सोमवार, १५ जुलै, २०१९

विकासनिधीतून गुणवत्तापूर्ण लोकहितकारी कामे पूर्ण करावी - पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे









पालकमंत्र्यांच्या हस्ते 97 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
विकासनिधीतून गुणवत्तापूर्ण लोकहितकारी कामे पूर्ण करावी
-              पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे
अमरावती, दि. 15 :  वरुड व शेंदुरजनाघाट नगर परिषदांना विविध विकासकामे करण्यासाठी भरीव निधी शासनाव्दारे उपलब्ध झाला आहे. या विकासनिधीतून गुणवत्तापूर्ण, कायमस्वरुपी टिकणारी लोकहिताची कामे पूर्ण करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले.
            वरुड तालुक्यातील उदापुर, घोराडा व शेंदुरजनाघाट नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या 97 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या हस्ते काल रविवारी (दि.14 जुलै रोजी) भूमिपूजन झाले. शेंदुरजनाघाट येथील केदारेश्वर मंदीर परिसरात आयोजित भूमिपूजन समारंभात ते बोलत होते.
            यावेळी शेंदुरजनाघाट नगरपालिकेचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, उपाध्यक्ष विशाल सावरकर, डॉ. वसुधाताई बोंडे, वरुड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा स्वातीताई आंडे यांचेसह वरुड, शेंदुरजनाघाट नगर परिषदेचे पदाधिकारी, सभापती आदी उपस्थित होते.
            वरुड-शेंदुरजनाघाट दौऱ्यात प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते वरुड तालुक्यातील उदापूर ग्राम नजिक घोराड-उदापूर रस्त्यावरील पुलाचे व रस्त्याचे बांधकामाचे (किंमत 1 कोटी 52 लक्ष 63 हजार) भूमिपूजन व कृषी सहायक कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यानंतर घोराड गावानजिक सदावर्ती नदीवर आमनेर-घोराड-उदापूर रस्त्‍यावरील पुलाच्या बांधकामाचे (किंमत 1 कोटी 61 लाख रुपये) पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच व नागरिक उपस्थित होते.
            शेंदुरजनाघाट नगर परिषद अंतर्गत मौजा मलकापूर येथील खुल्या जागेवर सास्कृतिक भवनाचे बांधकाम (किंमत 1 कोटी 97 लाख 65 हजार), प्रभाग क्र. आठ मधील  प्राथमिक आरोग्य केंद्र ते न.प. हद्दीपर्यंत रस्त्याचे बांधकाम (किंमत 2 कोटी 27 लाख 75 हजार), जिवना नदीवर एस.टी. स्टॅन्डजवळ पुलाचे बांधकाम करुन ॲप्रोच रस्त्याचे बांधकाम करणे (किंमत 95 लाख 76 हजार), गुजरी बाजाराचे सौंदर्यीकरण (किंमत 28 लाख 36 हजार ) आदी विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. बोंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
शेंदुरजनाघाटची उद्योगाचे शहर म्हणून ओळख निर्माण करावी
शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावे - डॉ. अनिल बोंडे
श्री. बोंडे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाकडून अनेक शेतीवर आधारित योजना राबविण्यात येतात. शेतकरी व शेतमजूर यांनी उत्पादक कंपन्यासाठी लागणारे उत्पादन गटशेतीच्या  माध्यमातून पिकवावे. गटशेतीच्या माध्यमातून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी 50 टक्के अनुदान कृषी विभागाकडून देण्यात येते. वरुड-मोर्शी तालुक्यात संत्रा पिक मोठया प्रमाणात घेतात. त्याअनुषंगाने संत्रा व इतर कडधान्य, तेलबिया पिकांवर प्रक्रिया करुन प्रक्रिया उद्योग उभारावे. अशा प्रकारचे अनेक प्रक्रिया उद्योग स्थापित करुन शेंदुरजनाघाटची उद्योगाचे शहर म्हणून ओळख निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.
            वरुड मोर्शी तालुक्यात सुमारे 13 हजार हेक्टर क्षेत्रावर कमी पावसामुळे संत्रा झाडे वाळली आहेत. वाळलेल्या संत्रा परीक्षेत्राचे सर्वेक्षण कृषी विभागाव्दारे करण्यात आले असून शेतकऱ्यांना 12 टक्के अनुदान निधी नुकसान भरपाई म्हणून शासनाकडून दिला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची संत्रा झाडे वाळली आहेत अशा पाच एकरपेक्षा जास्त शेतजमिन असणाऱ्या शेतकऱ्यांना भाऊसाहेब पुंडकर फळबाग योजने अंतर्गत साठ हजार रुपये प्रती हेक्टर मदत व पाच एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असणाऱ्यांना मनरेगा अंतर्गत मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाचे 75 ते 80 टक्के अनुदान योजना लागू करण्यात आली आहे. तालुक्यातील नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या गोरगरीबांसाठी घरकुल निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 1 कोटी 73 लाख रुपयाचा निधी सुध्दा संबंधित नगरपरिषदेच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.
            शेंदुरजना घाट शहराची सुंदर शहर म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी सोलर प्रकल्प, अंडरग्रॉउंड वीज जोडणी करावी जेणेकरुन शहरातील सर्व लाईट्स व नगर पालिका कार्यालय सोलरच्या उर्जेवर कार्यान्वित राहणार. महिला व युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जॉबकार्ड वितरीत करण्यात येणार आहे. या माध्यमातून दहावी ते पदवीपर्यंत शिकलेल्या युवकांना कंपनी व इतर उद्योग क्षेत्रात रोजगार मिळणार आहे. जिल्ह्यात अर्पिता ठाकरेच्या प्रकरणानंतर मुलींच्या स्वरक्षणासाठी जिल्ह्यातील शाळा -महाविद्यालयातील सर्व मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्याची मोहिम राबविली जाणार आहे, असेही श्री. बोंडे यांनी सांगितले.
            भूमिपूजन समारंभाला मोठया संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

00000
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा