'मातोश्री' शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू;
गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती दि. १२ :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागामार्फत यवतमाळ येथील गोदणी रोड, आकाशवाणीजवळ चालविल्या जाणाऱ्या 'मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह' येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी अधिकृत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या वसतिगृहात एकूण ६० विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि सामाजिक आरक्षणानुसार प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती गृहप्रमुख राजू सोनारघरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या एकूण प्रवेश क्षमतेमध्ये उच्च माध्यमिक विभागासाठी १२ जागा, कनिष्ठ महाविद्यालयीन विभागासाठी १८ जागा, महाविद्यालयीन विभागासाठी १८ जागा आणि तंत्रशिक्षण विभागासाठी १२ जागांची विभागणी करण्यात आली आहे.
या वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील वार्षिक उत्पन्न रुपये १,००,०००/- (एक लाख रुपये) च्या आत असणे बंधनकारक आहे. या योजनेची सर्वात महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे वसतिगृहात निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना राहण्याची आणि जेवणाची संपूर्ण मोफत सोय शासनातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शहरात राहून उच्च शिक्षण घेणे अधिक सुलभ होणार आहे.
प्रवेशासाठीचे अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत विनामूल्य उपलब्ध आहेत. इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांकरिता अर्ज करण्याची मुदत २५ जून ते १३ जुलै पर्यंत असेल, तर प्रथम वर्ष ते पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांकरिता १४ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत अर्ज सादर करता येतील. विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यालय किंवा महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित झाल्यापासून १० दिवसांच्या आत वसतिगृहाचा प्रवेश अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू आणि पात्र विद्यार्थ्यांनी या शासकीय सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गृहप्रमुख राजू सोनारघरे यांनी केले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा