राज्याची स्वच्छ ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेच्या वापरात राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. #अणुऊर्जा हा सक्षम आणि महत्त्वाचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. राज्याची ऊर्जेची गरज पूर्ण करताना ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीमुळे अणुऊर्जेच्या निर्मिती क्षमतेत मोठी वाढ शक्य होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
• टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड समवेत दोन महत्त्वाचे सामंजस्य करार
• ४२०० मेगावॅट क्षमतेचे अणुऊर्जा प्रकल्प, ७९ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
• प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ११ हजार ७०० रोजगार निर्मिती
केंद्र सरकारने ‘शांती’ कायद्याला मान्यता दिल्यानंतर अणुऊर्जा क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुले झाले असून, महाराष्ट्रात या क्षेत्रात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सौर व पवन ऊर्जेसोबतच अखंडित वीजपुरवठ्यासाठी अणुऊर्जा हा प्रभावी आणि स्वच्छ पर्याय असल्याचे त्यांनी नमूद केले. अणुऊर्जा क्षेत्रात राज्याने केंद्र सरकार व खासगी कंपन्यांसोबत तीन करार केले असून, अमेरिकेतील प्रमुख अणुऊर्जा कंपन्यांनीही महाराष्ट्रात गुंतवणुकीची उत्सुकता दर्शविली आहे.
टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडसोबत झालेल्या दोन करारांमुळे राज्याच्या अणुऊर्जा निर्मिती क्षमतेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे - बोर्डीकर, आमदार अभिमन्यू पवार, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महापारेषणचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार तसेच महाजनकोचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राधाकृष्णन बी., तसेच समीर मेहता, टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेडचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा