वृक्षलागवड मोहिमेला जिल्ह्यात उत्साहात सुरुवात
विभागीय आयुक्तांच्या
हस्ते चिरोडी वनपरिक्षेत्रात वृक्षारोपणाने शुभारंभ
अमरावती,
दि. 1 : राज्य शासनाच्या 33 कोटी वृक्षलागवड मोहिमेचा विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या
हस्ते चिरोडी वनपरीक्षेत्रात वटवृक्षाचे रोपण करुन शुभारंभ झाला. या मोहिमे अंतर्गत
जिल्ह्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबर या
कालावधीत 1 कोटी 20 लक्ष झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, जिल्ह्यातील सर्व शहरे,
गावे, शाळा, कार्यालये, विविध सामाजिक संस्था या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी
शैलेश नवाल, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी मनीषा खत्री, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह विविध
विभागांचे अधिकारी, कर्मचारी, वसुधाताई देशमुख कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थी,
चिरोडी जिल्हा परिषदेचे विद्यार्थी, गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.
चिरोडी
वनपरिक्षेत्रात आज सकाळपासून विद्यार्थी, स्वयंसेवक, कार्यकर्ते, महिला संघटना,
वनसंवर्धन संस्थांचे सदस्य आदी मोठ्या उत्साहाने दाखल झाले होते. निसर्ग संरक्षण संस्था,
वाईल्डलाईफ अँड एन्व्हार्यनमेंट कन्झर्वेशन सोसायटी यासारख्या अनेक संस्थांचा
वृक्षलागवड मोहिमेत सहभाग होता. विभागीय आयुक्तांनी वटवृक्ष लावून मोहिमेचा आरंभ
केला. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम व सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. शाळा-
महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात कडूनिंब, शेवगा, आवळा, चिंच, बेहडा, पिंपळ व बांबूंची
रोपटी लावली. यामुळे चिरोडी गावानजिक असलेल्या वनक्षेत्रात पर्यावरणाचे संवर्धन
होणार असून अधिक जीवनमान असलेल्या वृक्षारोपणामुळे प्राणवायू व पशु-पश्यांना निवास
मिळणार आह. जिल्ह्यातील मोकळ्या जागा, शासकीय, उद्योग व इतर संस्थांची कार्यालये,
सार्वजनिक स्थळे, शेतीबांध, टेकड्या, नदीकाठ आदी ठिकाणी कडुनिंब, बांबू, आवळा, पिंपळ, चिंच, सीताफळ,
बेहडा, साग आदींची उपवने या मोहिमेतून बहरणार आहेत.
पर्यावरण संवर्धनाचे संस्कारातून निसर्गाची अनुभूती
मोहिमेत पालक व विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात
सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाचे संस्कार जोपासले जाणार असून विद्यार्थ्यांना व
नागरिकांना या माध्यमातून निर्सगाची अनुभूती होणार असल्याचे विभागीय आयुक्त पियूष
सिंह यांनी यावेळी सांगितले.
मोहिम नियोजन
मोहिमेत विविध शासकीय विभागांसह ग्रामपंचायती,
स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मिळविण्यात आला आहे. चिरोडी वनपरीक्षेत्राच्या सुमारे
25 हेक्टर वनजमीनीवर 27 हजार 725 झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. वन विभागावर
मोहिमेची जबाबदारी असून सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत व विविध विभागांकडून 1 कोटी
20 लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होणार आहे. सुमारे दिड कोटीहून अधिक रोपे रोपवाटीकेत
तयार आहेत. शेतीबांधांवर शेवगा, कढीपत्ता, आवळा व औषधी वनस्पती आदी वृक्ष लागवड
होणार आहे. ‘नरेगा’अंतर्गत मनुष्यबळही उपलब्ध करुन घेण्यात
येत आहे. ‘जिओ टॅगिंग’मुळे प्रत्येक खड्ड्याची, लागवड केलेल्या झाडाची नोंद व
तपासणी ठेवता येणे शक्य आहे. नदीच्या दोन्ही काठांपासून एक किलोमीटर रूंदीत उपलब्ध
क्षेत्रात वृक्षलागवड होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा