मंगळवार, २३ जून, २०२६

 'अमृत मानस मित्र' मोफत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी

 २९ जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

          अमरावती, दि. २३ :  विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'अमृत' (AMRUT) च्या वतीने "अमृत मानसमित्र" समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे. या अभिनव उपक्रमासाठी 'महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था' (MIMH), पुणे ही तांत्रिक व शैक्षणिक भागीदार म्हणून कार्यरत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची तरतूद असून, कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी पात्र उमेदवारांना २९ जून २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अशी माहिती अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.  

          या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना पुणे येथे १५ दिवसांचे मोफत ऑफलाइन प्रशिक्षण दिले जाईल. या अभ्यासक्रमात मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये, Active Listening, संकट व्यवस्थापन आणि मानस सामाजिक सहाय्य यांसारख्या विषयांवर प्रत्यक्ष कार्यक्षम समुपदेशक विकसित करण्यावर भर दिला जाईल. १५ दिवसांच्या ऑफलाइन सत्रानंतर उमेदवारांना जिल्हा पातळीवरील शाळा किंवा महाविद्यालयाशी जोडून १ महिन्याचे प्रॅक्टिकल फिल्ड एक्सपोजर दिले जाईल. त्यानंतर पुढील ३ ते ५ महिने उमेदवारांना प्रत्यक्ष व्यवसायासाठी MIMH चे मॉनिटरिंग, मेंटरिंग, नियमित ऑनलाइन सत्र आणि व्यावसायिक सहाय्य पुरवले जाईल. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना 'अमृत' व 'MIMH' यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल, ज्यामुळे त्यांना मानसिक आरोग्य क्षेत्रात तसेच सामाजिक संस्थांमध्ये रोजगार व करिअरच्या विविध सुवर्णसंधी उपलब्ध होतील.

          या प्रशिक्षणासाठी एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) ही पदव्युत्तर पदवी असलेले उमेदवार पात्र आहेत. या क्षेत्रात पूर्वीपासून अनुभवी असलेल्या उमेदवारांना निवडीत प्राधान्य दिले जाईल. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असले, तरी उमेदवारांना निवास, भोजन व राहण्याची व्यवस्था स्वतःच्या खर्चाने करावी लागेल. इच्छुक उमेदवारांनी https://mahaamrut.org.in/ या संकेतस्थळावर सर्व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांची छाननी करून, ओरिएंटेशन सत्र आणि आवश्यक परीक्षा किंवा मुलाखत घेऊन 'प्रथम येईल त्यास प्राधान्य' या तत्त्वानुसार उमेदवारांची नावे निश्चित केली जातील. मानसिक आरोग्य क्षेत्रात अर्थपूर्ण करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन MIMH पुणे येथील तज्ज्ञ डॉ. कापसे यांनी केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा