बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

प्रशिक्षीत शिक्षक घडविणार मेळघाटातील विद्यार्थ्यांचे भविष्य
कार्यप्रेरणा शिक्षण परिषद
मेळघाटातील अभिनव प्रयोग
अमरावती, दि. 18 : शैक्षणिक प्रवाहापासून दुर असलेल्या, हसत-खेळत शिक्षणाच्या अनुभवापासून वंचित राहिलेल्या मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे आता खुली झाली आहेत. तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी परंपरागत शिक्षणासोबतच हसत खेळत, ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणाची कल्पना मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये रुजत आहे.
नुकताच शिक्षणविषयक गुणवत्तापूर्ण कार्यक्रमाचा येथे शुभारंभ झाला असून शंभर टक्के प्रगत विद्यार्थी घडविण्यासाठी मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षकांना प्रशिक्षीत करण्याचा अभिनव प्रयोग साकारला. आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या धारणी प्रकल्पातील 46 शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या 85 शिक्षकांना दोन दिवसीय कार्यप्रेरणा शिक्षण परिषदेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले.
धारणीचे प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले, सहायक प्रकल्प अधिकारी शिवानंद पेठकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव प्रयोग साकार झाला. खासगी शाळांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येदेखिल गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जात आहेत. त्याच धर्तीवर आता आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना गणित, भाषा, खेळ, कला या सर्व विषयांमध्ये प्रशिक्षीत शिक्षक नैपूण्य प्रदान करीत आहेत. या कार्यप्रेरणा परिषदेत आपली शाळा आपले कर्तव्य, भाषेचे ज्ञान, भाषिक उपक्रम, शैक्षणिक साहित्याची निर्मिती, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास, खेळ व कलेचे शिक्षणातील स्थान या सर्व विविधांगी विषयांचे प्रशिक्षण शिक्षकांना तज्ञांनी दिले. विनोद राठोड, उमेश आडे, अनुपमा कोहळे, धिरज जवळकर या विषय तज्ञांनी प्रत्येक विषयाची उकल करुन शिक्षकांना प्रशिक्षीत केले.

आदिवासी विभागाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी ओढ निर्माण व्हावी. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा. या आश्रमशाळांमध्ये प्रगत विद्यार्थी घडावे यासाठी कार्यप्रेरणा शिक्षण परिषदे अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षीत करण्यात आले आहे. त्यातून शैक्षणिक फलनित्पत्ती निश्चितच होईल.
                                                                                                      - राहुल कर्डिले, प्रकल्प अधिकारी धारणी.


शैक्षणिक गुणवत्ता कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना हसत-बागडत, आनंदाने आणि प्रात्यक्षिकांमधून कशा पध्दतीने शिकवावे याचे प्रशिक्षण दिल्याने आदिवासी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येतील.
                                                                                                                  - विनोद राठोड प्रशिक्षक.


मेळघाटातील आदिवासी विद्यार्थी त्यांच्या उज्जवल भविष्याची स्वप्ने आता नक्कीच सत्यात उतरवू शकतील.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा