सोमवार, २२ जुलै, २०१९

जलशक्ती अभियानातून जलसंवर्धन करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल





जलशक्ती अभियानातून जलसंवर्धन करावे
                                                                                                                           - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
Ø  शाळकरी मुलांच्या लिखीत पोस्टकार्डच्या संदेशातून जलजागृती
Ø  शालेय जीवनातच पाणी बचतीचे संस्कार
अमरावती, दि. 22 :  पृथ्वीतलावरील सर्व सजीवांसाठी पाणी ही गरज आहे. पाण्याचे महत्व सगळ्यांना माहित असून टंचाईची झळ लोक सोसत आहे. पाण्याची बचत हीच त्याची निर्मिती आहे. पाण्याचे महत्व ओळखून केंद्र शासनाने जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करुन देशभरात जलशक्ती अभियान सुरु केले आहे. प्रत्येकाने पाण्याचे महत्व समजून जलसंवर्धन करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून जाणीवपूर्वक जलजागृती करावी. तसेच जलशक्ती अभियान अंतर्गत पाणी बचतीच्या लोकचळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे जलशक्ती अभियानांतर्गत एक दिवशीय जलजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शिक्षणाधिकारी निलीमा टाके, भुजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भुवैज्ञानिक अरविंद साळवे तसेच गटशिक्षणाधिकारी, जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षकवृंद, पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
            श्री. नवाल म्हणाले की, जलशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील अचलपूर, चांदुर बाजार, मोर्शी, वरुड या तालुक्यातील भूजलाची स्थिती लक्षात घेता त्याठिकाणी जोरकसपणे मोहिम राबविण्यात येणार आहे. देशभरात अभियानाचा शुभारंभ 1 जुलैला झाला असून 15 सप्टेंबर पर्यंत मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील निवड झालेल्या तालुक्यातील सर्व यंत्रणांनी जलसंवर्धन मोहिमेची जनजागृती व लोकशिक्षणासाठी मनापासून प्रयत्न करावे. जिल्हा परिषद, शिक्षण विभागाने शाळा व महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन, पथनाट्ये, घराच्या भिंती व फलक रंगाई, पावोळा, भारुड आदींच्या माध्यमातून मोठया प्रमाणात जलसंवर्धनाबाबत जनजागृती करावी.
            भुजलाची पातळी खालवलेल्या भागात अधिक प्रमाणात लक्ष केंद्रीत करुन ‘ रेन वॉटर हार्वेस्टींग,’ करावे. पारंपारिक जलस्त्रोतांचे नुतणीकरण व पुनर्भरण, पुनर्वापर व वनीकरण, शाळेत, घरासमोर, पाण्याच्या टाकीपाशी व सार्वजनिक ठिकाणी शोषखड्ड्यांची निर्मिती करावी. मोहिमेच्या अनुषंगाने जलबचतीचे काम लोकसहभागाच्या माध्यमातून करावे त्यामुळे ही बाब सर्वांच्या लक्षात येईल. जलसंवर्धनाच्या या मोहिमेत शाळकरी मुलांना सहभागी करुन घ्यावे. त्यांच्याकडून पोस्ट कार्डवर त्यांचे पाण्या संदर्भातील अनुभव लिहीण्याच्या किंवा चित्र रंगविण्याच्या स्पर्धा घ्याव्यात. त्यांनी लिहीलेल्या संदेशाचे ग्रामसभेमध्ये किंवा चावडीवर वाचन करुन इतरांना त्याचे महत्व पटवून द्यावे. यामुळे लहान मुलांनी निरागस मनाने केलेली कृती इतरांना दिशादर्शक ठरेल व ते सुध्दा जलसंवर्धनाच्या कामात मनापासून सहभागी होईल, असे श्री. नवाल यांनी यावेळी सांगितले.
            शाळासिध्दी उपक्रम तसेच शाळा समितीच्या बैठकीतून पाण्याच्या बचतीविषयी जनजागृती करावी. प्रत्येक शाळेत जलशक्ती अभियान तसेच जलसंवर्धनाचे आकर्षक मॉडेल तयार करुन त्यामाध्यमातून पाण्याचे महत्व पटवून द्यावेत. नागरिकांना पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी जलसाक्षरता महत्वाची आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाण्याची बचत हा संस्कार झाला पाहिजे. लहान मुलांवर शालेय जीवनापासून हा संस्कार रूजविला पाहिजे. शिक्षकांनी शालेय अभ्यासक्रमासोबतच मुलांना पाण्याचे महत्व आणि आत्मविश्वासाने जीवन जगण्याचे संस्कार मुलांमध्ये रुजवावे. रक्षाबंधन व मित्र दिवस यासारख्या दिवशी जलमित्र, जलबंधन राखीतून पाण्याविषयी जनजागृतीपर संदेशाचे आदानप्रदान करावे.  
            जलशक्ती कार्यशाळेत रहाटगाव प्रगती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाणी हरवलं, कोणी ग ते चोरलं.. हे जलसाक्षरता गित सादर केले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सादरकर्त्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन कौतूक करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा