भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा : अमरावती विभागातून सर्व घटकांना सूचना व अभिप्राय नोंदण्याचे प्रशासनाचे आवाहन
जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात व ईमेलद्वारे नोंदवता येणार अभिप्राय
अमरावती, दि. 9 : अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीतय टास्क फोर्स 17 सप्टेंबर रोजी भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना व अभिप्राय जाणून घेण्याकरिता अमरावती विभाग दौऱ्यावर येत आहे. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून टास्क फोर्स समोर आपले विचार मांडण्यासाठी 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात किंवा ईमेलद्वारे सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय मागविण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचे संकलन करून उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे सादर करण्यात येतील. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, अमरावती यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 अमरावती विभागातील हितधारकांच्या सूचना व अभिप्राय ऐकूण घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे.
समितीसमोर चर्चेसाठी उपस्थित राहू इच्छिणाऱ्या व आपल्या सूचना मांडू इच्छिणाऱ्या नागरिकांना प्रत्यक्ष निवेदन सादर करता येणार आहे किंवा ईमेलद्वारे लेखी निवेदन सादर करता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) यांच्याकडे प्रत्यक्ष निवेदन सादर करता येणार आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांना amravati-examreformstaskforce@
टास्क फोर्स समोर प्रमुख विषयांवर सूचना मांडणे अपेक्षित आहे. यात शासनाचे विभाग,प्राधिकरणे व संस्था मार्फत सद्या घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धती आणि कार्यपद्धतीबाबत अभिप्राय देता येणार आहे. पारदर्शकता व सुरक्षितेच्या दृष्टीने परीक्षा अधिक निष्पक्ष व उमेदवाराभिमुख करण्यासाठीचे उपाय सूचविता येणार आहे. प्रश्नपत्रिका ते निकाल प्रक्रिया संदर्भात प्रश्नपत्रिका तयार करणे, मॉडरेशन,डिजीटल अथवा मुद्रीत वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्र व्यवस्थापन, मूल्यांकन व निकाल प्रक्रियेतील सुरक्षेबाबत मत मांडता येणार आहे.परीक्षा आयोजनासंदर्भात माहिती तंत्रज्ञानाचा वापराबाबत डिजीटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, ऑडिट ट्रेल्स, सीसीटीव्ही देखरेख आदींबाबत अभिप्राय देता येणार आहे. गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी पेपरफुटी, गोपनियतेचा भंग, तोतया उमेदवार,संगनमत तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या कडक उपायांबाबत माहिती जाणून घेतली जाणार आहे. अन्य राज्यात यशस्वीपणे भरती परीक्षा घेण्यासाठी वापरण्यात येणारी खास पद्धत, परीक्षा केंद्रांसाठी किमान मानकांच्या अनुषंगाने येथे पायाभूत सुविधा, सुरक्षा व आवश्यक मनुष्यबळाबाबत सूचना, संस्थात्मक समन्वयाच्या दृष्टीने परीक्षा आयोजनावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस यंत्रणा, शिक्षण विभाग यांच्यात समन्वय तसेच तक्रार निवारण प्रणालीच्या अनुषंगाने उमेदवारांसाठी जलद व प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था उभारण्याबाबत मत मांडता येणार आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा