मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी
आशा वर्करची भूमिका महत्वपूर्ण
- आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत
आरोग्यमंत्री
दिपक सावंत यांचा मेळघाट दौरा
अमरावती,
दि. 19 : आरोग्य विभागाचे निरीक्षणाअंती जन्मत:च कमी वजनाचे बालक, कमी दिवसाची प्रसूती,
अॅन्सपेक्सिया, सेप्टिसिमियामुळे अर्भक मृत्यु झाल्याचे आढळून आले असले, तरी बालमृत्यूची
कारणमिमांसा जाणून तातडीची उपाययोजना आरोग्य विभागाव्दारे करण्यात येत आहे. बालमृत्यू
रोखण्यामध्ये आरोग्य सेविकेसह आशा वर्कर यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. त्यांनी
गावातील प्रत्येक नवजात बालकांना व मातांना भेट देऊन प्रात्यक्षिकाव्दारे बाळाच्या
उपचाराविषयी व संगोपनाविषयी मातांना समजावून सांगावे, यामुळेच बालमृत्यूचे प्रमाण कमी
होईल, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी आज बिजूधावडीत केले.
धारणी
तालुक्यातील बिजूधावडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मंत्री महोदयांनी भेट दिली. त्यावेळी
बालमृत्यू संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार आनंदराव अळसूळ, जि.प.उपाध्यक्ष
दत्ता ढोमणे, पंचायत समिती सभापती बळवंत वानखडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री,
आरोग्य संचालिका डॉ. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. सुरेश असोले यांचेसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका,
परिचारीका, अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.
डॉ.
सावंत म्हणाले की, बालमृत्यू रोखण्यामध्ये ग्राम स्तरावर आशा वर्करसह, आरोग्य सेविका
यांची भूमिका फार महत्वाची आहे. त्यांनी गावातील ज्या घरी बाळचा जन्म झाला आहे, अशा
घरी प्रत्यक्ष भेट देऊन मातेला दूध पाजण्याची पध्दती, परिसर स्वच्छता तसेच बाळाचे श्वासोच्छवास
सुरळीत होईल यादृष्टीने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाव्दारे समजावून सांगावे. पावसाळ्यात
संसर्गजन्य आजारापासून बाळाचे संरक्षण करण्यासाठी हॅन्डवॉशसह ॲन्टीबॉयोटीक व सुरळीत
लसीकरण करावे. या कालावधीत आरोगय सेविका व आशा वर्कर यांनी गावातील कुटुंबांना दररोज
नियमित भेटी देऊन पाठपुरावा घ्यावा. गरोदर मातांना पुरक पोषण आहाराचे नियमितपणे वितरण
करावे.
गावातील
तीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित बालके व गरोदर मातांची नोंद घेऊन पाच महिने अगोदर व पाच
महिने नंतरच्या परिस्थितीचे योग्य नियोजन गाव पातळीवर करावे. पुढच्या महिन्यात बाळंतपणासाठी
भरती होणाऱ्या मातांची नोंद आरोग्य सेविकेने घेऊन तशा उपाययोजना केंद्रात करुन ठेवाव्यात.
नऊ ग्रॅम पर्यंत हेमोग्लोबीन असणाऱ्या मातांना आर्यन सुक्रोस तसेच बारा आठवडया प्रमाणे
फॉलीक अॅसीडच्या गोळया द्याव्यात. मेळघाटातील सर्वच तेरा वर्षावरील मुलींना विटॅमीनच्या
गोळ्यांचे सेवन करण्यासाठी वितरण करावे. अतिदक्षता माता व बालकांसाठी हॉयपोथरमीया कीट
मातांना वितरीत कराव्या, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
आरोग्य
संचालिका डॉ. पाटील म्हणाल्या की, नवजात बालकांच्या घरात व परिसरात स्वच्छता ठेवावी.
कुठलाही संसर्गजन्य आजाराची लागण होऊ नये म्हणून गुरा-ढोरांना घरात न बांधता इतर ठिकाणी
बांधावे. त्यामुळे गुरांच्या मलमुत्रापासून आजाराची लागण होणार नाही. घरात चुलीच्या
धुरामुळे बाळाच्या आरोग्यावर परीणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी. बालमृत्यूचे प्रमाण
कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेणी बालमृत्यूचे अंकेक्षण करुन तश्या सर्वच उपाययोजना
प्राथमिक आरोग्य केंद्रात कराव्यात. प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दर आठवड्यात दिननिहाय
प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी द्याव्यात. बालमृत्यू टाळण्यासाठी जननी शिशू सुरक्षा
योजना, आरोग्य संस्थेत प्रसूती, पोषण आहार, बालउपचार केंद्र, आशामार्फत गृहभेटीद्वारे
पाठपुरावा, जंतनाशक व जीवनसत्त्व अ मोहीम, नियमित लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ्य
कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत बालरोगतज्ज्ञांकडून तपासणी आदी उपाययोजनांची
प्रभावीपणे अमंलबजावणी करावी.
मेळघाटातील
बालमृत्यूचे उच्चाटन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी
समन्वयातून तसेच आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेतून कुठल्याही मातेची किंवा बालकांचा आरोग्य
सुविधा अभावी मृत्यू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपल्या कर्तव्याशी व सेवेशी प्रामाणिक
राहून आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असेही आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा