शनिवार, २८ मे, २०२२

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्ग आरक्षण समर्पित आयोगाने जाणून घेतली संस्था, व्यक्तींची मते सुमारे चाळीस संस्था, संघटनांशी चर्चा

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्ग आरक्षण

समर्पित आयोगाने जाणून घेतली संस्था, व्यक्तींची मते

सुमारे चाळीस संस्था, संघटनांशी चर्चा

अमरावती, दि. 28 : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारली व त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी 40 संस्था-संघटना, तसेच सुमारे दीडशे नागरिकांनी आयोगाची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.

आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया, सदस्य नरेश गीते, डॉ. शैलेशकुमार दारोकार, एच. बी. पटेल व सदस्य सचिव पंकजकुमार आदींनी संस्था व नागरिकांकडून प्रत्यक्ष चर्चा करून निवेदने स्वीकारली.

अप्पर विभागीय आयुक्त नीलेश सागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पुरवठा उपायुक्त अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, आयोगाचे संशोधन अधिकारी डॉ. नितीन धाकतोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्यासह विविध जिल्ह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

            आयोगाकडून घेण्यात आलेल्या प्रत्यक्ष सुनावणीबाबत संस्था व व्यक्तींच्या नोंदणीसाठी विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्हाधिकारी कार्यालयांत मदत कक्ष उघडण्यात आले होते. त्यानुसार 30 संस्थांकडून नोंदणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे, वेळेवर उपस्थित व्यक्ती व संस्थांकडूनही निवेदने स्वीकारण्यात आली. आयोगाने प्रत्येक निवेदनकर्त्याचे स्वागत करत त्यांचे म्हणणे सविस्तर जाणून घेतले, सुनावणीतील प्रत्येक बाबीची नोंद करण्यात आली.  विभागातील पाचही जिल्ह्यातील संस्था व व्यक्तींनी सुनावणीत सहभाग घेतला. यावेळी आयोगाने सर्व अधिका-यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून विविध बाबींची माहिती घेतली.

अमरावती विभागीय आयुक्त कार्यालय, सर्व जिल्हाधिकारी कार्यालये, विविध नोडल अधिकारी यांनी सुनावणीच्या अनुषंगाने उत्तम पूर्वतयारी व समन्वयाने काम केले. त्यामुळे सुनावणीचे कामकाज चांगल्या पद्धतीने पार पडले, अशी प्रतिक्रिया आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांनी यावेळी व्यक्त केली.

अप्पर आयुक्त श्री. सागर, उपायुक्त श्री. लहाने यांनी स्वागत केले. सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

0000000

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा - पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

 











प्राथमिक आरोग्य केंद्र हा   ग्रामीण जीवनाचा  कणा

                                                             - पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

                                     

         अमरावती, दि. 28 : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण जीवनाच्या कणा आहे. यामुळे या इमारतीचे बांधकाम नियोजनबद्ध व सर्व सोयींनी युक्त असावे. तसेच पुढील काळात येथील पाणंद रस्ताचे काम लवकरच पूर्ण करणार,असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर यांनी आज दिले.

जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ ढोमणे, सरपंच मंगला लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, तहसिलदार सागर ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जयस्वाल, रमेश काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे निर्लेखन करुन नवीन इमारत बांधकामचे भूमीपूजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कामाची अंदाजे किंमत साडेचार कोटी रुपये एवढी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व विस्तारीकरणांतर्गत हे विकास काम करण्यात येणार आहे.  अडगाव बु. येथील आयुवेर्दिक दवाखान्याच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. या कामाची अंदाजे किंमत 62.95 लक्ष एवढी आहे. उपकेंद्राची बांधकामे व विस्तारीकरण या अंतर्गत हे विकास काम करण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे श्रीमती ठाकूर यावेळी  म्हणाल्या.

 अडगाव येथील सरगम महिला प्रभाग संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला श्रीमती ठाकूर उपस्थित होत्या .

 

राजमाता महिला स्वाधारगृहाच्या बांधकामचे भूमिपूजन

        शिवरत्न जिवबा महाले चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेमार्फत रेवसा येथे राजमाता महिला स्वाधार गृहाचे बांधकामचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वाधारगृहाची जागा ही लोकवगर्णीतून तयार झाली आहे. महिलांना घराबाहेर तसेच घरातही कित्तेकदा संकटांना सामोरे जावे लागते. बरेचदा या अडचणीतून बाहेर निघणे प्रसंगी कठीण होते. अशावेळी स्वाधारगृहामुळे महिलांना माहेरपणाच्या आधार गवसेल. राजमाता महिला स्वाधारगृहाचे काम अत्यंत महत्त्वाचे असून यामुळे अनेक माता-बहिणीसाठी निश्चितच मदत होईल, असा विश्वास श्रीमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाला लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांची विशेष उपस्थिती होती. विलास इंगोले, प्रभारी तहसिलदार सुनिल रासेकर, संस्थेचे अध्यक्ष विवेक राऊत, रेवसाच्या सरपंच वर्षा चव्हाण, पोलिस पाटील छाया वानखडे, राखी रीठे तसेच ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

000000

जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक - पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

 







जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक

                                                          -    पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात अद्ययावत

श्वसनरोग अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन

 

अमरावती, दि. 28 : जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक आहे. याच धर्तीवर डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयातील अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अमरावती शहरातच या आरोग्य सुविधेच्या लाभ घेता येईल. यामुळे रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला. 

डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन श्रीमती ॲड. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमुख, संचालक डॉ. पद्माकर सोमवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष नरेश ठाकरे, रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयामार्फत जनसामान्यांच्या आरोग्य सुविधेसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. असे सांगून श्रीमती ठाकूर म्हणाला की,  अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्ष हा येथील सातवा अतिदक्षता कक्ष आहे. यापूर्वी विविध अतिदक्षता कक्ष स्थापन करण्यात आले आहे.  याचा फायदा जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना होतो. शिवाय इतर जिल्ह्यातील रुग्णही येथे मोठया प्रमाणावर उपचारासाठी येतात. कोरोना काळामुळे आरोग्य व्यवस्था बळकट असण्याचे महत्त्व सर्वांना कळले आहे. शासनातर्फे अशा आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

अध्यक्ष श्री. देशमुख यांनी ह्दयाच्या शस्त्रकियेसाठी ऑपरेशन थिएटर बांधण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगितले. सध्याचा धकाधकीच्या काळात ह्दय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी अशा ऑपरेशन थिएटर्सची गरज आहे. यासाठी प्रशासनामार्फत सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकेत प्राचार्य डॉ. देशमुख यांनी महाविद्यालयातील आरोग्यविषयक सुविधांची माहिती दिली. अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षामध्ये आठ खाटांची सुविधा आहे. कोविड काळात संस्थेमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. खाजगी संस्थेमार्फत कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पुढाकार घेणारे हे पहिले रुग्णालय होते. प्रशासनाच्या सहकार्यामुळे येथे ऑक्सीजन प्लांटची निर्मिती करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

000000

गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता‘पिझोमीटर’ भूजलमापक यंत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 



गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता‘पिझोमीटर’

भूजलमापक यंत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

अमरावती, दि. 28 : अटल भूजल योजनेतंर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्यासाठी पिझोमीटर  (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशाोमती ठाकूर यांच्या हस्ते आज पिझोमीटरचे उद्घाटन करण्यात आले.

            सरपंच ललिता जोमदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक संजय कराड, मोर्शीचे तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी आर. पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अत्याधुनिक पध्दतीने गावातील भूजल पातळीच्या अभ्यास करण्याकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड, मोर्शी  व चांदुरबाजार या तालुक्यामध्ये एकूण 90 ग्रामपंचायतीमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पिझोमीटरसाठी स्थळ निश्चित करण्यात आले आहे. जमिनीतील भूशास्त्रीय रचनेनुसार जलधारक खडकाचा अभ्यास व तसेच भूजल पातळीचा अभ्यास अत्याधुनिक पध्दतीने करण्याकरिता पिझोमीटरने (भूजल मापक यंत्र) खोदकाम करण्यात येणार आहे व त्यावर (डिजीटल वॉटर लेवल रेकॉर्डर) बसविण्यात येणार आहे. यामुळे गावाला भूजल पातळीची नोंद दर 12 तासाला घेता येईल, अशी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच या योजनेतंर्गत अमरावती जिल्ह्यातील एकुण 90 ग्रामपंचायत मध्ये 90 पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात येणार आहे. तसेच या यंत्राद्वारे गावामध्ये दरदिवशी किती पाऊस पडतो, हे मोजमाप कशाप्रकारे करतात, याचे प्रात्यक्षिक या कार्यालयमार्फत गावातील जलसुरक्षक यांना देण्यात येईल. पर्जन्यमापक यंत्र व भूजल मापक यंत्राचा उपयोग करुन गावाचा ताळेबंद अधिक अचूकतेने करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

0000000

 

गुरुवार, १९ मे, २०२२

जिल्‍ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

जिल्‍ह्यात कलम 37 (1)  व (3) लागू

 

अमरावती, दि. 19 (विमाका) : जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी अपर जिल्‍हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता पोलीस आयुक्तयालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यात दि. 26 मे 2022 पर्यत लागू करण्यात आला आहे. या कलमांचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असेही अपर जिल्हा दंडाधिकारी  यांनी कळविले आहे.

000000

कंत्राटी संगणक व कला शिक्षकाची परीक्षा 29 मे रोजी अकोल्यात

 

कंत्राटी संगणक व कला शिक्षकाची परीक्षा

29 मे रोजी अकोल्यात

अमरावती, दि. 19 (विमाका) : अकोल्याच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत सकीय आश्रम शाळांमधील कला शिक्षक व संगणक शिक्षकाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येत आहेत. त्यासाठी प्राप्त अर्जानूसार कंत्राटी कला शिक्षक पदासाठी 149 आणि संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र आहेत. परीक्षा रविवार दि. 29  मे, 2022 रोजी सकाळी 11 वाजता अकोल्यात सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे होईल.

लेखी परीक्षा 200 गुणांची असेल. त्यात 100 प्रश्न असतील. प्रत्येक अचूक उत्तराला दोन गुण मिळतील. कला शिक्षक पदासाठी सामान्य ज्ञान घटकातील 70 प्रश्न व कलाशिक्षक अर्हताधारित 30 प्रश्न तसेच कंत्राटी संगणक शिक्षक पदासाठी सामान्यज्ञान घटकासाठी 70 प्रश्न, संगणक विषयासंदर्भात 30 प्रश्न असतील.

परीक्षेचे प्रवेशपत्रे रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात आले आहे. ज्यांना ते मिळू शकले नाही, त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला महसूलभवन इमारत, माहेश्वरी भवनजवळ, न्यू राधाकिसन प्लॉट, अकोला येथून दि. 25 किंवा 26 मे  या दिवशी कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावेत, असे सदस्य सचिव तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला यांनी कळविले आहे.

000000

बुधवार, ११ मे, २०२२

शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

         











 शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा

                                                                              - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 

                                   17 मे पर्यंत कर्तव्यपूर्ती यात्रेचे आयोजन

          अमरावती दि.11: शेतकरी व सामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न त्वरित निकाली काढून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने कर्तव्यपूर्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा सर्वसामान्यांना सहज लाभ मिळावा हा या मागील हेतू आहे. शासनाच्या योजनांचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जलसंपदा व लाभ क्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू  यांनी आज केले. अचलपूर तालुक्यातील कुष्ठा(बु) येथे दत्तप्रभू माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कर्तव्य पूर्ती यात्रेच्या उद्घाटन प्रसंगी श्री कडू बोलत होते.

              यावेळी आमदार राजकुमार पटेल, कुष्ठा(बु)च्या सरपंच अमृताताई उमक, उपसरपंच वृषाली शेलोकर, कुष्ठा(खु) च्या सरपंच सुनीता पवार, अचलपूर तहसीलदार मदन जाधव, नायब तहसीलदार शंकर श्रीराव, पुरवठा निरीक्षक देशमुख, श्रीमती वडूरकर, गटविकास अधिकारी खेडकर, सहायक गटविकास अधिकारी कासदेकर आदी उपस्थित होते.

कर्तव्य पूर्ती यात्रेतील विविध स्टॉलची राज्यमंत्र्यांकडून पाहणी

             कर्तव्यपूर्ती यात्रेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, परिवहन, आरोग्य विभाग, समाज कल्याण, पुरवठा विभाग, महिला व बालकल्याण विभाग, सहकार, भूमी अभिलेख आदी विभागांकडून लावण्यात आलेल्या स्टॉलची पाहणी श्री कडू यांनी केली. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 

राज्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना राशन कार्डचे वाटप

             मीरा कासदेकर, मोनाली भगत, सुनंदा लहाने, संगीता थोपट, शेख इस्माईल, नेहा मदगे, कुसुम पाटील, संगीता थोरात, नजमा बानो सलीम आदी लाभार्थ्यांना राज्यमंत्र्यांच्या हस्ते राशन कार्डचे वाटप करण्यात आले.

11 ते 17 मे पर्यंत कर्तव्य पूर्ती यात्रेचे आयोजन

               अचलपूर तालुक्यातील आज (11 रोजी) सुरू झालेली कर्तव्यपूर्ती यात्रा येत्या 17 मे पर्यंत विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. आज कुष्ठा(खु)च्या कर्तव्य पूर्ती योजनेचा पोही, हरम, आरेगाव, भिलोना, कोपरा, वडनेर, भुजंग, कुष्ठा (खु), टवलार, खांजमानगर येथील नागरिक लाभ घेऊ शकतील.

12 मे रोजी कांडला, 13 मे रोजी पथ्रोट, 14 मे रोजी गौरखेडा (कुंभी) व 17 मे रोजी धामणगाव गढी येथे या राहुटीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

                                                                       0000000

 

 

 

 

 

 

 

रविवार, ८ मे, २०२२

 








गाविलगड आग दुर्घटनास्थळाची पालकमंत्र्यांकडून पाहणी; घटनेचे कारण शोधून

वस्तुनिष्ठ अहवाल देण्याचे निर्देश

जळीत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडे लावून हिरवाई निर्माण करा

                                                                    - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 08 :- चिखलदरा येथील गाविलगड परिसरात आगीमुळे वनाचे नुकसान झाले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण शोधून वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, तसेच नुकसानग्रस्त भागात पुन्हा झाडे लावून हिरवाई निर्माण करावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

चिखलदरा येथे गाविलगड परिसरात आग लागून झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्र्यांनी आज केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि.प अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्यासह वनाधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, दुर्घटनेची कारणमीमांसा करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. नेमके किती नुकसान झाले हे तपासावे. आवश्यक तिथे कारवाई व्हावी त्याचप्रमाणे, येथे पुन्हा हिरवाई निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड व्हावी. ही कामे 'मनरेगा'च्या माध्यमातून राबवावीत जेणेकरून स्थानिकांना रोजगार मिळू शकेल. या दृष्टीने आवश्यक कामांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

यापुढे पुन्हा अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यामुळे वनविभागाने काटेकोर तपासणी, नियंत्रण व आवश्यक कार्यवाही नियमितपणे करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

चिखलदरा व धारणी येथे साकारणार नवीन प्रशासकीय इमारत; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

 














चिखलदरा व धारणी येथे साकारणार नवीन प्रशासकीय इमारत; 

पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

इमारतीचे बांधकाम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करा

                                                                   - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 06 :- जिल्ह्यात रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. चिखलदरा व धारणी येथे एकूण ३० कोटी रुपये निधीतून नवीन प्रशासकीय इमारत निर्माण होणार असून हे काम उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण व लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज  दिले.

चिखलदरा व धारणी येथे प्रत्येकी सुमारे 15 कोटी निधीतून नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करताना त्या बोलत होत्या. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि. प. अध्यक्ष बबलुभाऊ देशमुख, माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, हरिभाऊ मोहोड , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुणाल पिंजरकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मेळघाटसह जिल्ह्यात सर्वदूर पायाभूत सुविधांच्या कामांना चालना देण्यात आली आहे.  नवीन प्रशासकीय इमारतीमुळे धारणी व चिखलदरा येथे एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे. हे काम विहित मुदतीत पूर्ण करावे. काम गुणवत्तापूर्ण असावे. कामाशी तडजोड होता कामा नये. कामात विलंब खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

चिखलदरा व धारणी या तालुक्यांच्या ठिकाणी आदिवासी बांधव प्रशासकीय कामांसाठी दुरदूरून येत असतात. त्यांच्या निवाऱ्याची सुविधा उभारण्यात यावी. त्याचप्रमाणे, आवश्यक कामांचे प्रस्ताव द्यावेत. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी  ग्वाही त्यांनी दिली.

मेळघाटात पेयजल व इतर आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही व्हावी. त्यादृष्टीने प्रशासनाने कामांना गती द्यावी.  मेळघाटातील समस्यांचे निराकरण व विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी पालकमंत्री कार्यालयातही स्वतंत्र डेस्कची निर्मिती करण्यात येईल. त्याचप्रमाणे, धारणी पंचायत समितीच्या इमारतीचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मेळघाटात दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणी उत्तम इमारती उभ्या राहणार आहेत. चिखलदरा व धारणी येथील दोन्ही  इमारती प्रशस्त व सर्व सुविधायुक्त असतील. हे काम एका वर्षात पूर्ण व्हावे, असे आमदार श्री. पटेल यांनी सांगितले.

कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000



शुक्रवार, ६ मे, २०२२

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

 

विभागीय लोकशाही दिन सोमवारी

 

अमरावती, दि. 06:- दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने दि. 9 मे रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी शासकीय विभागाशी निगडित आपल्या तक्रारी, गाऱ्हाणी इ. संदर्भातील प्रकरणे, निवेदन लेखी स्वरुपात सादर करावे. नागरिकांनी त्यांच्या तक्रारीं पोस्टाद्वारे, dcgamravati@gmail.com/dcg_amravati@rediffmail.com या संकेतस्थळावर किंवा व्यक्तीश: विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहावे. तसेच उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधक उपायांचे पालन करावे असे  विभागीय उपआयुक्त संजय पवार यांनी कळविले आहे.