शुक्रवार, ४ मार्च, २०२२

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी व आठवीत प्रवेशासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

 

राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या

इयत्ता पाचवी व आठवीत प्रवेशासाठी 31 मार्च पर्यंत मुदतवाढ

अमरावती दि.04 (विमाका):- महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नाव नोंदणी प्रवेश अर्ज दिनांक 1 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी या कालावधी निश्चित करण्यात आल होता. सदर कालावधी संपुष्टात आला आहे. परंतु या ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

 विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी अर्ज दिनांक 1 मार्च  ते 31 मार्च 2022 पर्यंत सादर करता येतील. विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमुद केलेल्या संपर्क केंद्र दि. 2 मार्च  ते दि. 4 एप्रिल 2022 पर्यत शाळेमध्ये जमा करावे. संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मुळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात दि. 7 एप्रिल पर्यंत जमा करावी.

मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in संकेतस्थळाचा वापर करावा, असे  अमरावती विभागीय मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी कळविले आहे.  

0000000

इयत्ता अकरावी व बारावीकरीता सुधारीत विषय योजना व मुल्यमापन योजना

 

इयत्ता अकरावी व बारावीकरीता

सुधारीत विषय योजना व मुल्यमापन योजना

अमरावती दि.4 (विमाका) : कनिष्ठ महाविद्यालयातील विविध घटकांच्या मागणी नुसार विज्ञान शाखेसाठी ग्रुप सी मधुन वगळण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र विषयांस प्रविष्ठ विद्यार्थ्यांना सन 2022 च्या बारावीच्या परिक्षेस संधी देण्याबाबत व ग्रुप बी व ग्रुप सी मधून घ्यावयाच्या वैकल्पिक विषयांच्या संख्येच्या मर्यादांच्या फेरविचार करण्यात आला असुन त्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत.

विषययोजनेत कला शाखेसाठी शिक्षणशास्त्र हा विषय ग्रुप सी मध्येच समाविष्ट असेल. कला व वाणिज्य शाखांसाठी आठ विषयांची निवड करताना ग्रुप ए मधील चार विषय पूर्वीप्रमाणे अनिवार्य असतील. उर्वरित चार वैकल्पिक विषयांची निवड करताना ग्रुप बी मधून किमान दोन विषय निवडावे लागतील आणि उर्वरित दोन विषयांसाठी ग्रुप बी मधून शून्य, एक किंवा दोन आणि ग्रुप सी मधून शून्य, एक किंवा दोन या मर्यादेत ग्रुप बी आणि सी मधून एकूण दोन विषयांची निवड करता येईल.

विज्ञान शाखेसाठी

विज्ञान शाखेसाठी शिक्षणशास्त्र हा विषय ग्रुप सी मधून वगळण्यात आलेला आहे. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वीच्या विषय योजनेनुसार विषयांची निवड केलेली आहे त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून विज्ञान शाखेसाठी ग्रुप सी मधून वगळण्यात आलेल्या शिक्षणशास्त्र विषयास प्रविष्ट विद्यार्थ्यांना सन 2020 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस बसण्याची एकमेव संधी देण्यात येत आहे. तथापि परीक्षेमध्ये शिक्षणशास्त्र विषयात विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्यांना पूर्वीच्या विषययोजनेनुसार तोच विषय घऊन परीक्षेस प्रविष्ट होता येईल.

शैक्षणिक वर्ष सन 2021-22 पासून इयत्ता 11 वी व शैक्षणिक वर्ष सन 2022-23 पासून इयत्ता बारावीसाठी अशी सवलत देय असणार नाही. असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

000000

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

 

बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

अमरावती दि.4 (विमाका): राज्य शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता  बारावीची  परीक्षा दि. 4 मार्च ते 30 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानुसार या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले असून उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेले आहे. परीक्षेच्या या वेळापत्रकात अंशत बदल करण्यात आला असल्याचे राज्य मंडळाकडून कळविण्यात आले आहे.

बारावीच्या सर्वसाधारण व द्विलक्षी  (General & Biofocal) आणि व्यावसायिक (M.C.V.C) परीक्षा दि. 5 मार्च व दि. 7 मार्च  रोजी आयोजित करण्यात आली होती. परंतु अपरिहार्य तांत्रिक कारणास्तव या विषयांच्या परीक्षा नियोजित तारखांऐवजी अनुक्रमे दि. 5 एप्रिल व  दि. 7 एप्रिल 2022 रोजी घेण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षा व अन्य परीक्षेच्या उर्वरित वेळापत्रकात इतर कोणताही बदल नाही. त्याचप्रमाणे इयत्ता दहावीच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेळापत्रकातील अंशत: बदलाची सर्व संबंधीत उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक व अन्य संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000000

 

गुरुवार, ३ मार्च, २०२२

इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

 

इयत्ता बारावी व इयत्ता दहावीच्या

विद्यार्थ्यांसाठी राज्यमंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

अमरावती दि.3 (विमाका):  इयत्ता बारावीची मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षा दिनांक 4 मार्च ते 7 मार्च 2022 व दहावी लेखी परीक्षा दि. 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीन पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळामार्फत आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याकरीता राज्यमंडळ स्तरावरून समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

१) ८४३२५९२३५८ २) ७२४९००५२६० ३) ७३८७४००९७० ४) ९३०७५६७३३० ५) ८९७५४७८२४७

६) ७८२२०९४२६१ ७) ९५७९1५९१०६ ८) ९९२३०४२२६८ 9)  ७४९८११९१५६ १०)८९५६९६६१५२

वरीलप्रमाणे भ्रमणध्वनी क्रमांक दिलेले समुपदेशक परीक्षा कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८  या कालावधीत विद्यार्थ्यांना भ्रमणध्वनीव्दारे निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. मात्र विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबधित प्रश्न इत्यादींबाबत समुपदेशकांना विचारणा करू नये असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000000

चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याबाबत

 

चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या

विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याबाबत

अमरावती दि.03 (विमाका) : इयत्ता दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या व लोककला प्रकारामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त गुण देण्याबाबतची सुधारित कार्यपध्दती विहित करण्यात आलेली आहे. यानुसार विद्यार्थ्यांनर एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेचे गुण मिळणार नाही, असे कळविण्यात आले आहे.

कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सन २०२१-२२ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना सन २०२०-२1 या वर्षी एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेला बसता आले नाही, अशा विद्यार्थ्यांनी सन २०२१-२२ मध्ये केवळ इंटरमिजीएट डॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे, त्यांना सन २०21-22 या वर्षापुरते सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात येत आहे असे कळविण्यात आले आहे. हा निर्णय फक्त सन २०21-22 या शैक्षणिक वर्षापुरताच लागू राहील. असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

0000000


बुधवार, २ मार्च, २०२२

शहरात स्वच्छतेची कामे नियोजनपूर्वक व सातत्याने राबवा, राज्‍यमंत्री बच्‍चूभाऊ कडू यांनी घेतला महापालीका कामांचा आढावा

 

                  शहरात स्वच्छतेची कामे नियोजनपूर्वक व सातत्याने राबवा

राज्‍यमंत्री बच्‍चूभाऊ कडू यांनी घेतला महापालीका कामांचा आढावा

अमरावती, दि. 2 (विमाका) :  शहरात सार्वजनिक स्‍थळे व परिसराची स्वच्छता प्राधान्याने करण्यात यावी. कचरामुक्त परिसराचे महत्त्व पटवुन देण्यासाठी जनजागृती करण्यात यावी. शासकीय रुग्णालये व सार्वजनिक परिसर पुर्णपणे कचरामुक्‍त करावा. संपुर्ण शहरात खुल्या जागेत जंतुनाशक फवारणी करण्यात यावी. स्‍वच्‍छतेसंदर्भात जबाबदार सेवांचे आवश्‍यक सर्व संपर्क क्रमांक नागरिकांपर्यंत पोहचविण्‍याची व्‍यवस्‍था करावी. स्वच्छतेबाबतचा नियोजनबध्‍द आराखडा तयार करावा. सफाई कामगारांना आवश्यक ती साधने उपलब्‍ध करुन देण्‍यात यावी असे निर्देश राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

महानगरपालिकेतील सभागृहात आज विविध विषयाचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रवीण आष्‍टीकर, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पात्र लाभार्थ्यांना  तात्काळ घरकुल देण्यात यावे

        या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेचा आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थ्‍यांच्या प्रस्तावावर तात्‍काळ कार्यवाही करुन त्यांना घरकुलाचा लाभ देण्‍याबाबत श्री. कडू यांनी संबंधितांना निर्देश दिले.

                दिव्यांगांचे बचत गट तयार करण्यात यावे

दिव्‍यांगांचे सर्वेक्षण करुन त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात यावी. दिव्‍यांगाच्या मानधनात आवश्यक ती वाढ करण्यात यावी. दिव्यांग व्यक्तींच्या माध्यमातुन तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांची सहजरित्या विक्री व्हावी व त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी दिव्‍यांगांचे बचत गट तयार करण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले. सुरक्षा रक्षकाचे देयक नियमितपणे अदा करण्‍यात यावे. महिला बाल कल्‍याण विभागाच्‍यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवून त्याबाबत गरजू महिलांनी सहभागी होण्याबाबत  ‍जनजागृती करण्‍यात यावी असे श्री. कडू यांनी यावेळी सांगितले.

        महानगरपालिका क्षेत्रात आरोग्‍य व्‍यवस्‍था सुदृढ करावी. महानगरपालिकेचे  अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज असलेले रुग्णालय निर्मिती करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. गणू लेआऊट मधील हॉकर्स झोन बाबत स्‍थानिकांशी चर्चा करुनच निर्णय घ्‍यावा, असे निर्देश श्री. कडू यांनी संबंधितांना यावेळी दिले.

00000

 

       

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी त्वरीत करावी - पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर

 








पाणीटंचाई निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची

 अंमलबजावणी त्वरीत करावी

-         पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर

Ø  पाणी टंचाई आढावा बैठकीत दिले निर्देश    

अमरावती दि.28: येत्या काही दिवसात उन्हाळ्याची तीव्रता झपाट्याने वाढेल अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागू नये यासाठी प्रशासनाने पाणी टंचाई  निवारण्याच्या प्रभावी उपाययोजनांची त्वरीत अंमलबजावणी करावी असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले. मोर्शी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात मोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या 33 गावांच्या पाणी टंचाई निवारणार्थ घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ता ढोमणे, अनिल उनराखे, मोर्शी पंचायत समिती सभापती विना बोबडे, उपसभापती सोनाली नवले, सदस्य रुपाली पुड, जया कळसकर, माया वानखेडे, सुनिल कडु, भाऊ छापाने, शंकर उईके, मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी रविंद्र पवार, आदी उपस्थित होते.

एप्रिल-मे महिन्यात पाणी टंचाई उद्भवण्याची शक्यता असलेल्या

     गावात उपाय योजना सुरु कराव्या

लेहगाव, वाघोली, सावरखेड, शिरखेड, आखतवाडा, बेलापुर, अडगाव, पातुर, शिरुर, शिरलस, राजुरवाडी, निपाणी, तळेगाव, कवठा, भांबोरा, तुळजापुर, मंगरूळ, बोरगव्हाण व धामणगाव याठिकाणी पाण्याची समस्या नसल्याबाबतची माहिती संबंधित गावाच्या सरपंचांनी दिली. परंतु तीव्र उन्ह्याळयात संभाव्य पाणी टंचाईची समस्या नाकारता येत नाही. या गावांमध्ये त्यावर उपाययोजना करण्यात याव्या. लेहगाव येथे हातपंपाची दुरुस्ती, सावरखेड व शिरखेड येथे नवीन टाकीसाठी प्रस्ताव, अडगाव व तळेगाव येथे पाईपलाईनचे काम, शिरलस येथे येत्या एप्रिल-मे महिन्यात विहिरी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया, धामणगाव येथे हातपंपसाठी प्रस्ताव सादर करण्यात यावे असे निर्देश श्रीमती ठाकुर यांनी संबंधीतांना दिले. गोराळा, विष्णोरा, शिरलस, कमळापुर येथे येत्या काळात विहिरी अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया पुर्ण करावी.

                  टंचाईग्रस्त गावात तातडीने सुविधा निर्माण कराव्या

मोर्शी तालुक्यातील टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाईबाबतचे प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावे. गोराळा, काटपुर, पुसदा, घोडगव्हाण, काटसुर, नया वाठोडा, लिहीदा, रोहनखेड, विचोरी, शिरजगाव, अडगाव, नेरपिंगळाई येथे तीव्र पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नळ दुरुस्ती, गावातील विहिरींची दुरुस्ती, गाळ काढणे, यासारख्या विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. असे निर्देश श्रीमती ठाकुर यांनी दिले. शिरजगाव  येथील  अंतर्गत पाईप जोडणीचे काम, रोहणखेड येथे बोअर करण्यात यावे. नेरपिंगळाई, पुसदा येथिल टंचाई बाबतचे प्रस्ताव प्राधान्याने पुर्ण करण्याच्या सुचना श्रीमती ठाकुर यांनी केल्या.

 

जलजीवन मिशन अंतर्गत जास्तीत जास्त कामे पूर्ण करावी

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी टंचाई वर जास्तीत जास्त उपाययोजना करता येणे शक्य आहे. सर्व ग्रामपंचायतींनी टंचाईबाबतच्या प्रस्तावित कामाबाबत ठराव तात्काळ मंजूर करून प्रशासनास सादर करावा. आवश्यकता असेल त्या गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी साठवण्याच्या नवीन टाकीची निर्मिती, जुन्या पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात यावे. अशा सूचना श्रीमती ठाकूर यांनी  संबंधिताना दिल्या.

0000000

 

 

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

राज्यमंत्र्याकडून स्वत: झाडू हाती धरुन गावात स्वच्छता संत गाडगेबाबांनी शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया - राज्यमंत्री बच्चू कडू

 




राज्यमंत्र्याकडून स्वत: झाडू हाती धरुन गावात स्वच्छता

संत गाडगेबाबांनी शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया

-         राज्यमंत्री बच्चू कडू

Ø नागरवाडी येथे भक्त निवासाचे राज्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

       अमरावती, दि. 24 : संत गाडगेबाबा यांना समाजाला मानवतेच्या मुल्यांची शिकवण दिली. तळागाळातील सर्वांपर्यत त्यांनी किर्तनाच्या माध्यमातुन ज्ञानदान केले. लोकांशी संवाद साधुन त्यांनी समाजात स्वच्छता, आरोग्य, अंधश्रद्धा, शिक्षण, मुर्तिपुजा याबाबत जनजागृती करण्याची किमया साधली. माणसांमध्ये देव पाहणाऱ्या गाडगेबाबांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी व स्फुर्तिदायी आहे. गाडगेबाबांच्या कार्याचा आदर्श आपण डोळयासमोर ठेवुन शिकवलेली जीवनमुल्ये आत्मसात करुया असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगीतले.

                     5 कोटी निधीतुन श्रीक्षेत्र नागरवाडी विविध कामे

गाडगे बाबा जयंती महोत्सव चांदुर बाजार येथील नागरवाडी येथे साजरा करण्यात आला. नागरवाडीतील भक्तनिवासचे भूमिपूजन (दि.23) राज्यमंत्री श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. तिर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेअंतर्गत अंदाजे पाच कोटी रुपयांच्या निधीतुन निर्माण करण्यात येणाऱ्या भक्तनिवासमुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. येथे भक्तनिवासाच्या इमारतीची निर्मिती व नागरी सुविधांसोबतच येथील परिसराचे सौंदर्यीकरण व बळकटीकरण करण्यात येणार आहे. गोशाळा, सभागृहाची निर्मितीसह आदी प्रस्तावीत कामे देखील नागरवाडी येथे करण्यात येणार आहे.

   नागरी सुविधांच्या निर्मितीमुळे विकासप्रक्रिया गतीमान होत असते. त्यामुळे नागरी सुविधांची कामे प्राधान्याने व तातडीने पूर्ण करण्यात येतील असे श्री कडू यांनी यावेळी सांगितले. तहसिलदार धीरज स्थूल, मंगेश देशमुख, गाडगेबाबा मिशनचे संचालक, सदस्य व नागरिक उपस्थित होते.

निसर्ग पर्यटनातून रोजगाराची संधी

निसर्ग पर्यटनाच्या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी दडलेल्या आहेत. आपल्या परिसरातील नैसर्गिक बाबींनी समृद्ध पर्यटन क्षेत्राची देखभाल करणे आपले कर्तव्य आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेअंतर्गत पर्यटन स्थळ विकसीत करण्यात येत आहेत त्यामुळे या क्षेत्रात अनेक रोजगार उपलब्ध होण्यास वाव आहे. निसर्ग पर्यटन विकास योजनेअंतर्गत चांदुर बाजार येथिल नागरवाडी पर्यटन केंद्र विकसीत करण्यात येत आहे. या पर्यटन केंद्रात 82 लक्ष रुपयांच्या प्राप्त निधीतुन चेनलिंक फेन्सिंग (साखळी कुंपण) करण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन श्री कडू यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पंचायत समिती सदस्य वनमाला गणेशकर, मंगेश देशमुख यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

राज्यमंत्र्यांनी केली गावात स्वच्छता

        संत गाडगेमहाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री श्री कडू यांनी तालुका अचलपूर व चांदुर बाजार येथे स्वच्छता अभियान राबविले. राज्यमंत्र्यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविले. श्री कडू यांनी स्वत: सर्व परिसर स्वच्छ केला.

चौक, पुतळे, सार्वजनिक जागा आदी ठिकाणे स्वच्छता कायम राहिली पाहीजे. संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश लक्षात घेऊन अचलपूर, परतवाडा, चांदुर बाजार येथे फवारणी, आवश्यक रंगरगोटी, झुडूपे व कचरा हटवणे आदी स्वच्छता राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेची सवय प्रत्येकाने आपल्या अंगी बाणवून घ्यायला हवी असा संदेश श्री कडू यांनी यावेळी सर्वांना दिला. यावेळी संदीपकुमार अपार अधिकारी उपस्थित होते.

000000

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

संत गाडगेबाबा यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

 

संत गाडगेबाबा यांना

विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

अमरावती, दि. 23 : थोर संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात आज अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी विभागीय आयुक्त पियुषसिंह यांनी व कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

000000


मंगळवार, २२ फेब्रुवारी, २०२२

शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त तंत्रज्ञान विकसीत करावे - राज्यमंत्री बच्चू कडू

 

                               शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी

उपयुक्त तंत्रज्ञान विकसीत करावे

                                                                  - राज्यमंत्री बच्चू कडू

 








अमरावती दि 22: शेतकरी व मजुर बांधवाच्या हितासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन कामगार व शालेय शिक्षण मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले. अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनला ( दि.18) त्यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे प्राचार्य डॉ. विजय मानकर, सहसंचालक एम. पी. वाडेकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, सहा. संचालक (तांत्रिक) एम.एम. अंधारे, पी. एम. भुयार, विभाग प्रमुख व अधिव्याख्याता उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री. कडू म्हणाले, शिक्षित व तंत्रकुशल वर्गाने आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील समाजासाठी करावा. शेतकरी, मजुर बांधवाच्या हिताचे संशोधन व उपक्रम वेळोवेळी राबवावे. संस्थेद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री. कडू यांनी यावेळी केले.

यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील शैक्षणिक बाबींचा आढावा घेतला असता श्री. कडू यांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या वेळापत्रक व परीक्षा पद्धतीची माहीती घेतली. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका त्यांना वेळेत उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधितांना सुचना केल्या. गरजु विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधांचा लाभ द्यावा. विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक बाबींमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधितांना सुचना केल्या.

सुत्रसंचालन स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे डॉ. नरेद्र सिनकर यांनी केले. आभार उपयोजित यंत्रशास्त्र विषयाचे विभागप्रमुख प्रशांत उत्तरवार यांनी मानले. विविध विषयाचे अधिव्याख्याता व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.

 

                                           00000000000