निवडणूक
प्रक्रियेत काळानुरूप सुधारणा आवश्यक
- विभागीय आयुक्त पियूष सिंह
Ø
लोकशाही,
निवडणूक व सुशासन कार्यशाळा
अमरावती, दि. 1 : देशातील प्रत्येक नागरिक
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असतो. त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत असलेल्या
या प्रक्रियेत कालानुरूप सुधारणा आवश्यक आहेत, असे मत विभागीय आयुक्त पियूष सिंह
यांनी व्यक्त केले.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने येथील संत
गाडगेबाबा विद्यापीठात ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन कार्यशाळा’ आज घेण्यात आली.
यावेळी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेरकर, विशेष पोलिस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे,
यवतमाळचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर,
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. रविंद्र सरोदे, राज्य
निवडणूक आयोगाचे उपजिल्हाधिकारी रविंद्र धुरजड आदी उपस्थित होते.
पियूष सिंह म्हणाले, राजकीय पक्ष आणि शासनाचे
प्रतिनिधी म्हणून निवडणूकांशी थेट संपर्क येतो. निवडणुकीची नियमावली आणि
कार्यपद्धती ठरलेली आहे. कालानुरूप यात बदल व्हावा, असे आपल्याला वाटत असते.
आजच्या कार्यशाळेच्या माध्यमातून निवडणुकांमधील मार्गदर्शक तत्वांमध्ये
कार्यशाळेतील सूचनांचा समावेश व्हावा. कार्यशाळेच्या माध्यमातून आलेल्या सूचना
निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येतील. भविष्यात होणाऱ्या निवडणूकांमध्ये याचा
निश्चितच उपयोग होईल.
मान्यवरांच्या अनेक सूचना
आजच्या कार्यशाळेत
विविध मान्यवरांनी निवडणूक प्रक्रिया राबवित असताना निवडणूक पारदर्शी, विश्वासार्ह
आणि भयमुक्त वातावरणात होण्यासाठी सूचना सुचविल्या.
डॉ. मिलींद चिमोटे
यांनी निवडणुकीमध्ये जात, धर्म, प्रलोभने यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना
आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच उमेदवारांवर असलेल्या बंधनाप्रमाणेच विविध
संघटनांनावरही बंधने असणे आवश्यक असल्याचे सांगितले. सोमेश्वर पुसदकर यांनी आदर्श
आचारसंहितेबाबत माहिती होण्यासाठी जनजागृती करावी, मतदान यंत्राबाबत माहिती
द्यावी, तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावेत. निवडणूकांची
प्रक्रिया राबविण्यासाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात यावी. दिनेश सुर्यवंशी
यांनी निवडणूका व्यक्तिकेंद्रीत होण्यापेक्षा त्या पक्षासाठी असाव्यात, तसेच
निवडणुकीदरम्यान पूर्ण होणारीच आश्वासने देण्यात यावीत. तसेच जाहिर सभांवर
नियंत्रण आणल्यास प्रशासन आणि इतर बाबींवर येणारा तणाव कमी करता येतील. सोशल
मिडीयावरील ॲडमिनच्या भूमिकेबाबतही जनजागृती होणे गरजेचे आहे. डॉ. जयपूरकर यांनी
एकत्रित निवडणूकांबाबत माहिती दिली. डॉ. गवई यांनी निवडणूक काळात माध्यमांचे ऑडीट
होणे आवश्यक आहे. तसेच सोशल मिडीयामुळे नागरिकांचे मत जलद गतीने बदलत असल्यामुळे
त्यावरही आळा घालण्यासाठी उपाययोजना व्हावीत. ॲड. मिर्झा यांनी आधारकार्ड मतदान
प्रक्रियेत जोडल्यास पारदर्शकता येण्यास मदत होईल, असे सांगितले. यावेळी श्री.
रासकर, श्री. वरखेड यांनी सूचना मांडल्या.
अकोला महापालिकेचे आयुक्त जितेंद्र वाघ, ॲड.
फिरदौस मिर्झा, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, प्राचार्य डॉ. सुभाष गवई, विक्रीकर सहायक
आयुक्त टी. के. पाचरणे, दिनेश सुर्यवंशी, सोमेश्वर पुसदकर, मिलींद चिमोटे, भिम
रासकर, पोलिस उपायुक्त प्रदीप चव्हाण आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा