जागतिक पर्यटन
दिनानिमित्त 28 सप्टेंबरला
अकोला येथे कृषी
पर्यटनाविषयी कार्यशाळा
- पर्यटन उपसंचालक विजय जाधव
अमरावती, दि. 9 : जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने सोमवार 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी अकोला येथे कृषी पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विभागीय स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक श्री. विजय जाधव यांनी केले.अमरावती येथील नियोजन भवनात आयोजित नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत उमेद अमरावतीचे जिल्हा व्यवस्थापक रोशन उमक, माविमचे पवन देशमुख, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी एस. ए. कादरी, उपसंचालक (माहिती) अनिल आलुरकर अमरावती विभागातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक, शाश्वत विकास केंद्राचे गणेश चौधरी, वेदनंदीनी कृषी पर्यटन केंद्राचे संचालक प्रकाश पोहरे, महेंद्री कृषी पर्यटन केंद्राचे संचालक विजय श्रीराव, कॅनव्हास फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष शेरेकर, जिल्हा अग्रणी बँकांचे तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी
तालुक्यातील वेदनंदीनी कृषी पर्यटन केंद्राच्या सहकार्याने ही कार्यशाळा पर्यटन संचालनालय
आयोजित करीत असून यासाठी
शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी त्यांच्याकडील नोंदणीकृत
संस्था, घटक, शेतकरी तसेच उद्योजक व्यावसायिक यांच्या बरोबरच उद्योग इच्छुकांना या
कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. आपल्याकडील संस्थांना
त्यांच्या उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी या कार्यशाळेनिमित्त दालन उपलब्ध करून
देण्यात येणार आहे. यासाठीही त्यांनी नोंदणी करणे आवश्यक राहील अशी माहिती यावेळी देण्यात
आली.
पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्याबरोबरच
स्थानिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर यंदाच्या पर्यटन दिनाच्या उपक्रमांमध्ये
विशेष भर देण्यात आला आहे. ‘आई’ या योजनेअंतर्गत दुर्गम व पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण
भागातील महिलांना पर्यटन व्यवसायाशी जोडून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
करण्यात येत आहे. कृषी पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, गटशेती आणि कृषी
आधारित पर्यटनाला चालना देण्यात येणार असून, ग्रामीण भागातील तरुणांना उद्योजकतेकडे
वळविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय
शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विक्री व्यवस्थेलाही प्रोत्साहन दिले
जाणार आहे. ‘महिला शेतकरी वर्ष’ साजरे करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर शेती व
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेतली जाणार
आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला व शेतकऱ्यांची ‘सर्वोत्कृष्ट सेंद्रिय शेतकरी’
म्हणून निवड करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय
कामगिरी करणाऱ्या महिला उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, त्यांना शासनाच्या
विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार
आहेत.
महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून
देण्याच्या उद्देशाने जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा आणि माविमच्या माध्यमातून बचत गटांनी
तयार केलेल्या हस्तकला वस्तू तसेच तृणधान्यांपासून तयार केलेल्या पौष्टिक खाद्यपदार्थांचे
प्रदर्शन व विक्री स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ
मिळण्यासोबतच बचत गटांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. पर्यटनाचे
महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य
आणि पर्यटन जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच कृषी विद्यापीठातील
तज्ज्ञ व प्रवक्त्यांकडून ‘कृषी पर्यटन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
असेही यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीत जागतिक पर्यटन दिनानिमित्त
आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, महिला बचत गटांचा सहभाग, कृषी
व ग्रामीण पर्यटनाला चालना, स्थानिक उत्पादनांचे प्रदर्शन तसेच पर्यटन जनजागृती इत्यादी
उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी शाश्वत विकास केंद्र अमरावती यांच्या
वतीने प्रकाशित त्रैमासिक बातमी पत्राच्या पुस्तिकेचे विमोचन पर्यटन उपसंचालक विजय
जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
०००००
#जागतिकपर्यटनदिन
#कृषीपर्यटन
#अकोला
#अमरावतीविभाग
#पर्यटनसंचालनालय
#महिलासक्षमीकरण
#सेंद्रियशेती
#बचतगट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा