्रस्त रुग्णांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘कुटुंब आपले-जबाबदारी आमची' या मोहिमेअंतर्गत ज्या रुग्णांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत त्यांनी शेतकरी मिशनच्या 09422108846 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होई पर्यंतच्या सर्व बाबी शेतकरी मिशनच्यावतीने पार पाडल्या जातात. गंभीर आजार असलेले रुग्णांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्या प्राणवायू व फुफ्फुसाच्या स्थितीवर निगराणी ठेवण्यात येते. आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असलेल्या नागरिकांसाठी ही मोहिम असून महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी या मोहिमेची मोलाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

*****

 

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

विभागीय आयुक्त कार्यालयात 
राष्ट्रपिता महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन
अमरावती, दि. 2 : येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपायुक्त संंजय पवार, प्रमोद देशमुख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000