शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 



लोणार विकास आराखड्यातील कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा

                          - विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 

अमरावती, दि. 15 : लोणार विकास आराखड्यातील कामे कालमर्यादेत पूर्णत्वास जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करावीत. कामांच्या प्रगतीचा अहवाल वेळोवेळी समितीला सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.

लोणार विकास आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विषयांचा आढावा विभागीय आयुक्तांनी बैठकीद्वारे आज विभागीय आयुक्त कार्यालयात घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दूरदृश्यप्रणालीव्दारे तसेच मुख्य वनसंरक्षक जयोती बॅनर्जी, समितीचे सदस्य एस सान्याल, दिपक ठाकरे, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलीक, विशेष कार्य अधिकारी सुशील आग्रेकर, उपसंचालक (नियोजन) हर्षद चौधरी, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, एमएमआरडीएचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, बुलडाणा जिल्ह्यातील बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर हे जगविख्यात आहे. हे स्थळ जैवविविधतेने सपन्न असून पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. या पर्यटनस्थळाच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाव्दारे 369 कोटी 78 लक्ष रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्यातील प्रस्तावित कामे पूर्णत्वास जाण्यासाठी समितीव्दारे नियमितपणे आढावा घेण्यात येतो. आराखड्यांतर्गत येणाऱ्या विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता व निधीची तरतूद करुन देण्यात आली आहे. त्यानुसार विकासकामे गतीने पूर्ण होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. विकास आराखड्यांतर्गत येणारी लोणार सरोवर व परिसरातील नागरी सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावीत, असे निर्देश त्यांनी संबंधित कार्यान्वयन यंत्रणांना दिले.

            सरोवरातील पाण्याचा उपयोग होण्यासाठी पाण्याची ‘पीएच व्हॅल्यू’ भुजल सर्वेक्षण विभाग व निरीच्या तज्ज्ञांकडून तपासून घेण्यात यावी, अशा सूचना समितीने संबंधित यंत्रणांना केल्या. भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या 15 मंदिरांचे जतन, संरक्षण व सुशोभिकरण अंतर्गत येणारी दुरुस्तीची कामे पुरातत्व विभागाने करावयाची असून त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली आहे. लोणार सरोवर परिसरातील गायमुख मंदिरस्थळी भेट देणाऱ्या पर्यटक व नागरिकांकडून आंघोळीसाठी  शॅम्पू, डिर्टजंन्ट व साबून वापरण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. यामुळे लोणार सरोवरातील पाणी दुषित होत असून त्यातील जैवविविधतेवर संकट निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्याठिकाणी आंघोळीसाठी प्रतिबंध करण्याबाबतच्या सूचना जिल्हा प्रशासनाला विकास आराखडा समितीने दिल्या.

लोणार सरोवराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या, त्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या माहितीचा अहवाल नियमितपणे समितीला सादर करण्यात यावा, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी वन विभागाला दिल्या. सरोवर परिसरात पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे, निवारा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत. विद्यापीठाकडून उभारण्यात येणाऱ्या लोणार विज्ञान केंद्र व संशोधन प्रयोगशाळेचे काम वेळेत पूर्ण व्हावे, जेणेकरून उमद्या संशोधकांकडून संशोधनाला चालना मिळेल. लोणार सरोवर परिसरातील ‘ईको टुरिझम’ चे काम पूर्णत्वास जाण्यासाठी वनविभागाने जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, असेही डॉ. पाण्डेय यांनी यावेळी सांगितले.

00000

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

मतदार यादी निरीक्षकांकडून अमरावती, बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा

 मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-2024


मतदार यादी निरीक्षकांकडून अमरावती, बडनेरा मतदारसंघातील

निवडणूक कामकाजांचा आढावा

 

·         ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन

 

·         व्होटर हेल्पलाईन ॲप व voters.eci.gov.in  ceo.maharashtra.gov.in संकेतस्थळ वापरा

 

 

          अमरावती, दि. 14 : भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 जाहीर करण्यात आला आहे. मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांची ‘मतदार यादी निरीक्षक’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार डॉ. पाण्डेय यांनी आज अमरावती उपविभागीय कार्यालयात अमरावती व बडनेरा मतदारसंघातील निवडणूक कामकाजांचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय कार्यालयात उभारण्यात आलेल्या ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्राचे विभागीय आयुक्तांच्या हस्ते उद्घाटनही करण्यात आले.

            जिल्हाधिकारी सौरभ कटियार, उपायुक्त संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, रणजित भोसले,  भातकुलीच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पी.एम. मिन्नू, तहसीलदार श्री. लोखंडे आदी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नागरिकांना ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्रावर मतदानाचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात आले.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, मतदानाविषयी मतदारांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावे. 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांचे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे. त्यासाठी त्यांच्याकडून आवश्यक नमूना भरुन घेण्यात यावेत. स्थलांतरीत किंवा मयत झालेल्या मतदारांसंबंधी खात्री करुन मतदार यादी अद्ययावत करण्यात यावी. घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित बीएलओकडून मतदारांचे सर्वेक्षण करण्यात यावे. मतदाराच्या नाव, फोटो व पत्त्यामध्ये बदल असल्यास अचूकप्रमाणे सुधारणा करुन घेण्यात यावी. तसेच मतदारांचे आक्षेप किंवा शंकांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे. एकही व्यक्ती मतदानापासून वंचित राहणार नाही, याची जाणीवपूर्वक खबरदारी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

मतदारांच्या काही निवडणूकविषयक तक्रारी असतील त्या तत्परतेने सोडविल्या जाव्यात. मतदार निवडणूकविषयक तक्रारी असल्यास 1950 या टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्याबाबत जनजागृती करावी. शहरी आणि ग्रामीण भागात दोन्ही ठिकाणच्या मतदार यादीत मतदारांचे नाव असतात. कोणत्या एका ठिकाणी मतदार यादीत नाव पाहीजे हे मतदाराला विचारणा करून तेथील यादीत नाव ठेवावे. ज्या कुटूंबामध्ये 10 व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती आहे, अशा कुटुंबाची तपासणी करून त्यांच्यात दुरुस्ती करण्यात यावी. नवमतदार तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत नाही, अशा सर्व पात्र मतदारांची मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. मतदार नोंदणीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲप किंवा voters.eci.gov.in  ceo.maharashtra.gov.in चा वापर करण्यासंबंधी तसेच जवळचे मतदान केंद्रावर बीएलओकडे जाऊन नमुना 6 चा अर्ज भरण्याबाबत प्रसिध्दी पत्रकाव्दारे जनजागृती करण्याच्या सूचना डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

00000        


जिल्ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

जिल्ह्यात कलम 37 (1) व (3) लागू

 

           अमरावती, दि. 13 :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून जिल्ह्यातील ग्रामीण भागात दि. 17 डिसेंबर 2023 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमांचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी आदेशाव्दारे कळविले आहे. 

                                                                          00000

सोमवार, ११ डिसेंबर, २०२३

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या ‘छोटु’ गॅस सिलेंडरचा वर्धापनदिन साजरा

 

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या

‘छोटु’ गॅस सिलेंडरचा वर्धापनदिन साजरा

अमरावती, दि. 11 : इंडियन ऑईल कार्पोरेशनने गॅसच्या क्षेत्रात ग्राहकांच्या सोईसाठी बाजारात आणलेल्या ‘छोटु’ या 5 किलोग्रॅमच्या गॅस सिलिंडरला दोन वर्षे झाल्याच्या निमित्ताने अमरावती बस स्थानक परिसरात वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

गॅस सिलेंडरच्या क्षेत्रात इंडियन ऑईल कार्पोरेशनने दोन वर्षापूर्वी ग्राहकांसाठी हा ‘छोटु’ गॅस सिलेंडर बाजारात आणला आहे. वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम घेऊन अमरावती येथे ग्राहकांना या विषयी माहिती देवून जनजागृती करण्यात आली.

इन्डेनचे विभागीय विक्री अधिकारी श्री आकाश आमले यांनी माहिती दिली. ते पुढे म्हणाले की, गॅस सिलिंडर खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांना अनेक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. गॅस एजन्सीला आयडी प्रूफ आणि बरीच कागदपत्रे द्यावी लागतात परंतु आता एलपीजी सिलिंडर मिळणे सोपे झाले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. ज्याअंतर्गत तुम्हाला फक्त एका कॉलवर घरी 5 किलो एलपीजी सिलिंडर सहज मिळू शकेल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. 5 किलोचे हे सिलिंडर बुकिंग केल्यानंतर अवघ्या 2 तासात तुमच्या घरी येईल. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऍड्रेस प्रूफ देण्याची आवश्यता लागणार नाही. 5 किलोचे हे गॅस सिलिंडर ग्राहक पुन्हा भरून घेऊ शकतात  यासाठी इंडियन गॅसच्या कोणत्याही विक्री केंद्रावर संपर्क करू शकता.

यावेळी बसस्थानक परिसरातील चालक-वाहक व प्रवाशी उपस्थित होते. नागपूरला जाणाऱ्या विद्यार्थीनीच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आदिशक्ती गॅसचे व्यवस्थापक मधूकर रायेवार, शुभम भिंगारे यादव गॅस एजन्सीचे अखिलेश यादव व नितेश गॅसचे मालक सौ. परतानी, देशमुख गॅस एजन्सीचे व्यवस्थापक बबलू भैय्या बासुंदे व इतर वितरक उपस्थित होते.

0000

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता साध्यतेसाठी गावपातळीवरील विशेष मोहिम

 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत संपृक्तता

साध्यतेसाठी गावपातळीवरील विशेष मोहिम

अमरावती, दि. 11 :  शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) रु. दोन हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतीवर्षी रू. सहा हजार लाभ अदा करण्यात येत आहे. लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई केवायसी केलेले शेतकरी कुटुंब पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. या योजनेचा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.

राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीनुसार (RoR नुसार) जमिनीचा तपशील अद्ययावत न केलेल्या, बँकखाती आधार संलग्न व ई-केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांचा योजनेच्या लाभासाठी समावेश करण्यास अद्यापही वाव असल्याने केंद्र शासनाने दिनांक 6 डिसेंबर, 2023 ते 15 जानेवारी, 2024 या कालावधीत गावपातळीवर 45 दिवसांची विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने  कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आयुक्त यांनी महसूल, ग्रामविकास व कृषी या विभागांनी सर्व समन्वयाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना पी. एम. किसान योजनेत समाविष्ट करण्यासाठी या विशेष मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या मोहिमेमध्ये लाभार्थींची स्वयं नोंदणी व eKYC साठी राज्यातील सर्व सामाईक सुविधा केंद्र (CSC) तर आधार संलग्न बँक खाती उघडण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांनाही सहभागी करण्यात आले आहे.

या विशेष मोहिमेमध्ये ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लाभार्थींची योजनेतील सद्यस्थिती (status) तपासणे व eKYC करणे, पोर्टलवर नोंदणी करतांना जमीनीचा तपशिल भरणे, फेस ऑथेंटिकेशन ॲपचा वापर करून eKYC करणे यासाठी शेतकऱ्यांना मदत करतील. तसेच लाभार्थींची बँक खाती आधार संलग्न केली असल्याची खातरजमा करतील. तसेच गावातील योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थीचा शोध घेऊन योजनेच्या निकषांनुसार तपासणी अंती पात्र असलेल्या लाभार्थींना पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करण्यात येईल. तसेच विशेष मोहिमे अंतर्गत योजनेच्या लाभासाठी समाविष्ट करावयाच्या पात्र लाभार्थींसाठी विशेष ग्रामसभेंचे आयोजनही करण्यात येईल.

पी. एम. किसान योजनेचा 16 वा हप्त्याचा लाभ येत्या जानेवारी महिन्याच्या शेवटी वितरीत करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे. योजनेसाठी नोंदणी करणे, ई-केवायसी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे या बाबींची पूर्तता शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची आहे. यास्तव पी. एम. किसान योजनेच्या या 45 दिवसांच्या मोहिमेमध्ये योजनेच्या निकषांच्या अधिन राहून पी. एम. किसान योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून घेण्याचे आवाहन राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक,मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असेही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.  

00000

प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

 विभागीय लोकशाही दिनात 19 प्रकरणांवर सुनावणी

प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा

                      -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 11 : नागरिकांकडून प्राप्त तक्रार अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात यावा. तसेच केलेल्या कार्यवाहीबाबत संबंधित तक्रारदारांना पत्राव्दारे कळविण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी संबंधित विभागांना आज येथे दिले.

विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ‍लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे कामकाज पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. लोकशाही दिनात एकूण 19 प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी तक्रारदारांचे म्हणने ऐकुण घेतले. तसेच प्रकरणांच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागप्रमुखांना दिल्या.   

उपायुक्त संजय पवार, कृषी सहआयुक्त किसन मुळे, सहायक आयुक्त वैशाली पाथरे यांच्यासह महसूल, पोलीस, कृषी, महापालिका, सहकार, महिला व बालविकास, समाजकल्याण व ऊर्जा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000


शनिवार, ९ डिसेंबर, २०२३

महिलांच्या सक्षम नेतृत्वातूनच विकसित भारत घडेल -राज्यपाल रमेश बैस

 

महिलांच्या सक्षम नेतृत्वातूनच विकसित भारत घडेल

                                                           -राज्यपाल रमेश बैस

 

अमरावती, दि. 9 : गेल्या काही वर्षांत सर्व क्षेत्रातील महिला प्रयत्नपूर्वक अडथळे दूर करून अग्रेसर होत आहेत. याच सक्षम महिलांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत घडणार असून आज सन्मानित झालेल्या महिला आगामी काळात बदलाचे प्रतीक मानल्या जातील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनव्दारा आयोजित ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ सोहळ्यात राज्यातील पाच कर्तृत्वान महिलांचा राज्यपाल यांच्या हस्ते ‘अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.

राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, प्रसिद्ध गायिका वैशाली माडे, उद्योजिका स्नेहल लोंढे, बेसबॉल खेळाडू रेश्मा पुणेकर, प्रगतीशिल महिला शेतकरी ज्योती देशमुख आदींचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज 'अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. घोंगडी, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रविण पोटे, महिला आयोगाच्या सदस्या इंदूबाई शिंदे, राजमाता अहिल्या देवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे, श्रीमती सुरेखा ठाकरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभाराच्या काळापासून भारताने महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात मोठे बदल पाहिले आहेत. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे, वीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा द्रष्ट्यांना जन्म देण्याचे भाग्य महाराष्ट्राला लाभले, ज्यांनी महिला सक्षमीकरणाचा भक्कम पाया रचला. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. अहिल्यादेवींनी भारतातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आणि विविध ठिकाणी मंदिरे बांधलीत. लोकांच्या सुविधेसाठी रस्ते, घाट, विहिरी आणि पायऱ्या बांधल्यात. काशी विश्वनाथमध्ये शिवलिंगाची स्थापना केली. भुकेल्यांसाठी भोजन सत्र व तहानलेल्यांसाठी आसन व्यवस्था सुध्दा त्यांनी केली. चार धाममधील पवित्र बद्रीधामचाही त्यांनी जीर्णोद्धार केला. अडीचशे वर्षांपूर्वी त्यांनी महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कायदा करून विधवा स्त्रियांना पतीच्या मालमत्तेत वाटा मिळण्याची तरतूद केली. ज्या महिलांनी कुठल्याही अडचणींना न जुमानता स्वत:चे एक स्थान निर्माण केले आणि उत्कृष्ट कार्य केले, अशा महिलांना अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब असल्याचेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.

            भारतातील स्थानिक स्वायत्त संस्थांमध्ये 50 टक्के महिला सदस्य असताना, भारताच्या संसदेने अलीकडेच महिला आरक्षण विधेयक लागू केले आहे जे कायदे आणि निर्णयप्रक्रियेत महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्याचे वचन देते. यावर्षीच्या भारतीय नागरी सेवा परीक्षेत 10 टॉपर्सपैकी सहा महिला आहेत. प्रशासनात तसेच वरिष्ठ पोलीस पदांवर पूर्वीपेक्षा जास्त महिला आहेत. येत्या 10 वर्षात महाराष्ट्रातील अनेक पोलीस ठाण्यांचा कारभार महिलांकडे राहील, असेही राज्यपालांनी सांगितले.

समाजातील सर्व मुली आणि मुलांसाठी आनंदी आणि सुरक्षित बालपण सुनिश्चित करण्यासाठी खूप कार्य करावे लागणार असून स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, हुंडाबळी, महिलांवरील गुन्हे यासारख्या सामाजिक दुष्कृत्ये अस्तित्वात आहेत ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सुरक्षित राष्ट्राची ओळख तेथील महिला सुरक्षेच्या कार्यातून केली जाते, असेही राज्यपाल म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्तृत्वान महिलांचा पुरस्कार देवून सत्कार करण्याच्या फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला. आपल्या भाषणात ते म्हणाले, कर्तृत्व दाखविण्याची संधी प्रत्येकाला मिळते. परंतू त्या संधीचे सोने करण्याची गरज असते. विविध क्षेत्रातल्या महिलांनी संधीचे सोने केल्याचे आज या पुरस्कार सोहळ्यात दिसून येत आहे. अनेक वर्षापासून अशा महिलांना पुरस्कार देवून गौरवल्यामुळे त्याद्वारे समाजातील इतर महिलांना प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.  

 महिलांच्या आरक्षणासाठी केंद्र सरकारने पाऊलं उचलले असल्याचे सांगून श्री. पवार म्हणाले की, शासन महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योजना राबवित असते. त्याचा लाभ तळागळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याची मुख्य जबाबदारी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी करीत असतात. सर्वांच्या सहयोगातून आपण यापुढेही काम करीत राहू असेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

यावेळी कार्यक्रमात सन्मानार्थी पाचही महिलांच्या संघर्षाची व कार्यकर्तृत्वाची चित्रफीत दाखविण्यात आली. कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल, गायिका वैशाली माडे यांनी आपले विचार मांडले. प्रारंभी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले.  माजी खासदार डॉ. विकास महात्मे व संतोष महात्मे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भुमिका विशद केली.

0000











शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

रब्बी हंगाम 2023 करिता अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना

 

रब्बी हंगाम 2023 करिता

अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यांतर्गत पिकस्पर्धा योजना

शेतकऱ्यांनी पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळला भेट द्या

अमरावती, दि. 8 :  राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये           शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील      शेतक-यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परीसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेऊन राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. त्यात विभागातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.

वंचित/दुर्लक्षित तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादन तंत्रज्ञानात वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेऊन तसेच जास्तीत जास्त शेतकरी पिक स्पर्धांमध्ये सहभागी होतील या दृष्टीकोनातून शासन निर्णयानुसार रब्बी हंगाम २०२३ पासून पिकस्पर्धा तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या ५ पिकांसाठी पिकस्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस एकूण पाच रब्बी पिकांचा पिकस्पर्धेत समावेश आहे.

स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे, याप्रमाणे पात्रतेचे निकष राहतील.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८-अ चा उतारा,  जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास), पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आदी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस  या पीकांसाठी अर्ज दाखल करण्याची अंतीम तारीख ३१ डिसेंबर, २०२३ आहे.  तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावर स्पर्धेअंतर्गत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे विजेते निवडण्यात येतील. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी तीनशे रुपये तर आदिवासी गटासाठी १५० रुपये स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क आहे.

 तालुका पातळीवर पहिले बक्षीस पाच हजार रुपये , दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये राहिल. जिल्हापातळीवर पहिले, दुसरे व तीसरे बक्षीस अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजार राहील. तसेच राज्यपातळीवर पहिले, दुसरे व तीसरे बक्षीस अनुक्रमे ५० हजार, ४० हजार व 30 हजार रुपये राहील.

दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतक-यांनी पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. पिकस्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी शेतकरी बंधुभगिनींनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, असे आवाहन कृषि संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

०००००

रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे उद्भभलेल्या समस्यावर अपात्कालीन पिक नियोजन कार्यशाळा

 रब्बी हंगामामध्ये अवकाळी पावसामुळे उद्भभलेल्या

समस्यावर अपात्कालीन पिक नियोजन कार्यशाळा

अमरावती, दि. 8 :  अवकाळी पावसामुळे संत्रा पिकावर उद्भवलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विभागीय कृषि सहसंचालक अमरावती विभाग अमरावती (कृषि विभाग) व डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ डिसेंबर २०२३ रोजी "संत्रा पिक व्यवस्थापन' या विषयावर वेबीनार आयोजीत करण्यात आला. या वेबीनारमध्ये विभागीय कृषि सहसंचालक श्री. के. एस. मुळे, यांनी मार्गदर्शन केले. वेबीनारमध्ये कृषि विद्यापिठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेंद्र वानखडे यांनी अवकाळी पावसामुळे संत्रा पिकावर उदभवलेल्या समस्यांवर, नुकसानग्रस्त बागांची कशी काळजी घ्यावी व विकसित अवस्थेतील मृग बहाराचे कशाप्रकारे व्यवस्थापन करावे, याबाबत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

आंबिया बहरासाठी ताणावर सोडलेल्या बागांचा ताण, अवकाळी पावसाने तुटतो. तरी बागा ताणात राहण्यासाठी क्लोरमेक्वाट क्लोराइड (५० टक्के प्रवाही) २ मिलि प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करणाबाबत तसेच ज्या बागांनी मुळातच ताण घेतला नव्हता, अशा बागेकरिता क्लोरमेक्वाट क्लोराइड (५० टक्के प्रवाही) ४ मिलि प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करणे आवश्यक असल्याचे डॉ. वानखडे यांनी या वेळी सांगितले. अवकाळी पावसामुळे संत्रा पिकांच्या जखमा भरून निघणे, झाडांना संतुलित अन्नपुरवठा होण्यासाठी अतिरीक्त पाण्याचा निचरा करणे, फांद्या कमी करून छाटणी करणे, झाडांची मुळे उघडी पडली असल्यास मातीची भर देणे, तसेच वाफ्यामध्ये सायमोक्सिनील (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त घटक) किंवा मेटॅलॅक्झिल (८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६४ टक्के डब्ल्यूपी) (संयुक्त घटक) या बुरशीनाशकांची २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण (८ ते १० लिटर प्रति झाड) या प्रमाणात टाकणे आवश्यक असल्याचे सांगतिले. तसेच मृग बहारातील फळांची वाढ होणे किंवा फळगळ थांबविणे करीता एनएए १ ग्रॅम किंवा २,४-डी १.५ ग्रॅम किंवा जिबरेलिक अॅसिड १.५ ग्रॅम यापैकी कोणत्याही एका संजीवकासह ६ बीए १ ग्रॅम अधिक १३:००:४५ हे १ किलो अधिक प्रोपीकोनॅझोल (२५ टक्के प्रवाही) १०० मिलि १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे व सततच्या ढगाळ वातावरणामुळे आंबिया बहर व मृग बहरातील फळांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण झाडावर कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० डब्लूपी) 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणेबाबत सुध्दा डॉ. वानखडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच संत्रा पिकाचे अनुषंगाने, संत्रा बागेचे खत व्यवस्थापन, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मार्गदर्शन करून, उद्भवलेल्या समस्यां, अडचणी व शंकांचे निराकरण करण्यात आले.

या वेबीनार मध्ये विभागातील क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी तसेच संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

0000

गुरुवार, ७ डिसेंबर, २०२३

विभागीय आयुक्तालयात 11 डिसेंबरला विभागीय लोकशाही दिन

 विभागीय आयुक्तालयात 11 डिसेंबरला विभागीय लोकशाही दिन

 

अमरावती, दि. 06 :  विभागीय लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या दुस-या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार येत्या सोमवारी (11 डिसेंबर) सकाळी 11 वाजता विभागीय लोकशाही दिन व महिला लोकशाही दिनाचे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय लोकशाही दिनासाठी यापूर्वी प्राप्त तक्रारींचे निराकरण करण्यात येईल. विभागीय लोकशाही दिनात तक्रार नोंदविण्यासाठी नागरिकांनी तसेच महिलांनी त्यांचे तक्रार अर्ज (तालुका, जिल्हा किंवा महापालिका लोकशाही दिनामध्ये सादर केल्यानंतर) विहित नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतीत पाठविणे आवश्यक राहील. नागरिकांनी तक्रार अर्ज dcgamravati@gmail.com किंवा dcg_amravati@rediffmail.com या ई-मेलवर विहित नमुन्यात पाठविण्याचे आवाहन आयुक्तालयाच्यावतीने करण्यात आले आहे.  

0000