#अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू विशेष काळजी कक्षात (SNCU) २४ ऑगस्ट २०२६ रोजी लागलेल्या आगीत तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशी अहवाल शासनास सादर झाल्यानंतर अहवालाच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश #सार्वजनिकआरोग्य विभागाने दिले आहेत. या दुर्घटनेत ३६ बालकांना तातडीने अन्य रुग्णालयांमध्ये सुरक्षित हलविण्यात आले होते.
पर्यवेक्षीय नियंत्रणातील त्रुटींसाठी प्रथमदर्शनी जबाबदार ठरविण्यात आलेले उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला परिमंडळ; रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय अमरावती; अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती; प्रशासकीय अधिकारी आणि वीजतंत्री, स्त्री रुग्णालय अमरावती यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
चौकशी समितीच्या अहवालात मेसर्स/ एओव्ही इंटरनॅशनल एलएलपी ही कंपनी दोषी आढळल्याने तिला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच शिलार कंपनीच्या सेवांमध्येही प्रथमदर्शनी दोष आढळून आल्याने फॉरेन्सिक अहवाल तातडीने प्राप्त करून संबंधित कंपनीलाही काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी शासनाने राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपाययोजनांना अधिक बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. एसएनसीयु आणि एनआयसीयुमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे, तसेच सर्व रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षा मॉक ड्रील अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अग्निसुरक्षा, विद्युत सुरक्षा आणि वैद्यकीय उपकरणांची देखभाल याबाबत मानक कार्यपद्धती (SOP) काटेकोरपणे लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा