मंगळवार, २० मे, २०२५

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करणे त्यासाठीची आवश्यक पदे उपलब्ध करून देणे आणि येणाऱ्या खर्चास मंजुरी. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions महानगर गॅस लिमिटेड कंपनीला बायोमेथेनेशन प्रकल्पासाठी देवनार येथील भूखंड सवलतीच्या दरात देण्यास मंजुरी. या जागेवर बायोमिथेशन तंत्राचा वापर करून दर दिवशी ५०० टन क्षमतेचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस उभारणी करण्यात येईल. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions उद्योग विभागातील धोरण कालावधी संपुष्टात आल्यामुळे प्रलंबित असलेल्या ३२५ प्रस्तावांना मंजुरी. यामुळे १ लाख कोटींची गुंतवणूक आणि ९३ हजार ३१७ रोजगार निर्मिती होणे अपेक्षित‍. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेस ५ हजार ३२९ कोटींची द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे हेत जल सिंचन प्रकल्पास २०२५.६४ कोटी रुपयांच्या चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यता. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील पोशीर प्रकल्पास ६३९४.१३ कोटींच्या अंदाजपत्रकाच्या प्रशासकीय मान्यता. पोशीर येथे १२.३४४ टी.एम.सी.चे धरण बांधणे प्रस्तावित. या प्रकल्पाचे पाणी मुंबई महानगर नवी मुंबई उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर या शहरांना पिण्याचे पाणी पुरविणार. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे शिलार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता. प्रकल्पांतर्गत मौजे किकवी येथे सिल्लार नदीवर ६.६१ टी.एम.सी. क्षमतेचे धरण बांधणे प्रस्तावित. #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecisions

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'शिक्षणवेध २०४७' त्रैमासिकाचे प्रकाशन

मुंबई, दि. २० : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या धोरणाच्या माध्यमातून नवकल्पना आणि संशोधनास अधिक चालना देण्यात येत आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने ‘शिक्षणवेध २०४७’ हे त्रैमासिक सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी उपस्थित होते. ‘शिक्षणवेध २०४७’ त्रैमासिकाच्या माध्यमातून विभागाच्या विविध योजना, उपक्रम, धोरणे, यशोगाथा, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे विचार, यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी कथा तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नवप्रवृत्तींचाही समावेश असणार आहे. तसेच तंत्रशिक्षण, उच्च शिक्षण, कला शिक्षण आणि ग्रंथालय संचालनालय या विभागांची एकत्रित माहिती वाचकांना उपलब्ध होणार आहे. शिक्षणवेध त्रैमासिक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व संबंधितांसाठी प्रेरणादायी आणि दिशादर्शक ठरेल.

सोमवार, १९ मे, २०२५

चेंबूरच्या श्री नारायण मंदिर समितीचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १९ : चेंबूर येथे गेल्या ६१ वर्षांपासून शैक्षणिक कार्य करीत असलेल्या श्री नारायण मंदिर समितीचे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना शिक्षित करणाऱ्या अशा संस्थांची समाजाला अधिक गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले. राज्यपालांच्या उपस्थितीत चेंबूर येथील श्री नारायण मंदिर समिती या सामाजिक शैक्षणिक संस्थेचा ६१ वा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी राज्यपाल श्री.राधाकृष्णन बोलत होते. यावेळी श्री नारायण मंदिर समितीचे अध्यक्ष एन.मोहनदास, राज्यपालांचे उपसचिव एस. राममूर्ती, समितीचे उपाध्यक्ष एस. चंद्राबाबू, इतर पदाधिकारी तसेच शिक्षक व निमंत्रित उपस्थित होते. राज्यपाल श्री.राधाकृष्णन म्हणाले की, संस्थेने नऊ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणले आहे. नारायण गुरु यांनी जातीभेद व धर्मभेद विरहित समाजाची संकल्पना मांडली व समतेचा पुरस्कार केला. त्यांची शिकवण अंगीकारली तर आपण निश्चितपणे अधिक प्रगती करु. श्री नारायण मंदिर समिती शिक्षण संस्था गेल्या सहा दशकांपासून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षणाची व्यवस्था करीत आहे. वडील दीना बामा पाटील यांच्यापासून आपण संस्थेसोबत कार्य करीत आहोत. या संस्थेच्या कार्यातून इतर शैक्षणिक संस्थांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन खासदार संजय दीना पाटील यांनी यावेळी केले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला राज्यपालांनी संस्थेच्या आवारातील श्री नारायण गुरु मंदिरात जाऊन नारायण गुरूंची आरती पूजा केली. संस्थेचे महासचिव ओ.के.प्रसाद यांनी प्रास्ताविक केले तर अध्यक्ष एम.आय.दामोदरन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. समितीचे उपाध्यक्ष एस. चंद्राबाबू यांनी आभारप्रदर्शन केले.

व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक कंपनीने डिजिटल इंडिया साकारण्यात योगदान द्यावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १९ : डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक लिमिटेड कंपनीने योगदान द्यावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या नॅशनल स्टॉक एक्सचेंजमधील नोंदणी (लिस्टिंग) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दूरदृष्य प्रणालीद्वारे झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लिमिटेडच्या समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानाहून ऑनलाइन उपस्थित होते. यावेळी व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक कंपनीचे उपाध्यक्ष आशुतोष घोलप उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, सन १९९७ मध्ये व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक कंपनीची सुरुवात नागपूरमध्ये अविनाश शेंडे आणि सचिन पांडे यांनी केली. छोट्या स्वरूपात सुरू झालेली ही कंपनी भारताच्या आयटी क्षेत्रात एक मोठी शक्ती बनली आहे, यांचा अवघ्या महाराष्ट्राला अभिमान आहे. कंपनीची देशात १६ ठिकाणी व विदेशात तीन ठिकाणी कार्यालय आहेत.या कंपनीला मिहान नागपूर येथील येथे १० एकर जागा मिळाली असून येथील मोठ्या प्रमाणात उद्योग विकास होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अविनाश शेंडे आणि सचिन पांडे सारख्या तज्ज्ञ व्यक्तींनी त्यांची स्वप्ने साकार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा प्रवास आपल्या राज्यातील हजारो उद्योजकांना प्रेरणा देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. व्हर्च्युअल गॅलक्सी इन्फोटेक लि. कंपनीच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यावेळी अनावरण करण्यात आले.

शुक्रवार, १६ मे, २०२५

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज 'जनता दरबार' हैदराबाद हाऊस येथे दुपारी १२ ते २ या काळात नागरिकांची निवेदने स्वीकारणार

नागपूर, दि. १६: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शनिवार, दि. १७ मे रोजी मुख्यमंत्री सचिवालय, हैदराबाद हाऊस येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे दुपारी १२ ते २ या वेळेत नागरिकांची निवेदने स्वीकारणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालय हैदराबाद हाऊस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी १२ ते २ या वेळेत नागरिकांची निवेदने स्वीकारतील आणि त्यांची गार्‍हाणी ऐकून घेतील. नागरिकांनी सकाळी ११ ते १२ या वेळेत आपल्या नावाची नोंदणी करुन टोकन घेणे आवश्यक आहे. टोकन क्रमांकाप्रमाणे नागरिकांची निवेदने स्वीकारली जातील, असे मुख्यमंत्री सचिवालयाने कळविले आहे.

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पदकांची लयलूट करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन

मुंबई, दि. १६:- 'भले शाब्बास!, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपण सर्वांनी महाराष्ट्राच्या क्रीडा गौरवात आणखी भरच घातली आहे. या यशामुळे आपण सर्व खेळाडू महाराष्ट्राचा अभिमान आहात,' अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाची हॅट्ट्रिकाचा पराक्रम साधणाऱ्या महाराष्ट्राच्या चमुतील खेळाडुंचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी करीत ५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदकांची लयलूट केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अत्यंत आनंद झाल्याचे नमूद केले आहे. तसेच या ७ व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने तब्बल ९ स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही नोंदविणे अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे. 'ग्रामीण भागांतून येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठीची प्रेरणा मिळावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘खेलो इंडिया स्पर्धा’ 2018 पासून सुरू झाली. या स्पर्धेत आतापर्यंत महाराष्ट्राने पाचव्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरणे ही बाब आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंच्या गुणवत्तेची चुणूक दाखवणारी आहे. या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि खेळाडूंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिलेल्या त्यांच्या कुटुंबीयांचे देखील कौतुक करावे तितके थोडेच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गुरुवार, १५ मे, २०२५

निसर्गसंपन्न वृद्धाश्रमात वृद्धांचे आयुष्य वाढेल वयस्करांच्या समस्यांसाठी उपाययोजना कराव्या लागतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रत्नागिरी, दि. 15 :निसर्गसंपन्न असणाऱ्या वृद्धाश्रमात येणाऱ्या वृध्दांचे पाच दहा वर्षांनी आयुष्य वाढेल. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या करता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंडणगड तालुक्यातील टाकेडे येथील मिलन वृद्धाश्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार भाई जगताप, सूर्यकांत दळवी, डॉ. विनय नातू, डॉ. जलिल परकार आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर आनंदही व्हावा आणि खंत वाटावी अशा प्रकारचे काही कार्यक्रम असतात. आनंद याकरिता की डॉ. जलिल परकार यांनी अतिशय सुंदर, महाराष्ट्रातील कदाचित पहिल्या चार-पाच वृद्धाश्रमात ज्याची गणना करू शकतो, असा वृद्धाश्रम या ठिकाणी तयार केला. त्याचा अतिशय मनापासून आनंद आहे आणि खंत याची की आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अलीकडच्या काळामध्ये परिवार लहान झाले, अडचणी वाढल्या. काही प्रमाणात कौटुंबिक ओलावा देखील कमी झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची गरज पडायला लागली. भारतामध्ये परिवार संस्कृती चांगली होती. भारतात वृद्धाश्रमाची संकल्पना ही बराच काळ नव्हती. परंतु, जेव्हा समाजात एखादे आव्हान उभे राहते, त्यावेळी त्या आव्हानाचा सामना करण्याकरिता समाजातील कोणीतरी पुढे येते आणि अशाच प्रकारे डॉ. जलिल परकार पुढे आले आणि त्यांनी ही व्यवस्था उभी केली. पुढच्या वीस वर्षांत आपलं सरासरी वय हे 85 वर्ष होणार आहे. 2035 नंतर आपल्याकडे वयस्कर लोकांची संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे. वयस्कर लोकांच्या समस्या, त्या संदर्भातल्या उपाययोजना, त्यांच्या करता काय व्यवस्था केल्या पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुनील तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. परकार यांनी आभार मानले.

आदिवासींसाठी महाअभियान ठरले लाभदायक *धरती आबा, प्रधानमंत्री महाअभियान गावांसाठी संजिवनी

अमरावती, दि. 15 :आदिवासी समुदायाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी केंद्र शासनाने 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' आणि 'प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियान' सुरू केले आहे. हे अभियान जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लाभदायक ठरत आहेत. या अभियानांतर्गत आदिवासी बहुल भागातील पक्की घरे, रस्ते, पाणी, वीज, सौरऊर्जा, मोबाईल नेटवर्क, गॅस जोडणी, वसतिगृह, पोषण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांवर विशेष मोहिमेद्वारे लक्ष केंद्रित केले जात आहे. सुविधांपासून वंचित असलेल्या आदिवासी कुटुंबांना याचा लाभ मिळत आहे. प्रधानमंत्री जनजातीय आदिवासी न्याय महाअभियानात धामणगाव रेल्वे तालुक्यातील तीन गावाचा समावेश आहे. यात 334 आदिम जमातीची लोकसंख्या आहे. या अभियानातून उसळगव्हाण येथील 17 आणि बोरगाव धांडे येथील चार अशा 21 लाभार्थ्यांच्या घरकुलांना मंजुरी झाले. यातील 20 घरकुलांचे काम पुर्ण झाले आहे. सन 2025-26 या वर्षात नायगाव ता. धामणगाव रेल्वे येथील 20 लाभार्थ्यांना घरकुल मंजुर करण्यात येणार आहे. या गावामध्ये आदिम जमार्तीचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, राशन कार्ड, किसान सन्मान निधी व इतर आवश्यक कागदपत्रांची कार्यवाही अभियानातून करण्यात आली आहे. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानात अमरावती, अचलपूर, भातकुली, चांदुरबाजार, चिखलदरा, दर्यापुर, धारणी, मोर्शी, वरुड या 9 तालुक्यामधीत 321 आदिवासी बहुल गावाचा समावेश आहे. अभियानातून धारणी प्रकल्पांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत दोन मुलांचे आणि चार मुलींचे असे सहा वसतिगृह मंजूर झाली आहे. तसेच या अभियानातून आदिवासींना लाभ देण्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची पुर्तता करून लाभ देण्यात येत आहे. तसेच मेळघाटमध्ये पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी लाभार्थ्यांना विविध लाभ देऊन बाजारपेठेचा विकास करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या अभियानांमुळे अमरावती जिल्ह्यातील आदिवासी समाजात सकारात्मक बदल दिसून येत असून त्यांच्या जीवनात सुधारणा होत आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी, प्रशासनातर्फे अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. धरती आबा आणि प्रधानमंत्री आदिवासी न्याय महाअभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागात शाश्वत विकासाची पायाभरणी होत आहे. यातून मुलभूत सुविधा गावापर्यंत पोहोचत आहे. यातून आदिवासींच्या जीवनात सकारात्मक बदल घडत असल्याचे सांगितले. धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी, योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे. स्थानिक गरजा आणि भौतिक सुविधांमधील कमतरता ओळखून योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. यातून आदिवासींच्या सर्वांगीण विकासाला गती मिळत असल्याचे सांगितले.

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरक्षित प्रवासाच्या दिशेने महत्वाचे पाऊल

मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनासोबत समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे सहयोग करत आहे ही निश्चितच स्वागतार्हाय बाब असून हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील इतर उच्च-धोकादायक मार्गांवर हे मॉडेल लागू करण्याचा मार्ग खुला झाला असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून सेव्हलाइफ फाऊंडेशनच्या माध्यमातून मर्सिडीज-बेंझ इंडियासोबत झालेल्या सामंजस्य कराराचे (एमओयू) स्वागत करताना मुख्यंमत्री म्हणाले की, या महामार्गावर दररोज सरसरी 10 लक्ष वाहने प्रवास करतात. त्यादृष्टीने या महामार्गावर रस्ता सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच, ऑटोमोटिव्ह उद्योग आणि सुरक्षिततेमध्ये आघाडीवर असलेली मर्सिडीज-बेंझ इंडिया या प्रयत्नात पुढाकार घेऊन भरीव योगदान देऊ इच्छित आहे, ही बाब आनंदाची आहे. त्याचप्रमाणे रस्ते सुरक्षेवर या भागीदारीचा सकारात्मक असा आमूलाग्र परिणाम होऊ शकतो. जो केवळ समृद्धी महामार्गावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठीचा एक आदर्श निर्माण करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यासाठी महाराष्ट्र महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, संबंधित विभाग त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली औपचारिक भागीदारी स्थापित करण्यासाठी तसेच इतर आवश्यक सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकंक्षी प्रकल्प असून महाराष्ट्राला जोडणारा आणि हजारो व्यक्तींसाठी वाणिज्य, पर्यटन आणि दैनंदिन प्रवासासाठी जीवनरेखा म्हणून काम करणारा एक्सप्रेस वे आहे. दहा जिल्ह्यांना जोडणा-या या महामार्गाचे काम गतीने पूर्ण करण्यात आले असून यामुळे कमी वेळात गतीमान प्रवास करण्यासाठीची अतिशय उपुयक्त सुविधा उपलब्ध झाली आहे. समृद्धी महामार्गाचे एकूण ७०१ किमीचे सर्व काम पूर्ण झालेले आहे. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी (५२० किमी) ११ डिसेंबर २०२२ रोजी तर दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर (८० किमी) २६ मे, २०२३ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी (२५ किमी) ४ मार्च, २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून उर्वरीत इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी, जि. ठाणे) हा ७६ कि.मी. चा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. मर्सिडीज-बेंझ इंडिया, एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, सुरक्षिततेच्या आपल्या मूल्यांशी बांधिल राहून, सेव्हलाईफ फाउंडेशन (SLF) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या सहकार्याने "समृद्धी महामार्गावरील शून्य मृत्यू महामार्ग" (ZFC) हा रोड सेफ्टी उपक्रम मार्च 2024 मध्ये सुरू केला आहे. हा उपक्रम 2026 पर्यंत राबवला जाणार आहे. हा 701 किमी लांबीच्या मुंबई-नागपूर महामार्गावर राबवला जाणारा एक प्रमुख प्रकल्प असून, या मध्ये "रोड सेफ्टीच्या चार ई" – अभियांत्रिकी (Engineering), अंमलबजावणी (Enforcement), आपत्कालीन सेवा (Emergency Care) आणि जनजागृती (Education) यांच्यावर आधारित उपाययोजना राबवली जात आहेत. यामुळे 29 टक्के अपघाती मृत्यूंमध्ये घट (2023 मध्ये 151 मृत्यू, 2024 मध्ये 107) त्याचप्रमाणे या उपक्रमामुळे महत्वाच्या मृत्यू भागांची (HFZs) ओळख पटली असून महामार्गाच्या फक्त 17 टक्के लांबीमध्ये 39 टक्के मृत्यू झाले (डिसेंबर 2024 पर्यंत) आहेत. सुरक्षित प्रवासासाठी मल्टी-एजन्सी समन्वय द्वारे सलग सुरक्षा ऑडिट, उपाययोजना व आपत्कालीन सेवा सुधारणा करण्यात येत असून यामध्ये प्रमुख घटक हा समन्वय व भागीदारी आहे, यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पोलीस, आरोग्य विभाग व इतर संस्थांशी सात सल्लामसलत बैठकांद्वारे सहकार्य घेण्यात येत आहे. अभियांत्रिकी उपाययोजना तसेच अभियांत्रिकी उपाययोजना राबवण्यात येत आहे. यामध्ये 626 किमीचा रस्ता अपघात संवेदनशीलता अभ्यास त्याचप्रमाणे उच्च मृत्यू झोनमध्ये सुधारणा – चिन्हे, गो स्लो मार्किंग, वेग मर्यादा दर्शक लावण्यात आले असून 12 ठिकाणी महत्त्वपूर्ण रस्ता चिन्हांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच चालत असलेले वेग कॅमेरे, सहा वेग निर्देशक बोर्ड (VASS) बसवले. VIDES प्रणाली द्वारे चुकीच्या सवयी (सीटबेल्ट न लावणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे) पकडणे सुरू आहे. सत्तर हून अधिक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा सुधारणा वैजापूर SDH आणि जालना जिल्हा रुग्णालय यांच्यात सुविधा सुधारणा यामध्ये – डिफिब्रिलेटर, ईसीजी, सर्जिकल किट. 90 प्राथमिक प्रतिसादकर्त्यांचे BTLS प्रशिक्षण आणि WHO च्या “Chain of Survival” तत्त्वानुसार काम करण्यात येत आहे. जनजागृती व शिक्षण सुरक्षित वाहन चालवण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन डिजिटल मोहीम राबवण्यात येत असून यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन या विविध समाजमाध्यमांवर याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. तसेच 2025–2026 मध्ये प्रकल्पाचा विस्तार करून आणखी उपाययोजना राबवली जाणार. हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. डेटा-आधारित उपाय, शासकीय नेतृत्व आणि बहु-हितधारक समन्वयातून रस्ते अपघातातील मृत्यू मोठ्या प्रमाणावर कमी करता येतात हे यातून स्पष्ट झाले आहे.

बुधवार, १४ मे, २०२५

छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

अमरावती, दि. 13 : स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी, उपायुक्त अजय लहाने, राजीव फडके, संतोष कवडे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण अभिवादन केले.