सोमवार, ६ जून, २०२२

पंतप्रधानांच्या हस्ते ‘आयकॉनिक वीक’चा दिल्लीत शुभारंभ

 आझादी का अमृत महोत्सव

पंतप्रधानांच्या हस्ते ‘आयकॉनिक वीक’चा दिल्लीत शुभारंभ

अमरावतीत कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण; सीएभवनात कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

अमरावती दि. 06 (विमाका): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रमात ‘आयकॉनिक वीक’चा शुभारंभ नवी दिल्लीत विज्ञानभवनात आज झाला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व विशेष कार्यक्रम प्रधान मुख्य प्राप्तीकर आयुक्त कार्यालयातर्फे अमरावतीतील सीएभवनात घेण्यात आला. त्याला शहरातील अनेक मान्यवर, बँकर्स, सीए, अधिवक्ते, आर्थिक विश्लेषक, अभ्यासक आदींची मोठी उपस्थिती होती.

दिल्लीत प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत होणा-या समारंभाचे थेट प्रसारण देशातील 75 प्रमुख शहरांत करण्यात आले. त्यात अमरावतीचाही समावेश होता. नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी सहाय्यकारी ठरणा-या जन-समर्थ पोर्टलचा शुभारंभ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झाला. देशातील सर्वच क्षेत्रांत सर्वसमावेशक विकासप्रक्रियेला गती देण्यासाठी जनसमर्थ पोर्टल उपयुक्त ठरेल. विविध मंत्रालयांच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी गरजू व्यक्तींना पोर्टलची मदत होईल. यामुळे योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसह युवकांमध्ये उद्यमशीलता वाढीस लागेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.  

 प्राप्तीकर उपायुक्त प्रमोद शाहाकार, सह प्राप्तीकर आयुक्त तुषार इनामदार, अमरावती सीए संस्थेचे उपाध्यक्ष विष्णुकांत सोनी, सचिव मधुर झंवर, टॅक्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश मुंधडा, सचिव संदिप अग्रवाल, चेंबर ऑॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष सुरेश जैन, लीड बँकेचे व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा, प्राप्तीकर अधिकारी साधना देवपुजारी, चेतन देशमुख, आलम हुसेन आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय अर्थ मंत्रालय व कॉर्पोरेट कार्य मंत्रालयांतर्गत विविध प्रशासकीय सुधारणा, त्याची देशाच्या आर्थिक विकासातील भूमिका यांचे दर्शन या कार्यक्रमातून घडले. यावेळी डिजीटल प्रदर्शनाचा शुभारंभ व विविध मूल्यांच्या पाच नाण्यांच्या विशेष आवृत्तीचे लोकार्पण पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते झाले. ‘मनी फ्लोज, नेशन ग्रोज’ हा लघुपटही यावेळी दाखवला गेला.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, वित्तीय सेवा विभाग, महालेखानियंत्रक, अरूण जेटली राष्ट्रीय वित्तीय प्रबंधन संस्था, अर्थ मंत्रालय, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या विविध विभागांद्वारे आजपासून 11 जूनपर्यंत अनेक कार्यक्रम आयोजिण्यात आले आहेत, असे श्री. शाहाकार यांनी यावेळी सांगितले.

00000





गुरुवार, २ जून, २०२२

अमरावती-अकोला दरम्यान महामार्गावर होणार काँक्रिटच्या सर्वात लांब रस्त्याची अखंडपणे निर्मिती

 

अमरावती-अकोला दरम्यान महामार्गावर होणार

काँक्रिटच्या सर्वात लांब रस्त्याची अखंडपणे निर्मिती

 

अमरावती दि. 02 (विमाका): ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त राष्ट्रीय महामार्गावर बिटुमिनस कॉक्रिटच्या सर्वात लांब, रस्त्याची अखंडपणे निर्मिती या श्रेणीअंतर्गत माना कॅम्प, अमरावती, छ. 193+100, तहसिल-मूर्तिजापूर, जिल्हा- अकोला, येत्या 3 ते 7 जूनदरम्यान सलग 72 तास काम करुन 80 किलोमिटर लेंथचे काम करण्याची योजना आखण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर (पूर्वीचा क्रमांक सहा) अमरावती ते चिखलीदरम्यान चार टप्प्यात काम सुरु आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत (NHAI) अमरावती-चिखली विभागात, लोणी गावाजवळ, रस्त्याची अखंडपणे निर्मिती करुन ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हे काम राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. तर्फे शुक्रवार 3 जून 2022 रोजी सकाळी 6 वाजता सुरु होईल आणि मंगळवार 7 जून, 2022 पर्यंत अखंड सुरु राहील.

त्यामुळे अमरावती-अकोल्यादरम्यान कमी वेळात अधिक काम करण्याची योजना कंत्राटदार कंपनीने आखली आहे. त्यानुसार दि. 3 जून रोजी सकाळी सात वाजाता या कामाला सुरुवात होणार आहे. दि. 7 जूनपर्यंत सलग कॉक्रिटीकरणाचे काम करुन 70 ते 80 किलोमिटर लेंथचे काम करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

000000

बुधवार, १ जून, २०२२

विभागीय माहिती कार्यालयाचे वाहनचालक रविंद्र तिडके यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

 

विभागीय माहिती कार्यालयाचे वाहनचालक

रविंद्र तिडके यांना सेवानिवृत्तीनिमित्त निरोप

 

अमरावती दि. 01 : अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालयातील वाहन चालक रविंद्र तिडके  यांना सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्ती निमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्रभारी उपसंचालक (माहिती) हर्षवर्धन पवार अध्यक्षस्थानी होते. सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त श्री तिडके यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला सहाय्यक संचालक अपर्णा यावलकर, माहिती सहाय्यक पल्लवी धारव, लेखापाल विजया लोळगे, प्रदर्शन सहाय्यक विश्वनाथ धुमाळ, मनोज थोरात, सुनील काळे, लिपिक दिनेश धकाते, योगेश गावंडे, रुपेश सवाई, वैशाली ठाकरे, कोमल भगत, गजानन परटके, कॅमेरामन नितीन खंडारकर, चंद्रकांत पाटील, छायाचित्रकार मनीष झिमटे, सागर राणे, वाहनचालक विजय आठवले, गणेश वानखेडे, हर्षल हाडे, संदेश वाहक दिपाली ढोमणे, गजानन पवार, राजश्री चोरपगार, प्रतिक वानखेडे आदी उपस्थित होते.

श्री तिडके यांच्या निरोप समारंभानिमित्त कार्यालयातील सहकाऱ्यांनी भावना व्यक्त केल्या, तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्री तिडके यांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. पल्लवी धारव यांनी सूत्रसंचालन केले. विश्वनाथ धुमाळ यांनी आभार मानले.

00000

  

 

कृषी निविष्ठांचे गुणनियंत्रण करण्यासाठी विभागस्तरावर भरारी पथकाची स्थापना

 

कृषी निविष्ठांचे गुणनियंत्रण करण्यासाठी विभागस्तरावर

भरारी पथकाची स्थापना

अमरावती, दि. 1 (विमाका) : सन 2022-2023 खरीप व रब्बी हंगामाध्ये गुणवत्ता नियंत्रण कामासाठी अमरावती विभागातील शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा (बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके) दर्जेदार व योग्य दराने उपलब्ध होण्याकरीता कृषि विभागामार्फत विभागस्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.

विभागस्तरावर पथक प्रमुख आर. एस. जानकर, तंत्र अधिकारी (गुण्नियंत्रण), ए. एस. मस्करे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक, ए. डी. तांबे, कृषि अधिकारी (निविष्ठा) व एस. के. केवले, एस. एस. दलाल, निरिक्षक, वैद्य मापनशास्त्र यांचा समावेश आहे.

संबंधित अधिकारी/कर्मचारी यांचे नाव, पदनाम, भमणध्वनी क्रमांक पुढीप्रमाणे आहे.

श्री. आर. एस. जानकर, तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण), प्रथक प्रमुख, 0721-2552422, भ्रमणध्वनी क्रमांक 9763158836, श्री. ए. डी. तांबे, कृषि अधिकारी (निविष्ठा) सदस्य, 0721-2552422, भ्रमणध्वनी क्रमांक 730896629, श्री. एस. के. केवले, श्री. एस. एस. दलाल, निरिक्षक, वैद्यमापनशास्त्र, विभागीय कार्यालय, अमरावती 0721-2663291, भ्रमणध्वनी क्रमांक 9422181891, भ्रमणध्वनी क्रमांक 9423844887  श्री. ए. एस. मस्करे, विभागीय गुणवत्ता नियंत्रण, निरिक्षक, सदस्य सचिव, भ्रमणध्वनी क्रमांक 7588080633 आहे.

या खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे खते, किटकनाशके या निविष्ठाबाबत काही अडचणी असल्यास, वरीलप्रमाणे पथकास संपर्क साधावा, असे आवाहन किसन मुळे, विभागीय कृषि सहसंचालक, अमरावती यांनी कळविले आहे. 

                                                         000000

 

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती, उत्कृष्ठ उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करावा - बच्चूभाऊ कडू

 













शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या

घरगुती, उत्कृष्ठ उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांचा वापर करावा

-         बच्चूभाऊ कडू

चांदुर बाजार येथे आज बियाणे महोत्सव

70 शेतकऱ्यांनी केली बियाणे विक्री साठी नोंद

अमरावती, दि. 1 (विमाका) : शेतकऱ्यांनी  उगवण क्षमतेची खात्रीशीररित्या तपासणी केलेले घरचे बियाणे वापरावे. बियाणे महोत्सवाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी शेतकऱ्यांना खात्रीशीर व उत्कृष्ठ उगवणक्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणार असून शासन खंबिररित्या शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले.

चांदुर बाजार येथील प्रहार कार्यालयाच्या प्रांगणात बियाणे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान, चांदुर बाजारच्या तालुका कृषी अधिकारी फाल्गुनी ननिर, अचलपूरच्या तालुका कृषि अधिकारी स्नेहल ढेंबरे आदी उपस्थित होते.

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बियाणे घरीच तयार करावे. याबाबत शास्त्रीय पद्धतीने बियाणे तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रशिक्षण आयोजीत करण्यात येणार असल्याचे श्री. कडू यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी उत्कृष्ठ उगवणक्षमता असलेले बियाणे घरीच तयार करुन बियाणे महोत्सवाच्या माध्यमातुन ही चळवळ राबवावी. बीज उत्पादक शेतकऱ्यांना सर्व सुविधा पुरविणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री श्री कडू यांनी यावेळी दिली.

महोत्सवाचे वैशिष्ट्य

बियाणे महोत्सवात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ बियाणे विक्रीसाठी सहभागी झाले होते. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे नाही त्यांच्यासाठी घरचे उत्पादीत केलेले दर्जेदार बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. शेतकरी बांधवांनी सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कांदा, भुईमुंग, भाजीपाला व इतर बियाणे वाजवी दरात उपलब्ध केली होती.

महोत्सवात अनेक स्टॉल्सचा समावेश

महोत्सवात बेलोरा बीजोत्पादक व शेतकरी उत्पादन कंपनी व कृषी विभागाचे स्टॉल्स लावण्यात आले. कल्चरयंत्र म्हणजेच पेरणीपूर्वी बियाण्यांवर करण्यात येणाऱ्या प्रक्रिया यंत्राच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.  शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या प्रतवारी प्रक्रियेची यावेळी माहिती घेतली. बीजप्रक्रियेसाठी ड्रमची व्यवस्था व औषध उपलब्ध यावेळी करून देण्यात आले. शेतकऱ्यांना वाजवी दरात बीजप्रक्रिया करून देण्याची सुविधा महोत्सवात उपलब्ध करून देण्यात आली. तसेच, जैविक बीजप्रक्रियेसाठी स्टॉल उभारण्यात आले होते. विविध जैविक बीजप्रक्रिया साहित्य विक्रीसाठी येथे उपलब्ध होते. तळवेलचे प्रगतिशील शेतकरी भालचंद्र बोंडे, बेलोराचे शेतकरी विजय कडू आदी उपस्थित होते.

उगवण क्षमतेची चाचणी होणार

शेतकऱ्यांना आपल्या जवळील बियाणे विक्री करण्यासाठी  त्यांच्या जवळील ट्रेमध्ये उगवणक्षम बियाण्यांची माहिती देण्यासाठी व तपासणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या ट्रे मध्ये विविध पिकांच्या बियाण्यांच्या उगवणीबाबत माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.

0000000


मंगळवार, ३१ मे, २०२२

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना

विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि.31 (विमाका): राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अपर विभागीय आयुक्त निलेश सागर यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपआयुक्त (महसूल) गजेंद्र बावणे, तहसिलदार वैशाली पाथरे यांचेसह अन्य विभागाचे उप आयुक्त, वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

25 मे ते 7 ऑगस्ट पर्यंत मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण वेबिनारचे आयोजन

 

25 मे ते 7 ऑगस्ट पर्यंत

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण वेबिनारचे आयोजन

अमरावती, दि.31 (विमाका): महामत्स्य अभियान २०२२ च्या औचित्याने मत्स्यव्यवसाय विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्यहंगाम पुर्वतयारी विषयावर मत्स्यव्यवसायिकांचे प्रबोधन व चर्चासत्राचे वाशिम येथे दि. २६ मे रोजी आयोजन करण्यात आले होते.

प्रादेशिक उपआयुक्त मत्स्यव्यवसाय विजय शिखरे यांनी महामत्स्य अभियान दि.२५ मे ते ७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहीती दिली. यामध्ये प्रामुख्याने मत्स्यबिज उत्पादन वाढवून आपला जिल्हा आत्मनिर्भर करण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या. मत्स्यहंगाम पुर्वतयारी, तलावटेका धोरणानुसार मत्स्यप्रजनक मत्स्यसाठा उपलब्ध करून देणे, काटेकोरपणे इष्टतम मत्स्यबोटुकली संचयन करणे, मत्स्योत्पादन वाढविणे व मत्स्योत्पादनाचे अहवाल नियमीत सादर करणे, मत्स्यव्यवसायातील प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करणे, प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेणे, किसान क्रेडिट कार्ड, इत्यादी विविध विषयांवर श्री. शिखरे यांनी तपशिलवार मार्गदर्शन केले. महामत्स्य अभियानात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मच्छिमारांना आपले जिवनमान उंचविण्याचे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.

यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. काळे यांनी जलाशयातील पिंजरा पद्धतीने मत्स्यसंवर्धन, Biofloc व RAS तंत्रज्ञानाची माहिती देऊन मत्स्यशेतीला बळकट करण्याकरीता संघटन करून मत्स्य मुल्यवर्धन, निर्यात वाढ, रोजगार निर्मिती तसेच सरासरी उत्पन्न वाढीसाठी पुढाकार घ्यावा असे सांगीतले. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अशुतोष जाधव यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजने अंतर्गत विविध घटकांची माहिती दिली. नाबार्डचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार यांनी किसान क्रेडिट कार्ड योजनेची सविस्तर माहिती देऊन यासाठी अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन केले.

चर्चासत्रामध्ये मत्स्यव्यवसायिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. तसेच त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे व शंकांचे निरसन करण्यात आले. संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून एकूण १४५ मच्छिमार संस्थांचे सभासद व कास्तकार यांनी महामम्स्य अभियानाअंतर्गत मत्स्यहंगाम पुर्वतयारी चर्चासत्रात सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती अनिता जैन यांनी केले. स्नेहा प्रबत यांनी सर्वांचे आभार मानले.

०००००००

सिंचनाकरीता पाणी उपसा परवानगी घ्यावी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे

 

सिंचनाकरीता पाणी उपसा परवानगी घ्यावी

31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करावे

अमरावती, दि.31 (विमाका)  : अमरावती पाटबंधारे प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या जलाशयातुन व जलाशयालगतचे पाणी ज्या शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनाकरिता उपसा करावयाचे आहे, त्या शेतकऱ्यांनी याबाबत परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यांनी नियोजित पाणी वापर संस्था कार्यालये किंवा वैयक्तिक पाणी उपसा परवाना करिता दि. 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज तसेच अर्जासोबत मूळ सातबारा उतारा सादर करावा. विहीत अर्जाचा नमुना उपविभागीय कार्यालयात उपलब्ध आहे.

 वरुड तालुक्यातील पाक नदी प्रकल्पाअंतर्गत येणारे क्षेत्र- 37.50 हेक्टर मौजा- खडका, पांढरघाटी, एरनवाडी, लाखारा यासाठी उपविभागीय अभियंता, अमरावती पाटबंधारे उप विभाग क्र. 3 कुऱ्हा (मु. मोर्शी) ऊर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहत मोर्शी येथे संपर्क साधावा, असे अमरावती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

00000

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज 10 जुन पर्यंत सादर करावे

 

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज

10 जुन पर्यंत सादर करावे

अमरावती, दि. 31 (विमाका) : अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याना परदेशात पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता यावे, यासाठी प्रवेश घेतलेल्या दहा विद्यार्थ्यांकडुन शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी 10 जुन पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.

आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येत असलेल्या एकलव्य रेसिडेंशियल स्कुल व शासकीय आश्रमशाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालय तसेच इतर शाळा/महाविद्यालयातील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रवेश, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय प्रवेशाच्या अर्जात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षण व शिष्यवृत्ती योजनेबाबतचा उल्लेख करण्यात यावा.

विद्यार्थ्यांसाठी विहीत नमुन्यातील अर्ज, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. दिनांक 10 जून 2022 पर्यत विहित नमुन्यातील सत्र 2022-23 चे परिपुर्ण अर्ज प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, पुसद, कळमनुरी, औरंगाबाद येथे सादर करावे, असे सुरेश वानखडे, अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती यांनी कळविले आहे.

                                                         000000

सोमवार, ३० मे, २०२२

‘पिझोमिटर’मुळे भूजल पातळीचा अचुक अंदाज करता येणार - राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

 






पिझोमिटर’मुळे भूजल पातळीचा अचुक अंदाज करता येणार

-         राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

भूजलमापक यंत्राचे राज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

 

अमरावती, दि. 30 : गेल्या काही वर्षांपासून उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे भूजल पातळीत सात्यत्याने घट होत आहे. पिण्यासाठी, सिंचन आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याची मागणी वेगाने वाढत आहे. वर्तमान परिस्थितीत भूजल साठा जतन करणे, जमिनीतील पाणी जपून वापरणे ही काळाची गरज आहे. अटल भूजल योजनेअंतर्गत पिझोमिटर (भुजल मापक यंत्र) कूपनलिका स्थापनेमुळे भूजल पातळीचा अचुक अंदाज करता येणे आता शक्य होणार असल्याचे प्रतिपादन  जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले.

चांदुर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथे पिझोमिटर कुपनलिका स्थापनेचा शुभारंभ राज्यमंत्री श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कुरळपूर्णाच्या सरपंच किरण धुर्वे, उपसरपंच मुकुंद मोहोड, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कार्यालयाचे उपसंचालक संजय कराड, वरीष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी यावेळी उपस्थित होते.

विविध शासकीय  विभागाच्या समन्वयातुन गावाचा विकास

अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल पुनर्भरण, जलसंधारण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पाण्याची बचत करण्याचे विविध उपाय लोकसहभागातून करण्यात येणार असल्याचे प्रस्तावीत आहे. प्रत्येक गावाचा जलसुरक्षा आराखडा तयार करून कृषी, महसूल, जलसंधारण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सिंचन विभाग आदी शासकीय विभाग व लोकसहभाग यांच्या समन्वयाने गावाचा विकास करण्याची अभिनव पद्धती या योजनेतून साकारण्याचा शासनाचा मानस असून या योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीमधील 207 गावांमध्ये करण्यात येणार आहे. अतिशोषित क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या वरुड, मोर्शी व चांदुर बाजार येथील भूजल पातळीत वाढ करून पाण्याची  गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी पुढील चार वर्षे ही योजना राबविण्यात येणार आहे. जागतिक बँक, अटल भूजल योजनेतंर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावाच्या जल पातळीचे सहनियंत्रण पिझोमिटर यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

यावेळी भुवैज्ञानिक प्रतिक चिंचमलादपुरे, इंद्रजीत दाबेराव, नामदेव झोंबाडे, माहिती संवाद तज्ञ दिनेश खडसे, कृषी अधिकारी नितीन तट्टे, भूवैज्ञानिक संस्था जिल्हा अंमलबजावणी भागीदारी संस्थेचे अध्यक्ष डॉ. यशवंत पांडे आदी उपस्थित होते.

 

0000000