बुधवार, ५ सप्टेंबर, २०१८

मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी
त्री-सुत्रीचा अवलंब करा
          -आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत

  आरोग्यमंत्री दिपक सावंत यांचा मेळघाट दौरा

अमरावती, दि. 5 : मेळघाट हा आदिवासीबहुल भाग कुपोषित बालके, बालमृत्यू व मातामृत्यू यासाठी नेहमी चर्चेत असतो. गेल्यावर्षी जुलै महिन्यात बालमृत्यूचा दर कमी झाला होता. परंतू यावर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या बालमृत्यूची कारणमिमांसा जाणून घेऊन तातडीची उपाययोजना शासनामार्फत करण्यात येत आहे. मेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी डॉक्टरांनी गाव पातळीवर कार्यरत असलेल्या आशा वर्कर, आरोग्य सेविका व अंगणवाडी सेविका या तीन सुत्रीच्या माध्यमातून आरोग्य, पोषण आहारच्या सुविधा माता-बालकांना तातडीने पुरवाव्यात, असे कठोर निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी आज धारणी येथे दिले.
धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात बालमृत्यू संदर्भात मेळघाटातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धारणीचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहूल कर्डीले, नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, अकोला उपसंचालक डॉ. फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत पवार, डॉ. प्रधान, नानावटी रुग्णालय, पुण्याचे बालरोगतज्ञ डॉ. बीराजदार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. भिलावेकर यांचेसह सर्व आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणाले की, बालमृत्यू रोखण्यासाठी किंवा त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आशा वर्करसह तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांची जबाबदारी आहे. या साखळीत प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याची भूमिका अतिशय महत्वाची आहे. मेळघाटातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील प्रत्येकी दोन प्राथमिक आरोग्य केंद्राचे अंतर अधिक असल्यामुळे आरोग्य सेविकांना सर्वच माता, बालकांच्या भेटी घेण्यासाठी अडचणी येतात. या अडचणीवर मात करण्यासाठी प्राथमिक आरोग्य अधिकारी यांनी दर आठवड्यात दिननिहाय प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी द्याव्या, अशा सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या.
पुढे बोलतांना डॉ. सावंत म्हणाले की, जन्मत:च कमी वजनाचे बालक, कमी दिवसाची प्रसूती, अॅन्सपेक्सिया, सेप्टिसिमिया यामुळे अर्भक मृत्युदर अधिक असून विविध आजारांमुळे शून्य ते ६ वर्षांपर्यंतच्या बालकांचे मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे. बालमृत्यू टाळण्यासाठी जननी शिशू सुरक्षा योजना, आरोग्य संस्थेत प्रसूती, पोषण आहार, बालउपचार केंद्र, आशामार्फत गृहभेटीद्वारे पाठपुरावा, जंतनाशक व जीवनसत्त्व अ मोहीम, नियमित लसीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत बालरोगतज्ज्ञांकडून तपासणी आदी उपाययोजनांची प्रभावीपणे अमंलबजावणी करण्यात यावी.
बाळंतपणासाठी भरती झालेल्या मातेची योग्य काळजी घ्यावी, रुग्णालयात नेहमी स्वच्छता ठेवून वैद्यकीय अधिकारी, परिचारीका यांनी प्रत्येक बाळंतपणासाठी स्वतंत्र हॅन्ड ग्लोज, मॉस कॅप, गॉऊनचा वापर करावा. तसेच मातेच्या भेटीसाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हॅन्ड वॉश तसेच इतर साधनांचा उपयोग करण्यास बाध्य करावे, जेणेकरुन मातेला किंवा बाळाला संक्रमन होणार नाही. दुसऱ्याच्या संक्रमणामुळे बाळ दगावले, अशी तक्रार कुठेही ऐकू येता कामा नये. गावातील तीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित बालके व गरोदर मातांची नोंद घेऊन पाच महिने अगोदर व पाच महिने नंतरच्या परिस्थितीचे योग्य नियोजन गाव पातळीवर करावे. पुढच्या महिन्यात बाळंतपणासाठी भरती होणाऱ्या मातांची नोंद आरोग्य सेविकेने घेऊन  तशा उपाययोजना केंद्रात करुन ठेवाव्यात.
मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू व मातामृत्यूचे उच्चाटन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी समन्वयातून तसेच आरोग्य सुविधांच्या उपलब्धतेतून कुठल्याही मातेची किंवा बालकांचा आरोग्य सुविधा अभावी मृत्यू होणार नाही, याची दक्षता घ्यावी. आपल्या कर्तव्याशी व सेवेशी प्रामाणिक राहून आदिवासींना आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असेही आवाहन डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
मेळघाट दौरा कार्यक्रमात प्रारंभी आरोग्य मंत्र्यांनी हरिसाल आणि कारादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना व अंगणवाडी यांना भेटी देऊन तेथील आरोग्य

सुविधा, औषधांचा साठा, पोषण आहार याविषयी माहिती जाणून घेतली. रुग्णांना तातडीने सर्व आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना मंत्री महोदयांना आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा