शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८


संशोधनाद्वारे देशाच्या विकासात अभियंत्यानी योगदान द्यावे
                                            - संजय शरण
अमरावती, दि.29 : अभियंता आपल्या कल्पना शक्तीने सृजनाच्या कार्यात गर्क असतो. त्यासाठी प्रसंगी त्याने नवीन संशोधनाची कास धरणे गरजेचें असते. अभियंत्यांनी त्यांच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्ञानाचा व कौशल्याचा वापर करुन अर्थाजन करण्यासोबत अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधन करुन देशाच्या विकासात योगदान द्यावे. असे आवाहन रेमंड लवझरी कॉटनचे कार्यप्रबंधक सजय शरण  यांनी केले.
शासकीय तंत्रनिकेतन, अमरावतीच्या भव्य सभागृहात दि. 24 सप्टेंबर 2018 रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेवरैय्या यांच्या जयंतीनिमित्य अभियंता दिनाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्य शिक्षक दिनाचे संयुक्तरित्या आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी श्री संजय शरण प्रमुख अतिथी या नात्याने उद्बोधन करत होते. पुढे बोलताना श्री संजय शरण म्हणाले की अभियंत्यांच्या सर्वागिण विकासामध्ये त्याच्या शिक्षकांचे तसेच शैक्षणिक संस्थेचे महत्वाचे योगदान असते. त्यामुळे अभियंता दिन व शिक्षक दिन एकत्र साजरा करण्याची कल्पना प्रशंसनिय आहे.
 कार्यक्रमासाठी श्री. प्रशांत नवघरे, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती तसेच डॉ. डी.व्ही जाधव, सहसंचालक, तंत्रशिक्षण, विभागीय कार्यालय, अमरावती विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे होते.
श्री.प्रशांत नवघेर यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यातील अनुभव कथन करुन  वास्तविकता व अभियंत्याचे कौशल्य यांची सांगड घालून वास्तविक आयुष्यातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. संहसंचालक डॉ. जाधव यांनी तंत्रज्ञान क्षेत्रातील सध्याच्या मंदीमुळे व कमी होणाऱ्या नोकऱ्यांच्या संख्येमुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थिीतचा उल्लेख करुन भावी अभियंत्यांनी निराश न होता स्वत:च्या क्षमता व कौशल्यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. संस्थेच प्राचार्य डॉ. मोगरे यांनी अध्यक्षिय भाषणात विद्यार्थ्यांना राज्यातील उत्कृष्ट तंत्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळाला असून त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्याबाबत आश्वस्त रहावे असे प्रतिपादन केले. संस्थेला राज्यातील एकमेव व प्रथम एन.बी.ए.मानांकन प्राप्त करणारे शासकीय तंत्रनिकेतन म्हणून गौरव प्राप्त केल्याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडीअडचणींचे शिक्षकांकडून निवारण करुन घेण्याचे आवाहन केले. याप्रंसगी सर्वश्री. देवांशु धानोरकर, संकेत काशिलकर,ईशांत देवरे, गौरव हटकर, कु.समृध्दी चिखलकर, कु. आयुषी ठाकुर इ. विद्यार्थी-विद्यार्थीनीनीही सर विश्वेश्वरैय्या व डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन चारित्रावर त्यांच्या भाषणातुन प्रकाश टाकून अभियंता दिन व शिक्षक दिनाचे महत्व पटवून दिले.
याप्रसंगी सर्व प्रमुख अतिथीचा शाल,श्रीफळ,पुस्तक व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगाचे औचित्य साधुन संस्थेतील पदार्थविज्ञान विभागातील अधिव्याख्याता प्रा. शुभांगी सायरे यांचा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधुन 2017-18 या वर्षात आचार्य पदवी प्राप्त केलयाबद्दल सहसंचालक तंत्रशिक्षण डॉ. डी.व्ही जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. शुभांगी सायरे यांचा परिचय कु. पूर्वा खरबडे या विद्यार्थीनींने करुन दिला.
कार्यक्रमदरम्यान संस्थेत चालत आलेल्या स्तुत्य प्रथेनुसार संस्थेतीत कर्मशाळा अधिक्षक प्रा. ए.एम.खान यांचा प्राचार्य डॉ.राजेनद्र मोगरे यांच्या हस्ते शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. प्रा. ए.एन.खान यांचा परिचय कु. श्रघ्दा महल्ले या विद्यार्थ्यीनीने करुन दिला. सत्काराला उत्तर देतांना प्रा. खान यांनी सर्व शिक्षक वर्गातर्फे प्रतिनिधिक स्वरुपात पुरस्कार स्विकारत असल्याने विनम्रपणे नमुद केले तसेच हरिवंशराय बच्चन यांची प्रसिध्द कविता सादर करुन भावना व्यक्त केल्या.
संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांना इन्स्टिट्युट ऑफ इंजिनिअर्सतर्फे  त्यांच्या तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल ‘एमिनन्ट इंजिनिअर’पुरस्कार जाहिर करण्यात आला. त्याबद्दल त्यांच्या संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यातर्फे डॉ.डी.व्ही. जाधव यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुण्यांशिवाय उपप्राचार्य डॉ. सुधिर बाजड,जेष्ठ विभाग प्रमुख प्रा. अनिल उदासी, जिमखाना उपाध्यक्ष व स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. सागर पासेबंद प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. धनश्री राऊत हिने केले. तर आभारप्रदर्शन प्रा. सागर पासेबंद योनी केले. कार्यक्रमाला संस्थेतील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८


वृत्त क्र. 199                                                                                                       दिनांक- 27 सप्टेंबर 2018

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित
Ø  30 सप्टेंबर अंतीम मूदत

अमरावती, दि.27 : समाजातील विशिष्ट ध्येयासाठी झटणाऱ्या व गोरगरीब स्त्रीयांसाठी वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या स्त्रीयांचा केंद्र सरकारतर्फे नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी सुध्दा जिल्हा महिला व बालविकास विभागाद्वारे पुरस्कारचे प्रस्ताव आंमंत्रित केले आहे. नारी शक्ती पुरस्काराची माहिती व विहित नामांकन फॉर्मचा नमुना याविषयी केंद्र शासनाच्या www.wcd.nic या वेबसाईट वर माहिती दिलेली आहे. सदर पुरस्कार प्रस्ताव दिनांक 30 सप्टेंबर 2018 पर्यंत संबंधीत जिल्ह्यांच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात यावा तसेच अधिक माहितीसाठी संबंधीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे  विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास अधिकारी, अमरावती विभाग अमरावती  यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
*****

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८


गटांच्या प्रादेशिक परिषद निवडीसाठी
प्रस्ताव आंमंत्रित
अमरावती, दि. 26 :  राष्ट्रीय शाश्र्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजना ( सेंद्रिय शेती) अंतर्गत सन 2018-19 करिता अमरावती जिल्ह्यात नविन 5 गटांसाठी प्रादेशिक  परिषदेची निवड करण्याकरिता दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यत पात्र संस्थानी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, अमरावतीच्या वतीने करण्यात येत आहे.
राष्ट्रीय शाश्र्वत शेती अभियानांतर्गत परंपारिक शेतीमध्ये आधूनिक विज्ञान व तंज्ञज्ञानाचा वापर करुन शाश्र्वत सेंद्रिय शेतीचे मॉडेल मुल्यवृध्दी  धर्तीवर विकसीत करणे तसेच दीर्घकालीन मातीची सुपिकता वाढविणे, साधनसामुग्री संवर्धन सुनिश्चित करणे आणि रसायनांचा वापर न करता जैविक अभिक्रियाद्वारे घेतलेल्या सुरक्षित आणि निरेागी अन्नाचा पुरवठा करणे इ. विविध उपक्रम राबविले जातात.
सन 2018-19 करीता जिल्ह्यात नविन 5 गटांसाठी प्रादेशीक परिषदेची निवड केली जाणार आहे. यासाठी पात्र संस्थेकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या संस्थेकडे तांत्रिक, विपणन व प्रशिक्षण क्षेत्रातील तज्ञ असणे आवश्यक आहे. कमीत कमी 10 स्थानिक गटांसाठी काम करण्याची क्षमता तसेच एकूण 500 शेतकऱ्याची यादी जोडणे अनिवार्य आहे. योजनेच्या लाभासाठी कायदेशिरित्या नोंदणीकृत,आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेली आणि तीन वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल असलेली संस्था अधिकृत राहील. कोणत्याही संघटनेच्या व शासनाच्या काळ्या यादीत सदर संस्थेचे नाव नसावे. त्यासाठी स्वयंघोषणा पत्र आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीमध्ये पीजीएस-इंडिया/थर्ड पार्टी प्रमाणपत्राचा ( टीपीसी) पुरेसा (कमीत कमी 5 वर्ष ) अनुभव असल्याचे प्रमाणपत्र तसेच पुरावा देणे बंधनकारक राहील. सदर संस्थेचे स्थायी कार्यालय आणि पुरेसा कर्मचारी ( पीजीएस-इंडिया कार्यक्रम चालू करण्यासाठी प्रस्तावित) असल्याबाबतचा पुरावा देणे बंधनकारक राहील. स्वत:चे मुख्यालय व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी काम करावयाचे असल्यास/प्रस्तावित केल्यास त्या ठिकाणच्या शाखा कार्यालयाचा संपूर्ण पत्ता व अनुषंगिक माहिती देणे आवश्यक राहील. ऑनलाईन पक्रियेसाठी ( जसे संगणक, प्रिन्टर,इंटरनेट सुविधा इ.) पुरेशी मुलभूत सुविधा असणे आवश्यक राहील. याशिवाय अन्य सोयीसुविधा व अटी पुर्ण करणाऱ्या संस्थेने प्रादेशिक परिषदेसाठी प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, अमरावती येथे दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत अर्ज सादर करावे.
असे प्रकल्प संचालक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा),अमरावती  यांनी कळविले आहे.


*****


इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या
ऑनलाईन नावनोंदणीस मूदतवाढ
Ø अंतीम मूदत 3 ऑक्टोंबर
                
अमरावती, दि.26 : इयत्ता दहावी व बारावीच्या मार्च 2019 च्या परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा कालावधी दि. 30 जुलै 2018 पासून ते दि. 25 ऑगस्ट 2018 पर्यंत निश्चित करण्यात आला होता. तसेच दिनांक 26 ऑगस्ट 2018 ते दि. 10 सप्टेंबर 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. आता नावनोंदणी अर्जास नियमित शुल्काने मुदतवाढ देण्यात येत आहे.
            दिनांक 19 सप्टेंबर 2018 ते 3 ऑक्टोंबर 2018 पर्यंत विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावे. दिनांक 21 सप्टेंबर 2018 ते 4 ऑक्टोंबर 2018 पर्यंत विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत/ कनिष्ठ महाविद्यालया मध्ये जमा करावे आणि  दि. 8 ऑक्टोबर 2018  पर्यंत संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावित. या वाढीव तारखांबाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंद घेवून तशा सूचना आपल्या स्तरावरुन शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना द्याव्या. तसेच कोणताही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
असे विभागीय सचिव अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी कळविले आहे.
***

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

कृषि खत विक्रेत्यांसाठी एक वर्षीय पदविका प्रशिक्षण



कृषि खत विक्रेत्यांसाठी
एक वर्षीय पदविका प्रशिक्षण

अमरावती, दि. 17:- अमरावती जिल्ह्यातील कृषि खत विक्रेत्यांसाठी  एक वर्ष कालावधीचा (आठ्वड्यातुन 1 दिवस) प्रशिक्षण वर्ग, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती यांच्यामार्फत चालविण्यात येणार आहे. इच्छूक उमेद्वारांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आत्मामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
इयत्या 10 वी उत्तीर्ण व कृषि खत विक्रीचा परवाना या पदविका प्रशिक्षणासाठी पात्रता आहे. इयत्या 10 वी किंवा 12 वी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, कृषि खत विक्रीचा परवाना इ.आवश्यक कागदपत्रे प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेश क्षमता 40 असून 20 हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.
प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती या ठिकाणी प्रेवश अर्ज मिळणार असून त्याच ठिकाणी अर्ज स्वीकारले जाईल. संपर्कासाठी 0271- 2660012 दूरध्वनी क्रमांक असा आहे. तसेच या संदर्भात पुढीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
प्रवेश अर्ज वाटप व भरलेले छायांकित कागदपत्रासह परीपूर्ण अर्ज दि. 24 सप्टेंबर  ते 26 सप्टेंबर 2018 पर्यंत कार्यालयान वेळेत सकाळी 11 ते 5.00 स्वीकारले जातील.  चाळीस उमेद्वारांची प्रवेश यादी व प्रतीक्षा यादी 27 सप्टेंबर, रोजी जाहीर करण्यात येईल. व याच दिवशी मुळ कागदपत्र तपासणी करण्यात येईल दि. 28 सप्टेंबर रोजी अंतीम प्रवेशीत उमेदवारांनी वीस हजार रुपये रकमेचा राष्ट्रीकृत बँकेचा डीमाड डॉफ्ट प्रकल्प संचालक, आत्मा अमरावती यांचे काढून प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहील. प्रवेश अर्ज दोन प्रतीत भरणे आवश्यक असून  http://www.manage.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अर्ज दोन प्रतीत भरुन सादर करणे आवश्यक आहे, असे प्रकल्प उपसंचालक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा),अमरावती यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000

डॉ. राजेन्द्र मोगरे यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार



डॉ. राजेन्द्र मोगरे यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

अमरावती, दि. 21 :  शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती या स्वायत्त तंत्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांचा इन्सिटट्युट ऑफ इंजिनिअर्स (इंडीया) अमरावती स्थानिक शाखा यांच्या वतीने त्यांच्या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल अभियंता दिनानिमित्त उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
इन्सिटट्युट ऑफ इंजिनिअर्स (इंडीया) या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेच्या अमरावती स्थानिक शाखेतर्फे भारतरत्न सर एम. विश्वेश्वरैय्या यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधुन 51 व्या अभियंता दिनानिमित्त अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील उल्लेखनिय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा सत्कार करण्याचे योजले होते. त्यानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीद्वारे स्थानिक शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. राजेन्द्र मोगरे यांची त्यांच्या तंत्रशिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल व उल्लेखनिय कार्याबद्दल उत्कृष्ट अभियंता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.  
पुरस्कार वितरण दि. 18 सप्टेंबर 2018 रोजी अभियंता भवन, शेगाव नाका, व्ही. एम. व्ही. रोड, अमरावती येथे आयोजित भव्य समारंभारत प्रसिध्द लेखक, अभियंता व साफ्ट ॲक्सेलचे व्यवस्थापकीय संचालक अच्युत गोडबाले यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान इन्सिटट्युट ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. दिलीप मसे यांनी भुषविले. या प्रसंगी डॉ. राजेन्द्र मोंगरे यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत नवघरे यांचे सह मिलींद देशमुख, यशवंत पडोळे, डॉ. शरद मोहोड, अरविंद मोकादम, सुरेश चारथळ यांची उपस्थिती होती.
डॉ. राजेन्द्र मोगरे यांना प्रतिष्ठेचा उत्कृष्ट अभियंता पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे शासकीय तंत्रनिकेतन व तंत्रशिक्षण क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. डॉ. मोगरे यांनी उत्कृष्ट अभियंता पुरस्कार नम्रपणे स्विकारत असुन त्यामागे त्यांचे स्वत:चे परिश्रम व कार्यनिष्ठा यासोबतच तंत्रशिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन व मार्गदर्शन, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य, मातापित्यांचे आशिर्वाद व विद्यार्थ्यांचे प्रेम यांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन केले.
डॉ. राजेन्द्र मोगरे यांच्यावर शासकीय तंत्रनिकेतन व तंत्रशिक्षण क्षेत्रातील अधिकारी, प्राचार्य, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
00000

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा

            अमरावतीदि. 21 :  अमरावती चांदूर रेल्वे रस्ता राज्य मार्ग क्र.297 ते अंध विद्यालयापर्यंतचे  काँक्रीट रस्त्याचे बांधकाम टप्प्या-टप्प्या मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती मार्फत प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत  पोलीस मुख्यालय कार्यालयापासून सुंदरलाल चौकापर्यंत डाव्या बाजुने काँक्रीट रस्ता बांधकाम सुरु करावयाचे आहे. तरी ह्या लांबीमध्ये डाव्या बाजुने वाहतूक बंद राहणार आहे व विद्याभारती महाविद्यालयाकडे जाणारा रस्ता सुध्दा बंद राहणार आहे, तसेच उजव्या बाजुने वाहतूक सुरु राहणार आहे. तशी या विभागास पोलीस खात्याकडून दिनांक 18 ऑक्टोबर 2018 पर्यंत रस्ता बंद करण्याची परवानगी प्राप्त आहे.
 तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे, असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी कळविले आहे.
00000


गुरुवार, २० सप्टेंबर, २०१८



मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी
आशा वर्करची भूमिका महत्वपूर्ण
                                - आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत
  आरोग्यमंत्री दिपक सावंत यांचा मेळघाट दौरा

अमरावती, दि. 19 : आरोग्य विभागाचे निरीक्षणाअंती जन्मत:च कमी वजनाचे बालक, कमी दिवसाची प्रसूती, अॅन्सपेक्सिया, सेप्टिसिमियामुळे अर्भक मृत्यु झाल्याचे आढळून आले असले, तरी बालमृत्यूची कारणमिमांसा जाणून तातडीची उपाययोजना आरोग्य विभागाव्दारे करण्यात येत आहे. बालमृत्यू रोखण्यामध्ये आरोग्य सेविकेसह आशा वर्कर यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी गावातील प्रत्येक नवजात बालकांना व मातांना भेट देऊन प्रात्यक्षिकाव्दारे बाळाच्या उपचाराविषयी व संगोपनाविषयी मातांना समजावून सांगावे, यामुळेच बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी आज बिजूधावडीत केले.
धारणी तालुक्यातील बिजूधावडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्री महोदयांनी भेट दिली. त्यावेळी बालमृत्यू संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार आनंदराव अळसूळ, जि.प.उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, पंचायत समिती सभापती बळवंत वानखडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, आरोग्य संचालिका डॉ. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका, परिचारीका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले की, बालमृत्यू रोखण्यामध्ये ग्राम स्तरावर आशा वर्करसह, आरोग्य सेविका यांची भूमिका फार महत्वाची आहे. त्यांनी गावातील ज्या घरी बाळचा जन्म झाला आहे, अशा घरी प्रत्यक्ष भेट देऊन मातेला दूध पाजण्याची पध्दती, परिसर स्वच्छता तसेच बाळाचे श्वासोच्छवास सुरळीत होईल यादृष्टीने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाव्दारे समजावून सांगावे. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारापासून बाळाचे संरक्षण करण्यासाठी हॅन्डवॉशसह ॲन्टीबॉयोटीक व सुरळीत लसीकरण करावे. या कालावधीत आरोगय सेविका व आशा वर्कर यांनी गावातील कुटुंबांना दररोज नियमित भेटी देऊन पाठपुरावा घ्यावा. गरोदर मातांना पुरक पोषण आहाराचे नियमितपणे वितरण करावे.
गावातील तीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित बालके व गरोदर मातांची नोंद घेऊन पाच महिने अगोदर व पाच महिने नंतरच्या परिस्थितीचे योग्य नियोजन गाव पातळीवर करावे. पुढच्या महिन्यात बाळंतपणासाठी भरती होणाऱ्या मातांची नोंद आरोग्य सेविकेने घेऊन तशा उपाययोजना केंद्रात करुन ठेवाव्यात. नऊ ग्रॅम पर्यंत हेमोग्लोबीन असणाऱ्या मातांना आर्यन सुक्रोस तसेच बारा आठवडया प्रमाणे फॉलीक अॅसीडच्या गोळया द्याव्यात. मेळघाटातील सर्वच तेरा वर्षावरील मुलींना विटॅमीनच्या गोळ्यांचे सेवन करण्यासाठी वितरण करावे. अतिदक्षता माता व बालकांसाठी हॉयपोथरमीया कीट मातांना वितरीत कराव्या, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य संचालिका डॉ. पाटील म्हणाल्या की, नवजात बालकांच्या घरात व परिसरात स्वच्छता ठेवावी. कुठलाही संसर्गजन्य आजाराची लागण होऊ नये म्हणून गुरा-ढोरांना घरात न बांधता इतर ठिकाणी बांधावे. त्यामुळे गुरांच्या मलमुत्रापासून आजाराची लागण होणार नाही. घरात चुलीच्या धुरामुळे बाळाच्या आरोग्यावर परीणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्‍य यंत्रणेणी बालमृत्यूचे अंकेक्षण करुन तश्या सर्वच उपाययोजना प्राथमिक आरोग्य केंद्रात कराव्यात. प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दर आठवड्यात दिननिहाय प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी द्याव्यात. बालमृत्यू टाळण्यासाठी जननी शिशू सुरक्षा योजना, आरोग्य संस्थेत प्रसूती, पोषण आहार, बालउपचार केंद्र, आशामार्फत गृहभेटीद्वारे पाठपुरावा, जंतनाशक व जीवनसत्त्व अ मोहीम, नियमित लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत बालरोगतज्ज्ञांकडून तपासणी आदी उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करावी.
मेळघाटातील बालमृत्यूचे उच्चाटन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समन्वयातून तसेच आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेतून कुठल्याही मातेची किंवा बालकांचा आरोग्य सुविधा अभावी मृत्यू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपल्या कर्तव्याशी व सेवेशी प्रामाणिक राहून आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असेही आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
000000



बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

प्रशिक्षीत शिक्षक घडविणार मेळघाटातील विद्यार्थ्यांचे भविष्य
कार्यप्रेरणा शिक्षण परिषद
मेळघाटातील अभिनव प्रयोग
अमरावती, दि. 18 : शैक्षणिक प्रवाहापासून दुर असलेल्या, हसत-खेळत शिक्षणाच्या अनुभवापासून वंचित राहिलेल्या मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे आता खुली झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परंपरागत शिक्षणासोबतच हसत खेळत, ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणाची कल्पना मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रुजत आहे.
नुकताच शिक्षणविषयक गुणवत्तापूर्ण कार्यक्रमाचा येथे शुभारंभ झाला असून शंभर टक्के प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांना प्रशिक्षीत करण्याचा अभिनव प्रयोग साकारला. आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या धारणी प्रकल्पातील 46 शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या 85 शिक्षकांना दोन दिवसीय कार्यप्रेरणा शिक्षण परिषदेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.
धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेठकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रयोग साकार झाला. खासगी शाळांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येदेखिल गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. त्याच धर्तीवर आता आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना गणित, भाषा, खेळ, कला या सर्व विषयांमध्ये प्रशिक्षीत शिक्षक नैपूण्य प्रदान करीत आहेत. या कार्यप्रेरणा परिषदेत आपली शाळा आपले कर्तव्य, भाषेचे ज्ञान, भाषिक उपक्रम, शैक्षणिक साहित्याची निर्मिती, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास, खेळ व कलेचे शिक्षणातील स्थान या सर्व विविधांगी विषयांचे प्रशिक्षण शिक्षकांना तज्ञांनी दिले. विनोद राठोड, उमेश आडे, अनुपमा कोहळे, धिरज जवळकर या विषय तज्ञांनी प्रत्येक विषयाची उकल करुन शिक्षकांना प्रशिक्षीत केले.

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी ओढ निर्माण व्हावी. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा. या आश्रमशाळांमध्ये प्रगत विद्यार्थी घडावे यासाठी कार्यप्रेरणा शिक्षण परिषदे अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यात आले आहे. त्यातून शैक्षणिक फलनित्पत्ती निश्चितच होईल.
                                                                                                      - राहुल कर्डिले, प्रकल्प अधिकारी धारणी.


शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना हसत-बागडत, आनंदाने आणि प्रात्यक्षिकांमधून कशा पध्दतीने शिकवावे याचे प्रशिक्षण दिल्याने आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील.
                                                                                                                  - विनोद राठोड प्रशिक्षक.


मेळघाटातील आदिवासी विद्यार्थी त्यांच्या उज्जवल भविष्याची स्वप्ने आता नक्कीच सत्यात उतरवू शकतील.



सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

कृषि खत विक्रेत्यांसाठी एक वर्षीय पदविका प्रशिक्षण


कृषि खत विक्रेत्यांसाठी
एक वर्षीय पदविका प्रशिक्षण

अमरावती, दि. 17:- अमरावती जिल्ह्यातील कृषि खत विक्रेत्यांसाठी  एक वर्ष कालावधीचा (आठ्वड्यातुन 1 दिवस) प्रशिक्षण वर्ग, श्री शिवाजी कृषि महाविद्यालय अमरावती यांच्यामार्फत चालविण्यात येणार आहे. इच्छूक उमेद्वारांनी तात्काळ संपर्क साधण्याचे आत्मामार्फत आवाहन करण्यात आले आहे.
इयत्या 10 वी उत्तीर्ण व कृषि खत विक्रीचा परवाना या पदविका प्रशिक्षणासाठी पात्रता आहे. इयत्या 10 वी किंवा 12 वी पास प्रमाणपत्र व गुणपत्रक, आधार कार्ड, चार पासपोर्ट साईज फोटो, कृषि खत विक्रीचा परवाना इ.आवश्यक कागदपत्रे प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी सादर करणे बंधनकारक आहे. प्रवेश क्षमता 40 असून 20 हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले आहे.
प्रकल्प संचालक आत्मा कार्यालय विसावा कॉलनी, जुना बायपास रोड, अमरावती या ठिकाणी प्रेवश अर्ज मिळणार असून त्याच ठिकाणी अर्ज स्वीकारले जाईल. संपर्कासाठी 0271- 2660012 दूरध्वनी क्रमांक असा आहे. तसेच या संदर्भात पुढीलप्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
प्रवेश अर्ज वाटप व भरलेले छायांकित कागदपत्रासह परीपूर्ण अर्ज दि. 24 सप्टेंबर  ते 26 सप्टेंबर 2018 पर्यंत कार्यालयान वेळेत सकाळी 11 ते 5.00 स्वीकारले जातील.  चाळीस उमेद्वारांची प्रवेश यादी व प्रतीक्षा यादी 27 सप्टेंबर, रोजी जाहीर करण्यात येईल. व याच दिवशी मुळ कागदपत्र तपासणी करण्यात येईल दि. 28 सप्टेंबर रोजी अंतीम प्रवेशीत उमेदवारांनी वीस हजार रुपये रकमेचा राष्ट्रीकृत बँकेचा डीमाड डॉफ्ट प्रकल्प संचालक, आत्मा अमरावती यांचे काढून प्रवेश निश्चित करणे आवश्यक राहील. प्रवेश अर्ज दोन प्रतीत भरणे आवश्यक असून  http://www.manage.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अर्ज दोन प्रतीत भरुन सादर करणे आवश्यक आहे, असे प्रकल्प उपसंचालक कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा),अमरावती यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
0000000




सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी
भूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा
                 -डॉ. सुनील देशमुख
Ø  विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची आढावा बैठक
Ø  मे 2019 पर्यंत घळभरणीसाठी नियोजन

अमरावती, दि. 17 : शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी संरक्षित सिंचन अत्यंत महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सिंचन प्रकल्प सहाय्यभूत ठरते. प्रकल्पाची गरज व त्याअनुषंगाने निर्माण होणारा पाणीसाठा या महत्वपूर्ण बाबी पूर्ण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून भरीव निधी दिला जातो. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष पुर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या अनुषंगाने भूसंपादन व पुनर्वसनाची कामे संबंधित यंत्रणांनी तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी आज दिले.
            विभागीय आयुक्त कार्यालयात विभागातील सिंचन अनुशेष, अनुशेषाव्यतिरिक्त प्रकल्पाचे भूसंपादन आणि पुनर्वसनबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. विभागीय आयुक्त पियूष सिंह, जिल्हाधिकारी अमरावती, बुलडाणा, वाशिम अनुक्रमे अभिजित बांगर, निरुपमा डांगे, लक्ष्मीनारायण मिश्रा, महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
            ना. डॉ. देशमुख म्हणाले, अमरावती विभागात एकूण 124 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. या प्रकल्पासाठी संपादीत होणाऱ्या 22 हजार 175 हेक्टर जमिनीपैकी 9 हजार 894 हेक्टर जमिनीचे संपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादनाचे कार्य संयुक्त मोजणीद्वारे संबंधीत शासकीय यंत्रणेनी समन्वयातून करावे. जमिनीच्या मोबदल्यासह प्रकल्पबाधित नागरिकांचे पुनर्वसन आणि पुनर्वसित ठिकाणी नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या बारचार्टनुसार सर्व संबंधीत यंत्रणांनी पाठपुरावा करावा. मे 2019 पर्यंत सर्वच अपूर्ण प्रकल्प पूर्ण होऊन घळभरणी होईल यादृ्ष्टीने कामांचे काटेकोर नियोजन करावे.
प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला देऊन त्यांचे पर्यायी जागेवर किंवा गावठाण जमिनीवर पुनर्वसन करावे. पुनर्वसित क्षेत्रात पिण्याचे पाणी, विद्युतीकरणाची कामे, वाहतुकीसाठी रस्ते आदी मुलभूत सुविधा तातडीने पुरवाव्यात. प्रकल्पांच्या कामांबाबतचा तक्ता तयार करुन महामंडळास सादर करावा, तसेच ज्याठिकाणी पाणीसाठा निर्माण झाला आहे, त्याठिकाणी बंद पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. बैठकीत चर्चा केलेल्या प्रकल्पांची कामे उत्कृष्ठ नियोजनातून पूर्ण करावीत, असेही डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
बुलडाणा जिल्ह्यातील जिगांव, राहेरा, खडकपूर्णा, निम्न ज्ञानगंगा, बोराखेडी या पुनर्वसन असलेल्या प्रकल्प तसेच पुनर्वसन नसलेल्या आठ प्रकल्प अशा एकूण तेरा प्रकल्पांच्या सद्यस्थितीबाबत डॉ. देशमुख यांनी माहिती जाणून घेतली. मुख्यमंत्री यांचे वॉररुममध्ये समाविष्ठ जिगांव प्रकल्पबाधित सतरा गावांचे तातडीने पूनवर्सन करुन त्याठिकाणी नागरी सुविधा पुरविण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.
प्रधानमंत्री बळीराजा जलसंजीवनी योजना व मुख्यमंत्री यांचे वॉररुममध्ये समाविष्ठ असलेल्या अकोला जिल्ह्यातील वाई सं., शहापूर व अन्य बारा प्रकल्प असे एकूण चौदा प्रकल्प तसेच वाशिम जिल्ह्यातील 48 प्रकल्प, अमरावतीचे 33 प्रकल्प, यवतमाळचे 16 प्रकल्पा संदर्भात भुसंपादन व पुनवर्सनच्या सद्यस्थिती जाणून घेऊन त्यावर उपाययोजना सुचविल्या. विभागातील सर्वच प्रकल्पांची घळभरणी 2019 पर्यंत होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करुन प्रकल्प पूर्णत्वास आणावेत, अशा सूचना डॉ. देशमुख यांनी बैठकीत दिल्या.
आढावा बैठकीला विभागातील वरिष्ठ महसूल अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूसंपादन अधिकारी, पुनर्वसन अधिकारी, भुमी अभिलेख, नगररचना, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
00000


सोमवार, १० सप्टेंबर, २०१८




इकोफ्रेंडली गणेशमूर्त्यांची विक्री
Ø सिपना महाविद्यालयाचा इकोफ्रेंडली उपक्रम
            
अमरावती, दि. 10 :  पर्यावरण पुरक इकोफ्रेंडली गणेशमुर्त्यांची निमिर्ती व विक्री करण्याचा उपक्रम सिपना महाविद्यालयाच्या एमबीए विद्यार्थ्यांनी सुरु केला आहे. सिपना कॉलेजच्या परिसरातच उभारण्यात आलेल्या स्टॉल्समध्ये गणेश मुर्त्यांची विक्री सुरु आहे. या उपक्रमास नागरिकांची उत्सर्फुत प्रतिसाद मिळत आहे.  
आपली संस्कृती पर्यावरण पुरक असून उत्सवाचे मुळ उद्देश बाजूला सारुन त्याला बीभत्स रुप देणे आपले संस्कार नाही. कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणपती पुजनाने करतो. गणेशोत्सव पर्यावरणपूरक करुन यावर्षी सर्वांनी मातीच्या मुर्तीचा अग्रह धरावा. नैसर्गिक मातीचे मुर्ती तयार करावी, थर्माकोल वापरु नये. मंडळांनी खूप मोठ्या मूर्तीचा आग्रह करु नये. समाजप्रबोधन होईल व संस्कृतीपूरक कार्यक्रम करावे.
उत्सव पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प करु. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून अमरावती शहरात समाजपयोगी व पर्यावरणसंवर्धक उपक्रम राबविण्यात सिपना महाविद्यालय अग्रेसर आहे. नागरिकांनी प्रामुख्याने वृक्षदान, वृक्षारोपण, वृक्षदिंडी, औषधी वनस्पतीचे संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन, निर्माल्यापासून गांडूळखत याद्वारे सामाजिक जागृतीचे कार्य उत्सवाच्या कार्यक्रमातून पार पाडावे.
शहराच्या नामांकीत सिपना कॉलेजच्या एमबीए शाखेच्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक तसेच कॉलेजच्या कर्मचारी, विभागप्रमुख ढवले सर, शिक्षकवृंद आदींनी अथक परिश्रम घेऊन इकोफ्रेंडली मुर्ती तयार करुन विक्री करण्याचा उपक्रम राबवित आहे.
नागरिकांनी मातीच्या गणेश मुर्तींची स्थापना करावी. तसेच तुळशीचे झाडसुध्दा वितरीत करण्यात येत आहे. दिनांक 5 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत शहरात कॉलेजमार्फत विविध ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी सौरव तिडके (7769947712), सिध्दार्थ मैलमट्टी (8830694261), पियुष डहाळे (8007047335)यांच्याशी संपर्क साधावे असे, उपक्रम प्रमुखाव्दारे आवाहन करण्यात येत आहे.
000000

राजर्शी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत
विद्यार्थ्यांसाठी नविन अभ्यासक्रमांचा समावेश
            
अमरावती, दि. 10 :  राजर्शी राहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र विद्यार्थ्यासाठी लाभाची व्याप्ती वाढविली असून काही नवीन अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आला आहे.
शासकीय/अशासकीय अनुदानित अंशत: अनुदानित (टप्पा अनुदानित-विनाअनुदानित) महाविद्यालये व अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठातील अभ्यासक्रमाकरिता (खाजगी अभिमत विद्यापीठे/स्वयंअर्थसहायित खाजगी विद्यापीठे वगळून) शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून मान्यताप्राप्त व्यवसायिक व बिगर व्यावसायीक अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना राजशी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्तीसाठी पालकांचे उत्पन्न मर्यादा 6 लाखावरुन 8 लक्ष रुपये करण्यात आली आहे.
यानुसार व्यवसायीक अभ्यासक्रम-शासन नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काच्या 50 टक्के, बिगर व्यवसायीक अभ्यासक्रम-शासन नियमानुसार आकारण्यात येणाऱ्या परीक्षा शुल्काच्या 100 टक्के, त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक/नोंदणीकृत मंजूर नाहीत परंतु ज्या विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लक्ष रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत खालील प्रमाणे निर्वाह भत्ता अनुज्ञेय आहे.
योजनेस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयाने प्रवेशाच्या वेळी आगाऊ स्वरुपात घेऊ नये व या बाबतील संबंधीत शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांची पिळवणूक होणार नाही याची संबंधीत महाविद्यालय/संस्था खात्री करेल तसेच संबंधीत पात्र विद्यार्थ्यांस डी. बी. टी. द्वारे अनुज्ञेय शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त होताच संबंधित विद्यार्थ्यांने शिक्षण शुलकाची रक्कम तात्काळ महाविद्यालयास अदा करावी याची सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्यांवर राहिल.
तसेच शासकीय महाविद्यालय व अशासकीय अनुदानित महाविद्यालयामध्ये व्यावसायीक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा योजनेस पात्र विद्यार्थ्यांना 100 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे.
बिगर व्यावयायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना 100 टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे तरी अशा सदरील योजनेस पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क भरण्याचा आग्रह महाविद्यालयाने धरु नये.
तरी सर्व शैक्षणिक संस्थांनी आपल्या संस्थेतील सदरील योजनेस पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. तसेच सदरील योजना सन 2018-19 या वर्षामध्ये MAHADBT-Portal द्वारे राबविण्यात येणार असल्याची सर्व विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे सहसंचालक उच्च शिक्षण यांनी कळवीले आहे.
00000000

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची मिशन एवरेस्ट करीता निवड


आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांची
 मिशन एवरेस्ट करीता निवड
            
अमरावती, दि. 7 :  आदिवासी विकास विभाग अमरावती अंतर्गत असलेल्या आदिवासी आश्रमशाळेचे 12 विद्यार्थ्यांची मिशन माउंट एवरेस्ट करीता निवड करण्यात आली आहे. या विभागातील 50 विद्यार्थ्यांची वर्धा व हैद्राबाद येथे शारीरिक क्षमता कसोटी पार पाडल्यानंतर धारणी प्रकल्पातील 9, अकोला प्रकल्पातील 2 आणि पांढरकवडा प्रकल्पामधील 1 असे एकुण 12 विद्यार्थ्यांची अंतिम निवड शौर्य-2अंतर्गत मिशन एवरेस्ट करीता निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना दार्जीलिंग येथे 1 महीन्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांना अपर आयुक्त श्री. गिरीष सरोदे, प्रविण इंगळे उपायुक्त, गजानन गणबावले सहायक आयुक्त, विजय पांडे, सहायक प्रकल्प अधिकारी, मनोहर उके, सहायक प्रकल्प अधिकारी, माळकर, संजय सुरडकर, दत्ताआडे, विलास भरती व आर. डी. शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

राजे उमाजी नाईक यांना अभिवादन

सुधारित

राजे उमाजी नाईक यांना अभिवादन
            
अमरावती, दि. 7 :  राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात उपआयुक्त (सा.प्र.) रमेश मावस्कर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपआयुक्त (महसूल) गजेंद्र बावने, यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली. 





सुधारीत

बिगर मागास विद्यार्थ्यांकरीता
निर्वाह भत्ता योजनेसाठी अर्ज आमंत्रित
Ø आवेदन अर्ज सादर करावयाची अंतीम मूदत 15 सप्टेंबर
अमरावती, दि. 7 : राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या 13 जुलै 2018 च्या शासन निर्णयानुसार अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजने अंतर्गत वसतीगृह सुरु करण्यात येत आहे.
सदर वसतीगृहात राज्यात व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्याक्रमामध्ये प्रवेश घेणारे ज्या विद्यार्थी, विद्यार्थीनीचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर किंवा ज्या विद्यार्थी, विद्यार्थीनीचे पालकांचे उत्पन्न रु 8 लाखापेक्षा कमी आहे. अशा ‘बिगर मागास’ विद्यार्थी, विद्यार्थीनीना प्रेवश घेता येईल.
शैक्षणिक वर्ष 2018-19 मधील प्रवेशीत इच्छूक विद्यार्थी-विद्यार्थीनी दिनांक 15 सप्टेंबर 2018 पर्यंत प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे. सदर अर्जाचा विहीत नमुना तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, अमरावती यांचे वेबसाईट www.jdroamt.org वर तसेच शासकीय तंत्रनिकेतन, अमरावती येथे कार्यालयात उपलब्ध असल्याचे प्राचार्य डॉ. आर.पी. मोगरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.