बुधवार, १० जुलै, २०१९

उच्च शिक्षणासाठी प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती


उच्च शिक्षणासाठी प्रवेशित अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना  
राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती

·         www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याची सुविधा
·         अर्ज सादर करण्याची 29 जुलै अंतिम मुदत

अमरावती, दि. 10 : महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरिता देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती लागू केली आहे.
याअनुषंगाने शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विहीत कालावधीत अर्ज भरणे आवश्यक आहे. यासाठी विभागाव्दारे www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती/ नवबौध्द प्रर्वगातील असावा. महाराष्ट्र  राज्याचा रहिवासी असावा. कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा सहा लाखापेक्षा कमी असावी. पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची कमाल वयोमर्यादा 25 वर्षे व पदव्यूतर पदवी/ पदविका अभ्यासक्रमासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्ष इतकी आहे.
 विद्यार्थी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्गाला शिकत असला पाहिजे. तथापी त्यापुढील वर्षाचे विद्यार्थी अर्ज करु शकतील परंतू त्यांचा विचार प्रथम वर्षाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास करण्यात येईल. विद्यार्थी इ. 10 व 12 वी ची परिक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळ अथवा महाराष्ट्र राज्य क्षेत्रातील अन्य परीक्षा मंडळातून उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी इ. 12 वीच्या परीक्षेमध्ये किमान 55  टक्के गुण मिळविणे आवश्यक राहिल व डायरेक्ट द्वितीय वर्षासाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना डिप्लोमामध्ये 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे.पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेमध्ये किमान 55 टक्के गुण असणे आवश्यक आहे. उपरोक्त नमूद शिष्यवृत्ती देश पातळीवरील मान्यताप्राप्त संस्थातील अभ्यासक्रमासाठी लागू राहिल.
संस्थांची यादी संकेतस्थळावर सविस्तर जाहिरातीतील परिशिष्ठ नुसार पहावयास मिळेल. वेळोवळी या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित झालेल्या इतर अटी व शर्ती विद्यार्थ्यांना बंधनकारक असतील. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मंजूर करण्याचा अंतिम अधिकार शासनास राहिल.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांस भारत सरकार शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेले पूर्ण शैक्षिणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथपाल, संगणक शुल्क इ. देय राहील. शैक्षणिक संस्थेतील वसतिगृह व भोजन शुल्क याचा त्यांच्या आकारणीप्रमाणे खर्च देण्यात येईल.  तसेच शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहात जागेअभावी प्रवेश न मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांना संस्थेने आकारणी केलेले वसतिगृह व भोजन शुक्ल देय राहिल. वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेप्रमाणे निर्वाहभत्ता देण्यात येईल. तसेच प्रवेशीत अभ्यासक्रमासाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी पाच हजार रुपये व शैक्षणिक साहित्य आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी एकूण पाच हजार रुपये असे एकूण दहा हजार रुपये प्रत्येक वर्षी देण्यात येईल.
इच्छूक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याकरीता दि. 29 जुलै 2019 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. दि. 29 जुलै 2019 ही अर्ज सादर करण्यासाठी अंतिम दिनांक असून विद्यार्थ्यांनी विहित वेळेत आपले अर्ज नमूद संकेतस्थळावर भरावेत, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त (समाज कल्याण) विजय साळवे यांनी केले आहे.
000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा