मंगळवार, १६ जून, २०२६



 विभागात अवैध दारू विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

590 गुन्हे दाखल, 66 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारु निर्मिती, विक्री व वाहतुकी संदर्भात संपर्क साधण्याचे आवाहन

अमरावती दि. १६ :  पुणे जिल्ह्यात घडलेल्या मिथेनॉल मिश्रित विषारी दारू सेवन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अमरावती विभागात हातभट्टी दारू निर्मिती, वाहतूक आणि विक्री विरोधात धडक मोहीम राबवली आहे. विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख आणि सह आयुक्त प्रसाद सुर्वे यांच्या निर्देशानुसार ही विशेष मोहीम राबवण्यात आली. अमरावती विभागाचे उप आयुक्त डॉ. पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांचे अधीक्षक आणि विभागीय भरारी पथकाने २९ मे ते १४ जून या कालावधीत ही कारवाई केली. या मोहिमे दरम्यान संपूर्ण विभागात एकूण ५९० गुन्हे नोंदवून ५४४ आरोपींना अटक करण्यात आली असून ६६ लाख ३६ हजार ११५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती विभागी उप आयुक्त डॉ. पराग नवलकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

या मोहिमेत प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात  सर्वाधिक १७९ गुन्हे नोंदवून १७३ आरोपींना अटक करण्यात आली; तसेच १५६ वारस गुन्ह्यांची नोंद करत १८८.६४ ब.लि. देशी दारू, ४,०५९.०६ ब.लि. हातभट्टी दारू आणि २१,८१५ ब.लि. रसायन जप्त करण्यात आले असून ६ वाहनांसह एकूण १६ लाख ९३ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अकोला जिल्ह्यात ८३ गुन्हे नोंदवून ८५ आरोपींना अटक करण्यात आली, ज्यात ३९७.७० ब.लि. देशी दारू, ३४० ब.लि. हातभट्टी दारू, ४,३२४ ब.लि. रसायन आणि ३ वाहनांसह ६ लाख २४ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यवतमाळ जिल्ह्यात  १२८ गुन्हे नोंदवून ११२ आरोपींना अटक करण्यात आली; तसेच १४३.९९ ब.लि. देशी दारू, १,३२७ ब.लि. हातभट्टी दारू आणि ३२,२६० ब.लि. रसायनासह १५ लाख ६ हजार २९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुलढाणा जिल्ह्यात ११० गुन्हे नोंदवून १०८ आरोपींना गजाआड करण्यात आले, तसेच ३०६.६७ ब.लि. देशी दारू, ३,७८८ ब.लि. हातभट्टी दारू, २५,०७२ ब.लि. रसायन आणि १ वाहनासह १४ लाख ६८ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाशिम जिल्ह्यात ५१ गुन्हे नोंदवून ४२ आरोपींना अटक करण्यात आली, ज्यात ६३.८८ ब.लि. देशी दारू, १,३२७ ब.लि. हातभट्टी दारू, १७,०३० ब.लि. रसायन आणि १ वाहनासह ७ लाख ९१ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय, विभागीय भरारी पथकाने (वि.भ.प.) ३९ गुन्हे नोंदवून २४ आरोपींना अटक केली आणि ९६.०२ ब.लि. देशी दारू, ३०७ ब.लि. हातभट्टी दारू, १०,१८५ ब.लि. रसायन व १ वाहनासह ५ लाख ५१ हजार २२५ रुपयांच्या मुद्देमालावर कारवाई केली. या संपूर्ण मोहिमेत पाचही जिल्हे आणि भरारी पथक मिळून एकूण १,१९६.९ ब.लि. देशी दारू, १०,३६१.०६ ब.लि. हातभट्टी दारू, १,१०,६८६ ब.लि. रसायन आणि १२ वाहने जप्त करण्यात आली आहेत.   

या विशेष मोहिमेत विभागीय उपायुक्त डॉ. पराग नवलकर यांनी स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून कारवाईत सहभाग घेतला. ३१ मे आणि १ जून रोजी अमरावतीचे अधीक्षक शशिकांत गर्जे, विभागीय भरारी पथकाचा स्टाफ आणि कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मिळून मोठी कारवाई केली. तसेच ५ जून रोजी यवतमाळचे अधीक्षक नितेश शेंडे यांच्यासोबतही विशेष मोहीम राबवण्यात आली. या संपूर्ण मोहिमेत अमरावतीचे अधीक्षक शशिकांत गर्जे, अकोल्याच्या अधीक्षक श्रीमती सीमा झावरे, यवतमाळचे अधीक्षक नितेश शेंडे आणि बुलढाण्याचे अधीक्षक चारुदत्त हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व जवान कर्मचाऱ्यांनी चोख कामगिरी बजावली.

अवैध मद्यविक्री करणारी हॉटेल्स, ढाबे, किंवा अवैध मद्य निर्मिती आणि वाहतुकीबाबत नागरिकांना काहीही माहिती असल्यास त्यांनी ती तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी यासंबंधीची माहिती देण्यासाठी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ किंवा  excisesuvidha.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर तत्काळ संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.  

 

चौकट ( विभागीय उप आयुक्त डॉ. पराग नवलकर यांचे कोट )

-----------------------------------------------------------------------------------------------------

अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यांमध्ये हातभट्टी गावठी दारूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २९ मे ते १४ जून या कालावधीत राबविललेल्या विशेष मोहिमेत ५९० गुन्हे दाखल करण्यात आले असून ६६ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही विभागात कोणत्याही अवैध धंद्यांना थारा दिला जाणार नाही आणि अशा कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल. दारु निर्मिती, विक्री व वाहतुकी संदर्भात माहिती असल्यास तत्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संपर्क साधावा.                             

                                                                         - विभागीय उप आयुक्त डॉ. पराग नवलकर

-----------------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा