सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन एकात्मता दिनाची दिली प्रतिज्ञा

 

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

एकात्मता दिनाची दिली प्रतिज्ञा

 

      अमरावती, दि. 19 : भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उपायुक्त गजेंद्र बावणे, तहसीलदार संतोष काकडे, राम लंके, सहाय्यक आयुक्त  वैशाली पाथरे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थितांनीही स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

इंदिरा गांधी यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त श्रीमती पांण्डेय यांनी उपस्थित सर्वांना राष्ट्रीय एकात्मता दिनाची प्रतिज्ञा दिली.

 

०००००

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०२३

आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाकरीता भाडेतत्वावर इमारतीसाठी प्रस्ताव आमंत्रित

 आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाकरीता

भाडेतत्वावर इमारतीसाठी प्रस्ताव आमंत्रित

अमरावती, दि.10 : प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी अंतर्गत आदिवासी मुलांचे वसतीगृह क्र. 01 करीता 100 विद्यार्थी क्षमतेची इमारत भाडेतत्वावर आवश्यक आहे. इच्छुकांनी इमारत भाडे प्रस्ताव प्रकल्प कार्यालय, धारणी येथे सादर करण्याचे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी poitdp.dharni-mh@gov.in व podharni@gmail.com या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

           भाडेतत्वावरील वसतीगृह इमारत ही भौतीक सोयी-सुविधा व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असणे अनिवार्य आहे.

00000

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा

 एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक

स्कूलमध्ये प्रवेशासाठी स्पर्धा परीक्षा

 

अमरावती दि. 10 : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित असलेल्या एकलव्य निवासी शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष 204-25 साठी इयत्ता सहावी व नववी वर्गात विद्यार्थ्यांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी स्पर्धा परीक्षेचे दि. 25 फेब्रुवारी 2024 आयोजन करण्यात आले आहे.

इंग्रजी माध्यमाचा एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षेकरीता आदिवासी विकास विभाग अधिनस्त असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी, पांढरकवडा, किनवट, अकोला, औरंगाबाद, पुसद, कळमनुरी यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या 12 जिल्ह्यातील सर्वशासकीय व अनुदानित आश्रमशाळा जिल्हा परिषद नगरपालिका व महानंगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासन मान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 , 6, 7, 8 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित, आदिम जमातीचे विद्यार्थी सदर स्पर्धा परिक्षेसाठी पात्र राहतील.

                वरील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी प्रवेश परिक्षेचे आवेदन पत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घेवून, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडे सादर करावेत. विहीत नमुन्यातील अर्ज संबंधित शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकरी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचेकडे विनामूल्य उपलब्ध आहेत. सदर अर्ज दि. 17 फेब्रुवारी 2024 पर्यंत संबंधित प्रकल्प कार्यालयाकडे मुख्याध्यापकांमार्फत सादर करावे, असे अमरावती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त सुरेश वानखेडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

0000

विभागीय लोकशाही दिनात 21 प्रकरणांवर सुनावणी, प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा -प्र. विभागीय आयुक्त संजय पवार

 


विभागीय लोकशाही दिनात 21 प्रकरणांवर सुनावणी

प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा

                      -प्र. विभागीय आयुक्त संजय पवार

अमरावती, दि. 16 : नागरिकांकडून प्राप्त अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. प्रलंबित प्रकरणांचा निपटारा तात्काळ करण्यासह केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना कळविण्यात यावे, असे निर्देश प्रभारी विभागीय आयुक्त संजय पवार यांनी आज दिले. लोकशाही दिनात एकूण 21 प्रकरणांवर चर्चा करुन त्यानुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.  

विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिन सपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. अपर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव यांच्यासह कृषी, महापालिका, जिल्हा प्रशासन, ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. सामान्य प्रशासन विभागाव्दारे सादर करण्यात आलेल्या 9  स्वीकृत अर्ज व 12 अस्वीकृत अर्ज अशा एकूण 21 अर्जावर चर्चा आजच्या विभागीय लोकशाही दिनात झाली. यावेळी उपस्थित तक्रारदारांचे म्हणने ऐकूण घेण्यात आले. प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले.  

00000

मंगळवार, ७ नोव्हेंबर, २०२३

विभागीय आयुक्तालयात गुरुवारी (ता.16 नोव्हेंबर) लोकशाही दिन

 विभागीय आयुक्तालयात गुरुवारी (ता.16 नोव्हेंबर) लोकशाही दिन

अमरावती, दि. 06 :  विभागीय लोकशाही दिन नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. परंतु, विभागीय आयुक्त यांच्या आदेशान्वये संपूर्ण अमरावती जिल्ह्यात सोमवारी, दि. 13 नोव्हेंबरला स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे सदरचा विभागीय लोकशाही दिन पुढील कामकाजाच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. 16 नोव्हेंबर)  सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात होईल.

विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी आपले अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

००००००

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०२३

छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजनेंतर्गत मागेल त्याला शेततळे

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

            अमरावती, दि.2 : शेतकऱ्यांना आवश्यक असणारी बाब त्याला मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन दिल्यास त्याचा शेतकऱ्यास मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कृषि योजना (मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजने अंतर्गत मागेल त्याला शेततळे) वैयक्तिक शेततळे ही योजना सुरु करण्यात आलेली आहे.

योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता अर्जदार शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावावर किमान ०.४० हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे व जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. शेतकऱ्यांनी महा- डीबीटी पोर्टलचे http://mahadbt.maharashtra.gov.in/Farmar/Login/Login या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा. अर्ज सादर करतेवेळी जमिनीचा ७/१२, ८अ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्स, हमीपत्र, जातीचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे. महा-डीबीटी पोर्टल वरील सांगणकीय प्रणालीद्वारे अर्ज करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. या योजनेत किमान १५×१५×३ ते ३४×३४×३ मीटर आकारमानाचे शेततळे घेता येईल व अश्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेततळ्याकरिता किमान रु. १४४३३/- ते रु. ७५०००/- अनुदान अनुज्ञेय आहे.

अमरावती विभागातील बहुतांश शेती ही कोरडवाहू असून ती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. पावसाचे होणारे असमान वितरण आणि पावसामध्ये येणारे खंड या प्रमुख अडचणी आहेत. अशा कालावधीत सिंचन सुविधेअभावी पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते अथवा पाण्याचा खूप जास्त ताण पडल्यास पिके देखिल नष्ट होतात व पर्यायाने शेतकऱ्यास आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. या वर्षीचा कमी पाऊसमानाच्या परिस्थितीत शेततळे खोदुन या योजनेचा लाभ घेण्याबाबत कृषी विभागाव्दारे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा विभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

 

0000

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

 इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

            अमरावती, दि.2 : फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) परीक्षांचे लेखी परीक्षेचे वेळापत्रक मंडळाव्दारे जाहीर करण्यात आले आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. बारावी) सर्वसाधारण व व्दिलक्षी अभ्यासक्रमांची व व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा बुधवार, दि. 21 फेब्रुवारी ते मंगळवार, दि. 19 मार्च, 2024 दरम्यान होणार आहे. इयत्ता बारावी, माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा बुधवार दि. 20 मार्च  ते शनिवार दि. 23 मार्च, 2024 दरम्यान होणार आहे. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ. दहावी) ही शुक्रवार, दि. 1 मार्च, ते मंगळवार दि. 26 मार्च, 2024 दरम्यान होणार आहे.

इ. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. 10 फेब्रुवारी ते गुरूवार दि. 29 फेब्रुवारी, 2024 होणार आहे. तसेच इ. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. 2 फेब्रुवारी ते मंगळवार दि. 20 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

उपरोक्त कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दि. 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/ उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे पुणे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

शेतीपिकांच्या उत्पादन वाढीसाठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धेचे आयोजन

 शेतीपिकांच्या उत्पादन वाढीसाठी

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्‍पर्धेचे आयोजन

 

 शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

अमरावती दि. 2:  राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबलमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. त्यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश  ठेऊन राज्यांतर्गत  पीकस्पर्धा  योजना’ राबविण्यात येत आहे.

            वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून रब्‍बी हंगाम २०२३ पासून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर पिकस्‍पर्धा योजना राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  या पाच पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

रब्बी पीक अंतर्गत ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पिके पिक स्पर्धेत असतील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे, याप्रमाणे पात्रतेचे निकष राहतील.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

रब्‍बी हंगामामध्ये पीक स्पर्धेची अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख 31 डिसेंबर आहे. अर्ज दाखल करण्‍याच्‍या तारखेच्‍या दिवशी शासकीय सुट्टी असल्‍यास त्‍यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्‍यात यावी. विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावरील पिकस्पर्धा निकालानुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस दिले जाणार.

            स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० प्रवेश शुल्क तर आदिवासी गटासाठी रक्कम रु.१५० प्रवेश शुल्क राहील. स्पर्धेत विजेता ठरलेल्या शेतकऱ्यांना सर्वसाधारण व आदिवासी गटात तालुकापातळीवर पहिले, दुसरे व तीसरे अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रुपये बक्षीस दिल्या जाणार. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस दहा हजार, दुसरे 7 हजार, तीसरे 5 हजार रुपयांचे बक्षीस दिल्या जाणार. तसेच राज्यपातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दुसरे 40 हजार व तीसरे बक्षीस 30 हजार रुपयांचे दिले जाणार.

   दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्‍हावी याकरीता जास्तीत जास्त शेतक-यांनी या पिकस्‍पर्धेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्‍यात येत आहे. पिकस्‍पर्धेबाबतच्या अधिक माहितीसाठी  शेतकरी  बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in  या संकेतस्‍थळाला भेट द्यावी.

 

गुरुवार, २ नोव्हेंबर, २०२३

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

 माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी, 

सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

 

उपायुक्तांनी दिली राष्ट्रीय एकता दिवसा निमित्त शपथ

            अमरावती, दि. ३१ : माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त गजेंद्र बावणे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

           माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रीय संकल्प दिवस’ व माजी उपपंतप्रधान लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सहाय्यक आयुक्त श्री. मस्के यांनी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याची शपथ उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी दिली.

           सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, माधवी मडावी, तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0000

 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी अर्ज करा, शासनमान्य ग्रंथालयांना आवाहन

 

राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांसाठी अर्ज करा

शासनमान्य ग्रंथालयांना आवाहन

            अमरावती, दि.2 : केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या कोलकाता येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या समान निधी व असमान निधी योजनेत ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन ग्रंथालय संचालक दत्तात्रेय क्षीरसागर यांनी केले आहे.

            समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध नमुन्यातील प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. त्यानुसार सन 2023-24 साठी राज्यातील शासनमान्य ग्रंथलयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरून उपलब्ध डाऊनलोड करून घ्यावा.

             समान निधी योजनेत इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजनेचा समावेश आहे. असमान निधी योजनेत ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता  अर्थसहाय्य आदी बाबी आहेत.

             योजनेसाठी करावयाचा अर्ज वरील योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in या हे संकेस्थळ पाहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रासह इंग्रजी, हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि. 30 नोव्हेंबर, 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालक श्री. क्षीरसागर यांनी केले आहे. 

00000