शनिवार, ६ जुलै, २०१९

आदिवासी आश्रमशाळेतील समस्या तात्काळ सोडवाव्यात - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके





आदिवासी आश्रमशाळेतील समस्या तात्काळ सोडवाव्यात
                                                                                    - आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
                  
*आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश
अमरावती, दि.4 : धारणी, मेळघाटातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी आणि आरोग्य विषयक सुविधा प्राधान्याने पुरविण्यात याव्यात, तसेच मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आश्रमशाळेत महिला शिक्षिका, अधिक्षिका आणि सुरक्षारक्षकांनी पूर्णवेळ उपस्थित असणे आवश्यक आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करुन देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्य आणि शैक्षणिक समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.
येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त एम. जे. प्रदिपचंद्रम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी एस. टी. खिल्लारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्यामसुंदर निकम उपस्थित होते. आदिवासी विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी घेतला.
आरोग्यविषयक सुविधांची माहिती घेताना धारणी-मेळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध राहावा, दुर्गम भागात आरोग्यविषयक सुविधा पुरविण्यात अडचणी येत असल्याने येथील नागरिकांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्यात याव्यात. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांवर तात्काळ नियंत्रण मिळविण्यात यावे, रुग्णवाहिकांची संख्या वाढवण्याच्या सूचना डॉ. उईके यांनी केल्या. महिला व बालविकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या पोषण आहार योजनांची माहिती त्यांनी घेतली. स्तनदा आणि गर्भवती मातांसाठी एपीजे अब्दुल कलाम पोषण आहार योजनेवर गावस्तरावरील समिती लक्ष देत असल्याची माहिती देण्यात आली.
शिक्षण विभागाकडून आदिवासी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वाटपाची माहिती घेतली. पाच आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना ‘नीट’ परिक्षेच्या तयारीसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्यात येते. तसेच नामांकीत महाविद्यालयातील तज्ज्ञांकडून मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. कार्यकारी अभियंता यांनी धारणी तालुक्यामधील सौर उर्जेवरील सिंचन योजना कार्यान्वित झाली असल्याची माहिती दिली. मेळघाटातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी पुनर्वसित गावातील तरुणांना वाहन चालकांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी वाहनाचा पुरवठा करण्यात आला आहे. निसर्ग पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बैठकीनंतर डॉ. उईके यांनी पंचवटी येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यास हारार्पण केले. त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्थेला भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा