बुधवार, ६ जुलै, २०२२

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 9 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी

9 रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

अमरावती दि.6(विमाका) सुशिक्षित युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या व युवकांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण व्हावी यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्त कार्यालय, व आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, यांच्यावतीने दि. 9 जुलै 2022 रोजी ऑफलाईन पद्धतीने विभागीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा विद्यापीठ परिसरात असलेल्या डॉ. के. जी. देशमुख सभागृहात सकाळी दहा वाजता सुरु होणार असुन विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी या मेळाव्याच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

            या रोजगार मेळाव्यात महिंद्रा ॲण्ड महिंद्रा लि., नवभारत फर्टिलायझर नागपूर, बडवे इंजिनिअर्स, मा. ज्योतिबा फुले मागासवर्गीय बहुद्देशिय संस्था, टॉलेंसेतु सर्व्हिस प्रा. लि., बजाज इलेक्ट्रीकल्स, मेगाफिड,  बंनस्वरा स्निटेक्स लि., अलोक इंडक्ट्री लि. टेक्नोक्राफ्ट फॅशन लि., लाईफ इंश्युरंन्स व टिम प्लस एच. आर. या दहा कंपन्यांमधील  रिक्त असलेल्या विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड या रोजगार मेळाव्यात करण्यात येणार आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या पात्र उमेदवारांनी सेवायोजन कार्ड, निवडणूक ओळखपत्र/आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या प्रती व लेखी परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक साहित्य सोबत आणावे असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन अधिकारी प.भ. जाधव यांनी कळविले आहे.

                                                                    000000

 

‘पूर्णा’ चे नऊ व ‘घुंगशी बॅरेज’ प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले

 

‘पूर्णा’ चे नऊ व ‘घुंगशी बॅरेज’ प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले

 

विभागातील विविध प्रकल्पांत जलाशय पातळी

अमरावती दि.6 (विमाका) : विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने दि. ६ जुलै २०२२ रोजी सकाळी ७ वाजता दिलेल्या माहितीनुसार अमरावती प्रादेशिक विभागातील मोठ्या व मध्यम प्रकल्पांतील दैनिक जलाशय पातळी व पाणीसाठा अहवाल खालीलप्रमाणे.

अहवालानुसार, पूर्णा मध्यम प्रकल्पात आज दिनांक 6 रोजी जलाशय पातळी 449.01 मी. आहे. या प्रकल्पाचे नऊ दरवाजे 10 सेमी वर उचलण्यात आले आहेत. अकोला येथील घुंगशी बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे वर उचलण्यात आले आहेत. या प्रकल्पात आजची जलाशय पातळी 257.40 मी. आहे.

विभागातील मोठ्या प्रकल्पातील जलाशय पातळी खालीलप्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा (338.98), यवतमाळ जिल्ह्यातील पुस प्रकल्प (389.99), अरुणावती (325.67), बेंबळा (266.10), अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा (342.20), वान (397.98), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा (288.78), पेनटाकळी (555.05), खडकपूर्णा (516.51).

मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी खालीलप्रमाणे (मी.मध्ये)

अमरावती जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातील जलाशय पातळी शहानूर (437.90), चंद्रभागा (497.85), पूर्णा (449.01), सपन (504), पंढरी (424.76), गर्गा (344.10), यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस (303.14), अडाण (376.62), सायखेडा (270.97), गोकी (312.68), वाघाडी (315.10), बोरगांव (315.60), नवरगांव (251.62), अकोला जिल्ह्यातील  निर्गुणा (384.55), मोर्णा (361.70), उमा (338.80), घुंगशी बॅरेज (257.40), वाशिम जिल्ह्यातील सोनल (448.60), एकबुर्जी (144), बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा (400.40), पलढग (397.75), मस (321.85), कोराडी (544.90), मन (369.70), तोरणा (401.30), उतावळी (365.30) आहे.   

000000

मंगळवार, ५ जुलै, २०२२

अतिवृष्टीमुळे चांदूर बाजार तालुक्यात घरांचे नुकसान तात्काळ पंचनामे करण्याबाबत पथकाला सुचना

 

अतिवृष्टीमुळे चांदूर बाजार तालुक्यात घरांचे नुकसान

 तात्काळ पंचनामे करण्याबाबत पथकाला सुचना

 

अमरावती दि.5 (विमाका) : आज दिनांक 5 रोजी चांदुर बाजार तालुक्यात अतिवृष्टी झाली. तालुक्यातील टिपू सुलतान चौक, रामभट लेआऊट, राऊत पूरा, ताजनगर या परिसरामध्ये अंदाजे 390 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पावसाचे पाणी जास्त प्रमाणात घराता शिरल्यामुळे काही घरांचे अंशता: व काही घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. घरामध्ये पाणी साचल्यामुळे अन्नधान्याचे,कपड्यांचे व इतर वस्तुंचे काही प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील बाधीत कुंटुंबाना नगर परिषद उर्दु शाळा व नगर परिषदेच्या टाऊन हॉलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. बाधीत नागरीकांची जेवण्याची व तात्पुरती निवासाची व्यवस्था प्रशासनाकडुन करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याबाबत पथक नेमण्यात आले आहे. पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पार पाडण्यात यावी अशा सुचना प्रशासनाकडुन देण्यात आल्या आहेत. पंचनामे प्राप्त होताच अंतिम अहवाल सादर करण्यात येईल अशी माहिती चांदूर बाजारचे तहसिलदार यांनी दिली आहे.

0000000

 

प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

 





प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

        अमरावती दि. 5 (विमाका) : जास्तीत जास्त गोवंशाना टॅग करुन जनावरांसाठी  सुरक्षितता निर्माण करण्यात यावी. गोवंशाच्या रक्षणासाठी पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्याची  जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सुचना जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी सभागृहात प्राणिक्लेश प्रतिबंधक समीतीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

पोलिस अधिक्षक(ग्रामीण) अविनाश बारगळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, सहायक आयुक्त डॉ. राजीव खेरडे, महापालिकेचे पशु वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन बोंद्रे, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत राजे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते, विस्तार अधिकारी(शिक्षण) अशोक रामटेके आदी उपस्थित होते.

 

येत्या रविवारी बकरी ईद हा सण येत असुन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने मनुष्यबळाचे नियोजन करुन जिल्ह्यातील अधिकृत पशुवधगृहामध्ये जनावरांची तपासणी करावी. जनावरे विक्री बाबतची माहिती पोलीस प्रशासनाने घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करावी. प्राणी क्लेश प्रतिबंध कायद्यानुसार अधिकाधिक कारवाया व्हाव्यात. याबाबत जनजागृती करण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील स्थानिक नागरिंकाचा सहभाग घ्यावा व उपक्रम राबविण्यात यावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.  

 

प्राणी निवारण केंद्रात सुविधा निर्माण कराव्या

महापालिका क्षेत्रामध्ये प्राणी क्रुरता अधिनियम व प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत प्राणी निवारण केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. यासाठी अतिरीक्त निधी जिल्हा नियोजनमधुन देण्यात येईल. तसेच या प्राणी निवारण केंद्रात दाखल करण्यात आलेल्या प्राण्यांना औषधोपचार, लसीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. जास्तीत जास्त मोकाट कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्याबाबत नियोजन करण्यात यावे असे श्रीमती कौर यांनी सांगितले.

ग्रामीण पोलीस विभागाने नाकाबंदी व मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत ४५८ जनावरांना गोशाळेत दाखल करण्यात आले. जखमी व आजारी जनावरांवर त्वरीत उपचार करण्यात आले. अशी माहिती संबंधितांनी दिली. अशा कारवाईंबाबतची माहिती पोलीस प्रशासनाने पशुसंवर्धन कार्यालयाला देण्यात यावी. या अहवालाच्या आधारे पशुसंवर्धन विभागाने पोलीस प्रशासनाशी समन्वय साधण्याच्या सुचना श्रीमती कौर यांनी दिल्या.

0000000

आकांक्षा कौशल्य विकास प्रकल्पातंर्गत महिलांसाठी रोजगाराविषयक प्रशिक्षण प्रवेश परिक्षेसाठी नोंदणी करावी

 

आकांक्षा कौशल्य विकास प्रकल्पातंर्गत

महिलांसाठी रोजगाराविषयक प्रशिक्षण

प्रवेश परिक्षेसाठी नोंदणी करावी

 

         अमरावती दि. 5 (विमाका) अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम येथील रहिवासी महिलांना रोजगाराच्या माध्यमातुन आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आकांक्षा (कौशल्यातून जिवनोन्नतीकडे) या कौशल्य विकास प्रकल्पातंर्गत ॲडव्हांस डिप्लोमा इन सॉफ्टवेअर पा्रग्रामिंग या कोर्सचे प्रशिक्षणाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी येथे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात संभाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकासावर भर देण्यात येणार असून प्रशिक्षित व तज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रवेश परिक्षेसाठी नोंदणी 5 जुलै 2022 पासून सुरु होणार असून त्यामध्ये प्रशिक्षण प्रवेशाकरिता ऑनलाईन, ऑफलाईन परिक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परिक्षा दि. 10 ते 23 जुलै 2022 या कालावधीत व ऑफलाईन परिक्षा दि. 24 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेश परिक्षेमध्ये चाळणी परिक्षा, इंग्रजी, सामान्य गणित व मुलाखत आदी घटकांचा समावेश असणार आहे.

नामांकित कंपनी, स्टार्टअप मध्ये रोजगाराची संधी प्रशिक्षणार्थी महिलांना उपलब्ध करुन देण्यात येणार असुन हे प्रशिक्षण महिलांकरिता निशुल्क व निवासी स्वरुपाचे आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 18 महिने पर्यत असणार आहे. प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी महिलांचे वय 17 ते 28 वर्षे असावे व किमान शैक्षणिक पात्रता बरावी पास (विज्ञान, कला, वाणिज्य) आयटी आय पास असणे आवश्यक आहे.

           प्रवेशासाठी महिलांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या अमरावती येथील 9405102600,07212-566066, बुलडाणा-9757086603, 07262-242342, अकोला-8275369800, 07242-433849, यवतमाळ-837998798, 07232-244395, वाशिम-9096855798, 07252-231494 या कायालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडुन कळविण्यात आले आहे. 

 

0000000

 

शुक्रवार, १ जुलै, २०२२

विभागीय माहिती कार्यालयाचे वाहनचालक विजय आठवले यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

 







विभागीय माहिती कार्यालयाचे वाहनचालक

विजय आठवले यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

 

अमरावती दि. 01 : अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयातील वाहन चालक विजय आठवले  यांना सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्ती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रभारी उपसंचालक (माहिती) हर्षवर्धन पवार अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त श्री आठवले यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला सहाय्यक संचालक अपर्णा यावलकर, माहिती सहाय्यक पल्लवी धारव, लेखापाल विजया लोळगे, मनोज थोरात, सुनील काळे, लिपिक दिनेश धकाते, योगेश गावंडे, रुपेश सवाई, वैशाली ठाकरे, कोमल भगत, गजानन परटके, कॅमेरामन नितीन खंडारकर, चंद्रकांत पाटील, कुमार हरदुले, छायाचित्रकार मनीष झिमटे, सागर राणे, वाहनचालक गणेश वानखेडे, हर्षल हाडे, सुधिर पुनसे, संदेश वाहक दिपाली ढोमणे, गजानन पवार, राजश्री चोरपगार, प्रतिक वानखेडे, कांचन अंधारे आदी उपस्थित होते.

श्री आठवले यांच्या निरोप समारंभानिमित्त कार्यालयातील सहकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या, तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्री आठवले यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. पल्लवी धारव यांनी सूत्रसंचालन केले.

00000

समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करावे

 

समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी

विद्यार्थ्यांनी अर्ज करावे

अमरावती दि. 1 (विमाका) – अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी , इयत्ता दहावी व अकरावी उत्तीर्ण तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक/व्यावसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व ‍द्वितीय वर्षांच्या प्रवेशीत विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याप्रमाणे, तालुका स्तरावर मुला/मुलींचे शासकीय वसतिगृहामध्ये इयत्ता आठवी पासुन ते पुढील अभ्यासक्रमाकरिता प्रवेश अर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु झाली आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक 25 जुलै, 2022 इयत्ता दहावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 30 जुलै 2022 आणि बी. ए./बी. कॉम/बी.एस.सी अश्या बारावी नंतरचे अभ्यासक्रमांकरिता प्रथम  वर्षांचे पदवीका/पदवी, एम.कॉम./एम.एस.सी असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, अभ्यासक्रम (व्यावसयीक अभ्यासक्रम वगळुन) प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत ही दिनांक 24 ऑगस्ट 2022 पर्यंत आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दिनांक 30 सप्टेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून न्याहारी, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येईल.

विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहांत प्रवेश घ्यायचा असेल तेथुनच अर्ज प्राप्त करुन आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. विद्यार्थ्यांनी आपले अर्ज विहीत वेळेत परिपूर्ण माहितीसह संबंधित वसतिगृहातच सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित शासकीय वसतिगृह तसेच संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री. सुनिल वारे, प्रादेशिक उपयुक्त समाज कल्याण विभाग अमरावती यांनी कळविले आहे.

                                                                   00000

लेख- आला पावसाळा, तब्बेत सांभाळा पावसाळी आजाराला प्रतिबंधसाठी उपाययोजना

 

लेख 

आला पावसाळा, तब्बेत सांभाळा

पावसाळी आजाराला प्रतिबंधसाठी

उपाययोजना

         अमरावती दि. 1 (विमाका)- पावसाळा हा ऋतु बालंकापासुन वृद्धांपर्यंत सर्वांना हवाहवासा वाटतो. या  काळात स्वच्छता व आरोग्याची निगा राखणे महत्त्वाचे असते. संसंर्गजन्य आजारही पावसाळ्यात उद्भवतात. त्याच्या प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत  सांगताहेत अमरावतीचे उदरविकार तज्ज्ञ डॉ. पंकज इंगळे.

 

पावसाळ्यात विविध संसंर्गजन्य आजारांपासुन रक्षण करण्यासाठी आणि निरोगी राहुन पावसाचा आनंद घेण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती

पावसाळ्यात होणाऱ्या आजारांच्या लक्षणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अन्यथा आजार वाढून त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आजार वा संसर्ग अंगावर काढू नका. डॉक्टरी सल्ल्यांशिवाय केलेले घरगुती उपचार जीवावर बेतू शकतात त्यामुळे तातडीने डॉक्टरांची मदत घ्या. पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्याची समस्या उद्भवते आणि त्यामुळेच अतिसारासारख्या रोगांचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. अतिसाराच्या लक्षणांमध्ये पुढील बाबींचा समावेश असतो. नॉशिया, उलट्या होणं आणि वारंवार शौचाला पातळ होणं. उपाय अतिसारावर करावयाचा घरगुती उपाय म्हणजे ओआरएस पॅक देणं किंवा मीठ, साखर घालून पाणी देणं. रुग्णाच्या जेवणात मोठ्या प्रमाणावर टोस्ट, सफरचंद, केळ, शिजलेला भात, लॅक्टोबॅसिलस युक्त दही यांचा समावेश असावा. जर दोन दिवसात काही सुधारणा झाली नाही तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

कॉलरा

पावसाळ्यातील अजून एक आजार. व्हिब्रिओ जीवाणूपासून कॉलराची लागण होते. दुषित अन्न व पाणी प्यायल्याने हा आजार होऊ शकतो. अचानक डिहायड्रेशन होऊन जुलाबावाटे शरीरातील पाणी कमी होऊन अशक्तपणा येणे हे याचे प्राथमिक लक्षण. तसेच पिण्याच्या पाण्यात उंदीर पडून मेल्याने किंवा पडल्याने पाणी दुषित होऊन हा आजार पसरतो. साथीचा तापः साथीचा आजार हा सर्वसाधारण वर्षभर कधीही होऊ शकतो, परंतु पावसाळ्यात अधिक प्रमाणात दिसून येतो. तीन ते सात दिवस सर्दी, खोकला, ताप असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

लेप्टोस्पायरासिस

उंदराच्या मूत्रविसर्जनातून हा जीवाणू गढूळ पाण्यात शिरतो. या पाण्यातून चालताना पायाला झालेल्या जखमा व छोट्या चिरांमधून जंतुसंसर्ग होतो. ताप येणं, डोळे लाल होणं, यकृतदाह, कावीळ व मूत्रपिंडाच्या कामात बाधा येणं ही त्याची लक्षणं. प्रत्येक वेळी मुलांना घराबाहेर पाठवताना गमबूट घालणं शक्य नाही. त्यामुळे गढूळ पाण्यात मुलांना खेळू न देणं तसंच घरी आल्यावर पाय स्वच्छ धुणं आणि पायांवरील छोट्या-मोठ्या जखमांवर त्वरित औषधोपचार करणं हा लेप्टोच्या प्रतिबंधाचा सोपा उपाय आहे.

पोटाचा संसर्ग

उलटी, जुलाब आणि पोटदुखी हे सर्वसाधारण पोटाच्या संसर्गाची लक्षणे व या वातावरणात पोटदुखीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अस्वच्छ अन्नपदार्थ किंवा द्रवपदार्थांचे सेवन केल्याने पोटाचा संसर्ग होण्याची शक्यता दिसून येते. म्हणून शक्यतोवर पाणी उकळून प्यावे, तसेच घरतील अन्नपदार्थ खाणे व जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यास चांगले.

कावीळ

अशुध्द पाणी व अन्न यामुळे पावसाळ्यात कावीळ हा आजार हमखास होऊ शकतो. थकवा, लघवीचा व डोळ्यांचा रंग पिवळसर होणे, उलटी, यकृतामध्ये बिघाड आदी लक्षणे दिसून आल्यास कावीळीची शक्यता व्यक्त केली जाते. डोळे लालसर होणे हे ही एक महत्त्वाचे लक्षण म्हणून पाहिले जाते. कावीळ मुख्यत्वे विषाणू ए आणि ई मुळे होते. लहान मुले व गरोदर महिलांमध्ये कावीळ आजाराबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असून दीर्घकालीन कावीळीबाबत अतिदक्षता आवश्यक आहे. तसेच पायांना सूज आल्यासही दुर्लक्ष करू नये.

मलेरियाची लक्षणं

पोटात दुखणं, थंडी वाजणं आणि घाम येणं, अतिसार, नॉशिया आणि उलट्या, ताप चढणं, स्नायू दुखणं आणि चक्कर येणं. मलेरिया होऊ नये याकरता कोणती काळजी घ्यावी. लांब हाताचे कपडे घाला, डासांना प्रतिबंध करण्यासाठी मच्छरदाणी तसंच औषधांचा उपयोग करा. पाणी साठून राहाणार नाही याची काळजी घ्या. जर दोन दिवसांपासून एखाद्या व्यक्तीला बराच ताप चढत असेल तर रुग्णाला डॉक्टरांकडे नेणे आवश्यक आहे.

डेंग्यूची लक्षणं

अचानकपणे खूप ताप येणं, तीव्र डोकेदुखी, डोळ्यामागे दुखणं, सांधे आणि स्नायू खूप दुखणे, नॉशिया, उलट्या, त्वचेवर ऍलर्जी उठणं, ताप आल्यानंतर तीन ते चार दिवसांनी ती दिसून येतात.

मलेरिया, डेंग्यू

मलेरियामध्ये दर एक दिवसाआड थंडी भरून ताप येतो. पण लहान मुलांमध्ये उलट्या, जुलाब, रोज एकदा किंवा दोनदा ताप येणं अशा लक्षणांमुळे निदानात संदिग्धता निर्माण होते. डेंग्यूचा विषाणू एडिस नावाच्या डासामार्फत होतो. तीव्र ताप, हात- पाय मोडून येणं आणि अंगावर विशिष्ट प्रकारचे पुरळ येणं ही या आजाराची लक्षणं. विषाणूंमुळे होत असल्याने हा आजारही स्वनियंत्रित असतो, मात्र अनेकदा गुंतागुंत होण्याची शक्यता ताप उतरताना असते. म्हणून डॉक्टरमंडळी एकापेक्षा अधिक वेळा रक्तचाचणीचा सल्ला देतात. या दोन्ही आजारांवर प्रतिबंधक लस नाही. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डासांची वाढ होत असल्याने पाणी साठू न देणं हा चांगला उपाय. याशिवाय कीटकनाशक औषधांची फवारणी आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी मॉस्किटो रिपेलन्ट क्रीम, मच्छरदाणी असे उपाय करावेत. मुलांना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत.

 

                                                                                                                डॉ. पंकज इंगळे

                                                                                                                   एम.डी.(औषधशास्त्र)

                                                                                                          अमरावती.

 

000000

हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकासाची योजना

 

हातमाग विणकरांसाठी कौशल्य विकासाची योजना

अमरावती दि. 1 (विमाका) - केंद्र शासनामार्फत समर्थ योजनेअंतर्गत दिलेल्या निर्देशाप्रमाणे हातमाग विणकर, वस्त्रोद्योग क्षेत्रातील हातमाग हस्तकला व ज्युटपासुन वस्तु, वस्त्र निर्मिती करणे याबाबत कौशल्य विकास करण्याकरीता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेबाबतचे सर्व तपशिल व दिशा निर्देश Samarth-textiles.gov.in या वेब साईटवर उपलब्ध आहेत.

            या योजनेअंतर्गत समर्थ प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था/अशासकीय संस्था/ट्रस्ट/कंपनी/इतर सेवाभावी संस्था व वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र असल्यास प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग विभागातील संस्था पात्र असल्यास प्रादेशिक उपआयुक्त वस्त्रोद्योग, नागपूर नवीन प्रशासकीय इमारत क्र. 2, बी विंग, 8 वा मजला सिव्हील लाईन्स, नागपूर या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग श्रीमती सीमा पांडे यांनी कळविले आहे.

000000

गुरुवार, ३० जून, २०२२

सुसर्दा येथे खवल्या मांजराची शिकार, अवघ्या तीन तासात आरोपी अटकेत

 

                               सुसर्दा येथे खवल्या मांजराची शिकार

            अवघ्या तीन तासात आरोपी अटकेत

अमरावती, दि. 30  : सुसर्दा गावात खवल्या मांजराची (पॅंगोलिन)  शिकार करणा-या आरोपींना तीन तासांत जेरबंद करण्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाला यश मिळाले.

    परतवाड्याच्या मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यातील बुधवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास धारणी येथील वनपरिक्षेत्र अधिका-यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडून संदेश प्राप्त झाला. सुसर्दा गावात खवल्या मांजराची शिकार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली असून, त्याची शहानिशा करण्याचे आदेश वनसंरक्षक कार्यालयातर्फे देण्यात आले. या माहितीचा तपास धारणी वनपरिक्षेत्र अधिका-यांनी सुरू केला व माहितीत तथ्य असल्याचे परिसरातील गोपनीय सूत्रांकडून निश्चित झाले.  

    दरम्यान, याबाबत एक छायाचित्रही तपास पथकाला प्राप्त झाले. या छायाचित्रात दिसत असलेले ठिकाण सुसर्दा गावात कुठे आहे किंवा कसे, याचा तपास पथकाने सुरू केला. त्यानंतर तशी जागा एका घरामागे आढळली. त्यानुसार पथकाने तेथील रहिवाशी झनकलाल बाट् कास्देकर यांना ताब्यात घेतले. चौकशीत झनकलाल कासदेकर यांनी कबुली दिली. 

    तीनजणांनी मिळून खवल्या मांजर मारले व मेलेले खवले मांजर घरी घेऊन गेले व नंतर शेतात जाऊन काही लोकांनी वाटून ते खाल्ले असल्याचे चौकशीदरम्यान समोर आले.

 आरोपीच्या बयाणानुसार, त्याच्या घरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या शेतात दर्शविलेल्या जागेवर जाऊन शोध घेण्यात आला. तेथील बांधावर दगडांच्या खाली प्लास्टिकच्या पिशवीत मांजराचे खवले ठेवल्याचे आढळले. ते तत्काळ जप्त करण्यात आले. याबाबत आरोपी झनकलाल बाट् कासदेकर व झनकलाल मुन्शी कासदेकर यांनी कबुलीजवाब दिला. हा गुन्हा दि 19 जूनला घडल्याचे आरोपींनी सांगितले. त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा जारी करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना धारणी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपास व कार्यवाही सुरु आहे.

                                                                          0000000