शुक्रवार, ३१ ऑगस्ट, २०१८




राष्ट्रीयकृत बँकांनी तातडीने पिककर्ज वाटप करावे
-         किशोर तिवारी
Ø तुरीचे पैसे एका आठवड्यात मिळणार
Ø शेतकरी उत्पादन संघाला प्रोत्साहन
Ø विषबाधासंबंधी दक्षता बाळगावी
अमरावती, दि. 31 : खरीपाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाली आहेत. मात्र विभागात पिककर्ज वाटपाची टक्केवारी अत्यंत कमी आहे. पिककर्ज वाटपात राष्ट्रीयकृत बँकांची जबाबदारी मोठी आहे. त्यामुळे येत्या सात दिवसांत नवीन शेतकऱ्यांना कर्ज देणे, पिककर्ज मेळावे घेऊन पिककर्ज किमान 50 टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी बँकांनी तातडीने पिककर्ज वाटप करण्याच्या सुचना कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केल्या.
आज विभागीय आयुक्त कार्यालयात शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी, वाशिमचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, वर्धाचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पुरवठा उपायुक्त रमेश मावस्कर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे रजत बॅनर्जी आदी उपस्थित होते.
        श्री. तिवारी म्हणाले, विभागात वाशिम आणि यवतमाळ जिल्हा वगळता पिककर्ज वाटपाची स्थिती समाधानकारक नाही. राज्य शासनाने कर्जमाफीसाठी दिलेल्या रक्कमेएवढेही पिककर्ज वाटप झालेले नाही. खरीपाचा हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. शेतकऱ्यांना आजही शेतीकामासाठी पैशांची आवश्यकता आहे. मात्र बँकांनी पिककर्ज वाटप करण्याकडे गांभिर्याने पाहिलेले नाही. शेतकऱ्यांना दिड लाख रूपयांची कर्जमाफी दिली आहे. मात्र एवढी रक्कम मिळूनही बँकांनी कर्जवाटपासाठी प्रयत्न केलेले नाही. यामुळे असंख्य पात्र शेतकरी पिककर्जापासून वंचित आहेत. येत्या सात दिवसांत बँकांनी कर्जवाटप करण्यासाठी शाखानिहाय प्रयत्न करून कर्जवाटपाची टक्केवारी किमान 50 टक्क्यांपर्यंत घेऊन जावी.
        राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हा बँकांपेक्षा अधिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे जिल्हा बँकांचे कर्ज नसल्याचे प्रमाणपत्र घेऊन राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. कर्जवाटप करताना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्तही देण्यास अडचण नसावी. बँकांनी कर्ज दिल्यास शेतकरी सावकाराकडून कर्ज घेण्यापासून परावृत्त होऊ शकतो. त्यामुळे बँकांनी शेतकरी कर्जवाटपासाठी सकारात्मक धोरण राबवावे.
        शेतपिकांवर अवलंबून राहून शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही. त्यासाठी जोडधंदा आणि शेतीपिकांवर प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी उत्पादन संघांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. कृषी विभागाने जिल्ह्यात कोणत्या प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देऊ शकतो, हे विचारात घेऊन उत्पादक संघांचे प्रस्ताव मान्य करावे. त्यांना बँकांनी कर्ज द्यावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत असून शासनाने या कर्जाची हमी घेण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील. त्यासोबतच कुक्कुटपालन, दुग्ध आणि मत्स्य व्यवसायासाठी शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्री. तिवारी यांनी केले.
        यासोबतच वंचित आदिवासी आणि शेतकऱ्यांना अन्न धान्याचा पुरवठा व्हावा, आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदभरती, जीवनदायी आरोग्य योजनेत रूग्णालयांचे संलग्नीकरण, शेतीपंपांना वीज जोडणी, सिंचन प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांचे पुनर्वसन आदींबाबत आढावा घेतला.
तुरीचे पैसे एका आठवड्यात मिळणार
        शासनाने तुरीच्या खरेदीमध्ये हस्तक्षेप करून हमी भावाने खरेदी केली होती. या खरेदीचे पैसे जिल्हास्तरावर मिळालेले आहे. येत्या आठवड्यात अनुदान आणि तुरीच्या खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना मिळतील. शेतकऱ्यांची पडताळणी होऊन हे पैसे तातडीने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्टेट बँकेचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार
        राज्‍य शासनाने दिड लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी केली आहे. मात्र स्टेट बँकेने तडजोडीनुसार शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे, अशी माहिती स्टेट बँकेचे रजत बॅनर्जी यांनी दिली. याबाबत शेतकऱ्यांसाठी ही सुखद बाब आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफ होण्यासाठी शाखास्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा श्री. तिवारी यांनी व्यक्त केली.
000000


बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८


माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी

 डिआयएव्ही पोर्टल कार्यान्वित

·        माजी सैनिक, शहीद कुटुंबीयांचा मिलन सोहळा

अमरावती, दि. 29 : भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच सैनिकी कल्याण योजनांची माहिती देण्यासाठी वेटरन्स आऊटरिच उपक्रमातंर्गत डिआयएव्ही पोर्टलचा शुभांरभ करण्यात आला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती पुलगाव स्टेशनचे स्पेशल ऑफीसर इसीएचएस, कर्नल एस.पी. वर्मा यांनी अमरावती येथे दिली.
वेटरन्स आऊटरिच उपक्रमातंर्गत माजी सैनिक, शहीद कुटुबीयांच्या मिलन शिबिराचे आयोजन मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करण्यात आले होते. कार्यक्रमाला पुलगाव स्टेशन मुख्यालयाचे ब्रिगेडिअर गोल्डस्मिथ, कर्नल एस. पी. वर्मा, लेफ्टनंट कर्नल संजीव कुमार, कर्नल राजेंद्र सिंह, कर्नल बलबीरसिंग, कॅप्टन अरविंद चांडक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे, निवृत्त कर्नल विश्वास काळे व निवृत्त कर्नल लक्ष्मण गादे उपस्थित होते.
पोर्टल संदर्भात माहिती देतांना कर्नल वर्मा म्हणाले की, माजी सैनिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी भारतीय सैन्यातर्फे वेटरन्स ऑऊटरिच उपक्रमातंर्गत डिआयएव्ही (Directorate Iandian Armed forces Veterans) पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर राज्यातील सर्व माजी सैनिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सदर पोर्टलवर माजी सैनिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविधि योजनांचा लाभ कसा घ्यावा तसेच वैद्यकीय सुविधेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पोर्टलच्या माध्यमातून कुठलीही तक्रार किंवा कॅन्टीन, ईसीएचएसच्या संदर्भात काही नवीन सुधारणा सुचवायचे असेल तर पोर्टलवर नोंद करता येईल. दुर्गम व ग्रामीण भागातील माजी सैनिकांच्या समस्या एकाच ठिकाणी जाणून घेणे व त्यांची सोडवणूक करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोजित शिबिरात माजी सैनिकांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यात आले. यावेळी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी पुलगाव सैनिक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. शौर्यपदक प्राप्त वीरांचा शासकीय नियमाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात यावे, अशी मागणीही माजी सैनिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. माजी सैनिकांसाठी आयोजित या अनोख्या उपक्रमामुळे माजी सैनिकांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य निर्माण झाले होते.
कार्यक्रमास बहादूर माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व्ही. एस. राय, सचिव प्रदिप गायकवाड, विनायक इंगळे, श्रीकृष्ण सोनोने, जी. बी. चव्हाण, गजानन इंगळे, धर्मराज बोरकर, गजानन मेश्राम, उत्तम डोंगरे, दर्यापूरकर, सरदार, कॅप्टन महादेव सिरसाट, रमेश इंगळे, सुभेदार भातकुले, गजानन पवार माजी सैनिक, सैनिक महिला मंडळाच्या रुबिया गोवारे आदी माजी सैनिक व विरनारी विर विधवा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता इसीएचएस गाण, राष्ट्रगीताने झाली.


इयत्ता 10 वी 12 वी विद्यार्थ्यांच्या
नाव नोंदणीस 10 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि. 29 : इयत्त्या दहावी व बारावीच्या शैक्षणिकवर्ष मार्च 2019 च्या परीक्षेस खाजगीरित्या प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्याचा कालावधी दिनांक 30 जुलै 2018 ते दिनांक 25 ऑगस्ट 2018 पर्यंत निश्चित करण्यात आला होता. परंतू या नाव नोंदणी अर्जास मुदतवाढ देण्यात येत असून त्याचा कालावधी 10 सप्टेंबर पर्यंत करण्यात आला आहे.
दि.27 ऑगस्ट 2018 ते 11 सप्टेंबर 2018 विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये जमा करावे. दिनांक 15 सप्टेंबर 2018 संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे जमा करावे.
वाढीव तारखांबाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंद घेवून तशा सूचना आपल्या स्तरावरुन शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांना देण्यात द्याव्या. तसेच कोणताही पात्र विद्यार्थी यापासून वंचित राहणार याची दक्षता घ्यावी. असे विभागीय सचिव अमरावती विभागीय मंडळ, अमरावती यांनी कळविले आहे.

मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८


ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान
अभियानातंर्गत निवडलेल्या गावांची कामे प्राधान्याने पूर्ण करा
                                                  -जिल्हाधिकारी अभिजित बांगर
  
अमरावती, दि. 29 : ग्रामीण भागात मूलभूत सोयी-सुविधांच्या उपलब्धतेसह आर्थिक, सामाजिक, शाश्वत विकासासह गावे सक्षम बनविणे हे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी अभियानातंर्गत गावांमध्ये विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी शासकीय यंत्रणा, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक व ग्रामस्थांनी अभियानातंर्गत निवडलेल्या गावांची कामे समन्वयातून प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत निवडलेल्या गावांमधील कामांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, सहा जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहूल कर्डीले, जिल्हा पुनवर्सन अधिकारी श्री. काळे यांचेसह बँकेचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले, ग्रामीण भागामध्ये मूलभूत सुविधांचे निर्मितीसह गावांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी तेथील ग्रामस्थांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, शेती पुरक व्यवसाय आदींच्या माध्यमातून सक्षम बनविणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे. संबंधित यंत्रणांनी ग्राम परिवर्तन अभियानातंर्गत प्राप्त झालेला निधीचा गावांतील नितांत आवश्यक असलेल्या कामे पूर्ण करण्यासाठी खर्च करावा. ज्या विकास कामांतून निरंतर फायदा मिळू शकतो तसेच ग्रामस्थांना कायमस्वरुपाचा व्यवसाय, रोजगार मिळत असेल अशी कामे प्राधान्याने करावीत. गावातील प्रत्येक विकास काम करतांना प्रथमत: ग्रामसभेची मंजूरात घ्यावी.
तिवसा, धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, अचलपूर या तालुक्यातील निवड झालेल्या गावांमध्ये नियुक्त केलेल्या ग्राम परिवर्तकांनी गावातील प्रत्येक कुंटुंबाला प्रत्यक्षपणे भेटी देऊन त्यांना योजनांची माहिती द्यावी. त्यांचेकडून कागदपत्रे गोळा करुन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. घरामागील अंगनात कुक्कुटपालन एक चांगला व्यवसाय आहे. यासाठी केम व वन विभागाच्या योजनातून लाभ देऊन किमान 100 कोंबडी पक्ष्यांचे लाभार्थ्यास वितरण करावे. या पक्ष्याच्या अंडीच्या विक्रीतून रोजगार मिळेल तसेच अंगणवाड्यांना पुरवठा केल्याने लहान मुलांना पोषण आहार सुध्दा प्राप्त होईल. व्हीएसटीएफ अंतर्गत मिळालेल्या निधीचा पहिला हफ्ता सप्टेंबर अखेर पर्यंत खर्च होईल यादृ्ष्टीने कामांचे नियोजन करावे. डिसेंबर 2018 अखेर पर्यंत मंजूर आराखडयानुसार गावातील सर्व कामे पूर्णत्वास जाईल यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कशोसीने प्रयत्न करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या.
            मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री म्हणाल्या की, जिल्हयातील अभियानातंर्गत निवडलेल्या गावांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी ग्राम परिवर्तकाची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येक ग्राम परिवर्तकाने गावातील कुटुंबांना भेटी देऊन योजनाच्या लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे.  अभियानातंर्गत येणारी नियोजित कामे, अडचणी व निधी संदर्भात केम प्रकल्पाचे समन्वयक, जि.प. अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांनी समन्वयातून कामे पूर्ण करावीत.
बैठकीला ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत निवडलेल्या तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्राम परिवर्तक, केम प्रकल्प, कृषी, पशुसंवर्धन आदी  विभागांचे अधिकारी व समन्वयक प्रामुख्याने उपस्थित होते.


अमरावती प्री आयएसएस टेनिंग सेंटरची
प्रवेश प्रक्रिया आरंभ
Ø  14 आक्टोंबर रोजी सीईटी परीक्षा
Ø  www.preiasamt.in संकेतस्थळ उपलब्ध

अमरावती, दि. 27 : महाराष्ट्र शासनाच्या उच्च  व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश परीक्षेची ऑनलाईन प्रक्रिया सुरु झाली आहे.
या केद्रातील प्रशिक्षणाकरीता प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा (सीईटी) देणे आवश्यक आहे. परीक्षेचा अर्ज येत्या 26 सप्टेंबर, 2018 पर्यत विद्यार्थ्याना www.preiasamt.in या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे.
या परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार 60 व अनुसूचित जाती बार्टीद्वारे 10 अशा एकूण 70 विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या प्रचलित आरक्षणानुसार प्रवेश देण्यात येईल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या परीक्षेसाठी पात्रताधारक कोणत्याही पदवीधारकास ही प्रवेश परीक्षा देता येईल. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरल्यानंतर 14 ऑक्टोंबर 2018 रोजी अमरावती येथील केंद्रावर सीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.सदर परीक्षेचा निकाल www.preiasamt.in संकेतस्थळावर प्रसिध्द केल्या जाईल. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची युपीएससी-2019 च्या पुर्व परीक्षेची तयारी प्रशिक्षण कालावधीत करुन घेण्यात येणार आहे. प्रशिक्षणाची ही सुविधा पुर्णत: विनामुल्य असून प्रशिक्षण कालावधीत उपस्थितीच्या निकषावर प्रती महिना दोन हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रवेशित 70 विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी युपीएससीची पुर्व परीक्षा पास होतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी तयारीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मुख्य परीक्षेत पास होणाऱ्यांची मुलाखतीची तयारी देखील करुन घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर माहितीसाठी 0721-2530214 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा अथवा www.preiasamt.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
प्री.आय.ए.एस. ट्रेनिंग सेंटरमुळे भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल होणाऱ्या अधिकाऱ्यांचा टक्का महाराष्ट्रात निश्चितच वाढणार आहे. अमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पुर्व प्रशिक्षण केंद्र हे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या परीसरातील जीवशास्त्र विभागाच्या जुन्या ईमारतीत आहे. या केंद्रात सुसज्ज ग्रंथालय सुविधा, अद्यावत संगणक कक्ष, अभ्यासिका, वायफाय सुविधा, मुलां-मुलींकरीता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या वसतीगृहात राहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
आतापर्यंत या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये स्वप्नील वानखडे-भारतीय राजस्व सेवा (IRS) व त्यांनतर भारतीय प्रशासकीय सेवा (LAS), हर्षल भोयर-भारतीय राजस्व सेवा (IRS) व त्यांनतर भारतीय प्रशायकीय सेवा (LAS),योगेश उंडे-भारतीय पोलीस सेवा (IPS), वैशाली धांडे-भारतीय राजस्व सेवा (IRS), चैतन्य्‍ मेडशिकर-भारतीय राजस्व सेवा (IRS),पुनम ठाकरे-भारतीय राजस्व सेवा (IRS), अनिल खडसे- भारतीय राजस्व सेवा (IRS) तसेच इतरही अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग तसेच इतर तत्सम स्पर्धा परीक्षेमध्ये नेत्रदिपक यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे केंद्र संचालक डॉ. मुरलीधर वाडेकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८


धारगड  यात्रकेरुंसाठी सूचना जाहिर

अमरावती, दि. 24 : येत्या दि. 26 व 27 ऑगस्ट 2018 रोजी मेळघाटातील अति संरक्षित जंगलस्थित धारगड यात्रेचा शुभारंभ होत आहे. धारगड मंदिर हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अति संरक्षित गाभा क्षेत्रात असल्याने यात्रेस येणाऱ्या भावीकांनी पुढीलप्रमाणे सुचनांचे पालन करुन मेळघाट व्याघ्र प्रकल्प प्रशासनास सहकार्य करण्याचे सूचित केले आहे.
यात्रे दरम्यान कोणतेही वाद्य ( ढोल, ताशे, डफडे इत्यादी) तसेच लाऊड स्पिकर वापरास बंदी आहे. तंबाखु, गुटखा, बिडी मद्य इत्यादी नशेचे पदार्थ व शस्त्र वापरण्यास व सोबत नेण्यास बंदी राहील, आढळल्यास जप्ती येईल व प्रचलीत नियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल. वाहनाद्वारे खटकाली तपासणी नाक्याकडून दिनांक 26 ऑगस्ट, 2018 रोजी सकाळी 8.00 वाजेपासुन ते 27 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यत भाविकांना प्रवेश दिला जाईल. दि. 27 ऑगस्ट 2018 सायंकाळी 6.00 वाजेपर्यत खटकाली नाका येथून बाहेर निघणे भावीकांना आवश्यक राहील. दि. 26 ऑगस्ट 2018 व 27 ऑगस्ट 2018 व्यतिरिक्त इतर दिवशी धारगड मंदीरात प्रवेश प्रतिबंधीत आहे.
 धारगड टि-पॉइट येथे पार्कीगची व्यवस्था करण्यात येईल. पार्कीगसाठी दुचाकी वाहनाकरीता रु. 10 व चारचाकी वाहनाकरीता रु. 50 प्रत्येकी वसुल करण्यात येईल. वसुल करण्यात आलेली रक्कम ही धारगड समिती (VED) यांचे खात्यात जमा करण्यात येईल. सुलई नाला पर्यटकांसाठी दिनांक 26 व 27 ऑगस्ट 2018 रोजी बंद राहील. धारगड यात्रेमध्ये भाविकांनी प्लास्टिक बॅग तसेच प्लास्टिकचे कुठल्याही साहित्याचा वापर करु नये. धारगड मंदिरावरुन नरनाळा किल्लाकडे जान्याचा मार्ग 26 ऑगस्ट 2018 रोजी रात्री 10.00 ते दि. 27 ऑगस्ट 2018 चे सकाळी 6.00 वाजेपर्यंत खुले राहील. धारगड मंदिराच्या परिसर सोडून इतर 50 मिटर चे भागात प्रवेश बंदी राहील व त्याकरिता वन्यजीव अधिनियम 1972 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
भाविकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी यात्रा काळात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुदीचे पालन करावे वन्यजीवास व त्यांच्या अधिवास क्षेत्राला कोणत्याही प्रकारची हानी पोहचु नये ही विनंती जेणेकरुन सर्व भवीकांची यात्रा सुखदपणे पार पडेल, असे आवाहन उपवनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प आकोट वन्यजीव विभाग यांनी  केले आहे.
00000


शिक्षकांचे पॅनल फार्म आता ऑनलाईन लिंक वर


शिक्षकांचे पॅनल फार्म आता ऑनलाईन लिंक वर
Ø sscboardamravati.in या संकेतस्थळ https://goo.gl/forms/oVQenzQaSPV5aWtT2

अमरावती, दि. 24 : माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. 12 वी) विषयनिहाय शिक्षकांची माहिती ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत असून त्याकरीता अमरावती विभागीय मंडळाचे कक्षेतील सर्व मान्यताप्राप्त शाळा/कनिष्ठ महाविद्यालयात ई.9 ते 12 वी पर्यंत शिकविणाऱ्या सर्व विषय शिक्षकांचे पॅनल तयार करण्याचे अनुषंगाने माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याकरीता मंडळाचे संकेतस्थळ Sscboardamravati.in वर माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून सदर पत्रात दर्शविलेली लिंक https://goo.gl/forms/oVQenzQaSPV5aWtT2 उघडण्यात आलेली आहे सदर लिंकमध्ये शिक्षकांच्या माहिती प्रपत्र उपलब्ध असून ई. 8 वी ते ई. 12 वी पर्यंत शिकविणाऱ्या सर्व प्रकारच्या शिक्षकांची विषयनिहाय माहिती भरण्यात यावी. आवश्यक माहिती शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी भरुन ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे पाठवावयाची आहे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालय/शाळेचे प्राचार्य/मुख्याध्यापक यांनी, त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय/शाळेतील सर्व शिक्षकांची माहीती योग्यरितीने ऑनलाईन सादर केल्याचे प्रमाणपत्र द्यावयाचे असून प्रमाणपत्र अमरावती विभागीय मंडळाचा ई. मेल divsecamt@rediffmail.com दिनांक 30 ऑगस्ट, 2018 पर्यंत पाठवावी.
सदर परिप्त्रकाची नोंद घेवून सर्व कनिष्ठ महाविद्यालय/शाळेच्या प्रमुखांनी मंडळाकडे त्वरीत माहिती सादर करावी, असे अनिल पारधी, विभागीय सचिव, अमरावती विभागीय मंडळ यांनी कळविले आहे.
0000000




अर्जित ज्ञानाचा उपयोग राष्ट्र विकासासाठी करा
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ


अमरावती, दि. 24 : अभियांत्रिकी क्षेत्रामुळे ज्याने देशाच्या सर्वांगीण विकासाला एक नवा आयाम मिळू शकतो. अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाच्या माध्यमातून देश सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून उच्चांक गाठू शकतो. हे ध्येय समोर ठेवून अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्र विकासासाठी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून करावा, असे उत्साहवर्धक आवाहन पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज पदवी प्रदान समारंभात केले.
विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नववा पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्रसिध्द उद्योजक तथा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, सहसंचालक डॉ. डी.व्ही. जाधव, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सपकाळ, प्राचार्य डॉ. आर. एस. दाळू, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. मो. झुहेर, कुणाल टिकले, डॉ. अनंत धात्रक, परीक्षा नियंत्रक प्रा. वसंत जपे यांचेसह महाविद्यालयाचे फॅकल्टी प्रमुख आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असतांना नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या दैनंदिन उपयोगात येणाऱ्या यंत्रसामुग्री निर्माण करावी. शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपकरणे तयार करावी. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:चे व्यक्तीमत्व ओळखून आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती स्व. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील देश निर्माण करण्यासाठी हातभार लावावा. पदवीधरांनी केवळ भक्कम पगाराच्या नोकरीचे ध्येय न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून बेरोजगारांना रोजगार मिळवून देता येईल, असा व्यवसाय उभारण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्राविण्यप्राप्त व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांनी गौरव करुन शुभेच्छा दिल्या.
श्री. चांदेकर म्हणाले की, अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगतीमुळेच देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि अभियंते हे देशाच्या विकासात पाठीच्या कण्यासारखे काम करणारे तंत्र आहे. विद्यार्थ्यांनी त्यांनी अर्जित केलेल्या पदवीचा उपयोग समाजहितासाठी कसा होईल, यावर लक्ष केंद्रीत करावे. एका राष्ट्रीय सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी फक्त 30 टक्के विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळते तर 70 टक्के विद्यार्थी हे अभियांत्रिकी क्षेत्र सोडून इतर क्षेत्राकडे वळतात. विद्यार्थ्यांनी असे न करता नवीन शाखांमध्ये संशोधन करुन आपले देशाच्या भवितव्य घडविण्यासाठी सहकार्य करावे.
श्री. जाधव म्हणाले की, सन 1770 दशकात वाफेच्या इंजीन शोधापासून अभियांत्रिकी क्षेत्रात अनेक स्थित्येंतरे आली आहेत आणि अनेक संशोधनातून अत्याधुनिक यंत्र-उपकरणांचा शोध लागला आहे. कृषी क्षेत्रात यंत्रसामुग्रीचा शोध, वीजेचा शोध व त्याचा कारखान्यांमध्ये साहित्य निर्मितीसाठी उपयोग, इंटरनेटचा शोध आदी शोध मनुष्याच्या उत्क्रांतीसाठी हितकारक ठरली आहेत. औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळाचा कमी उपयोग करुन यांत्रिकीकरणामुळे साहित्य निर्मितीमध्ये व पर्यायाने आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळून किंवा यापुढील पदवीत्तर शिक्षण घेतांना समाजोपयोगी संशोधनाला महत्व द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सुवर्ण पदकांचे मानकरी :
समारंभात प्रथमेश घोशीकर (स्थापत्य अभियांत्रिकी), हर्षल पाटील (यंत्र अभियांत्रिकी), दत्ता गाडेकर (विद्युत अभियांत्रिकी), एकता पांडे (अणुविद्युत अभि.), कस्तुरी वर्मा (संगणक विज्ञान अभि.), शुभम पटेल (माहिती तंत्रज्ञान अभि.), पूर्वा आवारे (उपकरणीकरण अभि.) या सात विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांकासाठी सुवर्ण पदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
तसेच विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण 470 बी. टेक आणि 99 एम. टेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके प्रदान करण्यात आली.
प्राचार्य डॉ. आर.एस. दाळू यांनी महाविद्यालयाची स्थापना, फॅकल्टीज, प्राध्यापक, अभ्यासक्रमाविषयी प्रास्ताविकातून माहिती दिली. शैक्षणिक अधिष्ठात डॉ. अनंत धात्रक व प्रा. शुभदा ठाकरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. समारंभाला महाविद्यालयाचे सर्व शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

00000

गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८

नगरविकास राज्यमंत्र्यांची ‘पीडीएमसी’ला भेट डेंग्यू नियंत्रणासाठी व्यापक प्रतिबंधात्मक उपाय करा -नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील



नगरविकास राज्यमंत्र्यांची ‘पीडीएमसी’ला भेट
डेंग्यू नियंत्रणासाठी व्यापक प्रतिबंधात्मक उपाय करा
                      -नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्याचे आदेश
अमरावती, दि. 23 : अमरावती शहरात व जिल्हयात डेंग्यूसदृश कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. हे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाचा उपाय ठरतो. त्यामुळे महापालिकेने या उपाययोजना व्यापकपणे राबवाव्यात, तसेच या कामांमध्ये कुचराई करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले.
नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज व रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि महापालिका अधिका-यांची बैठक घेऊन निर्देश दिले. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, पीडीएमसी कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. मनोज निचत, डॉ. समीर चौधरी, डॉ. रोहणकर, डॉ. नितीन सोनोने, मनपाच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांचेसह आरोग्य व मनपा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
            डॉ.पाटील म्हणाले की, रुग्णांची भेट घेतली असता रुग्णाला तीनचार दिवस ताप, शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे अशी लक्षणे आढळून आली आहेत. या आजारावर तातडीने उपचार केल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. याबाबत काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना संपर्क साधून त्यांच्या सल्ल्यानुसार तातडीने रक्त चाचणी करावी.
महापालिकेने फवारणी, धूरळणी, डासनिर्मूलनाचे इतर उपाय यांची अंमलबजावणी अधिक व्यापकपणे करावी. शहरातील ज्या परिसरात असे उपाय अवलंबले जाणार आहेत, त्याचे वेळापत्रक आधीच माध्यमांतून जाहीर करावे व नागरिकांनीही पालिका प्रशासनाला सहकार्य करावे. पालिकेच्या सर्व आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांनी आपापल्या क्षेत्राची पाहणी करुन व उपाययोजना करावी. या कामात कामचुकारपणा करणा-या अधिकारी- कर्मचा-यांवर जबाबदारी निश्चित करुन कडक कारवाई करावी, असेही निर्देश डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.
            या पार्श्वभूमीवर आवश्यक प्लेटलेटस्, रक्त, औषधे व इतर बाबी उपलब्ध करुन घ्याव्यात.  डेंग्यू निदानासाठी उपयुक्त असलेली एनएस-वन ही स्क्रिनिंग चाचणी व त्यानंतर इलायझा ही कन्फर्मेटिव्ह चाचणी करावी लागते. ही सुविधा यवतमाळ येथील सेंटीनल सेंटर येथे उपलब्ध आहे. आरोग्य विभागाने त्याचप्रकारच्या चाचणीच्या किट शासनाकडून मागणी करुन प्राप्त करुन घ्याव्यात. र्डेंग्यू आजारावर आवश्यक उपायासाठी व चाचणीसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल. डेंग्यू आजारावर पुर्णपणे नियंत्रणासाठी मनपा व आरोग्य विभागाने सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

00000



शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आज पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम


शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा
आज पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम
अमरावती, दि. 23 : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवव्या तुकडीचा पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ शुक्रवार, दि. २४ ऑगस्ट रोजी व्हीएमव्ही परिसरील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात होणार आहे. या समारंभात विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण ४७०  बी. टेक आणि ९९  एम. टेकच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र प्रदान करण्यात येतील.
या समारंभासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. एम. जी. चांदेकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. एच. आर. देशमुख, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित राहतील.
विद्यार्थ्यांना  सकाळी १०.३० ते दुपारी १२.४० या वेळेत मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र वितरीत केले जातील. यात प्रथमेश घोशीकर (स्थापत्य),  हर्षल पाटील (यंत्र), दत्ता गाडेकर (विद्युत), एकता पांडे (अणुविद्युत), कस्तुरी वर्मा (संगणक विज्ञान), शुभम पटेल (माहिती तंत्रज्ञान), पूर्वा आवारे (उपकरणीकरण) या सात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांकासाठी सुवर्ण पदक प्रदान करण्यात येतील.
नुकत्याच झालेल्या आऊटलूक मासिकाच्या सर्वेक्षणात अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला २०१८ या वर्षासाठी अखिल भारतीय स्तरावर ३४ वे नामांकन प्राप्त झाले आहे.
00000

आज इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल


आज इयत्ता 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल
Ø  निकाल पाहण्यासाठी www.mahresult.nic.in संकेतस्थळ
        अमरावती, दि. 23 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10) वरीक्षा दिनांक 17 जुलै, 2018 ते 04 ऑगस्ट, 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
            महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा ऑनलाईन निकाल www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर शुक्रवार दि. 24 ऑगस्ट, 2018 रोजी दुपारी 1.00 वाजता जाहीर करण्यात येत आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल.
            ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यांनतर विहित नमून्यात विहित शुल्कासह सोमवार, दि. 27 ऑगस्ट, 2018 ते बुधवार दि. 5 सप्टेंबर, 2018 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील.
            ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायाप्रत प्राप्त करावयाची आहे त्यांनी ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर विहित नमून्यात विहित शुल्कासह सोमवार दि. 27 ऑगस्ट, 2018 ते शनिवार दि. 15 सप्टेंबर, 2018 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावयाचा आहे. अर्जासोबत ऑनलाईन निकालाची प्रत/गुणपत्रिकेची छायाप्रत जोडणे अनिवार्य राहील.
            जुलै-ऑगस्ट  2018 च्या परीक्षेमधील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांना अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
            फेब्रुवारी-मार्च 2019 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयता. 12 वी) परीक्षेस ज्या विद्यार्थ्यांना प्रविष्ठ व्हावयाचे आहे अशा पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने स्विकारायची असल्याने त्याच्या तारखा स्वतंत्रपणे कळविण्यात येतील.
            परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादक सुधारण्यासाठी श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेस पुन:श्च प्रविष्ठ होण्याची संधी सन 2018 पासून लागू करण्यात आली आहे. त्यानुसार जुलै-ऑगस्ट 2018 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन देय संधी उपलब्द राहील, असे डॉ. अशोक भोसले, प्र. सचिव, राज्यमंडळ पुणे यांनी कळविले आहे.
00000

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आज पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम


शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा
आज पदवी प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम
अमरावती, दि. 23 : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवव्या तुकडीचा पदवी प्रमाणपत्र प्रदान समारंभ शनिवारी, दि. २४ ऑगस्ट रोजी व्हीएमव्ही परिसरील संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात होणार आहे. या समारंभात विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण ४७०  बी. टेक आणि ९९  एम. टेकच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र प्रदान करण्यात येतील.
या समारंभासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. एम. जी. चांदेकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव, संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ. एच. आर. देशमुख, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव आदी उपस्थित राहतील.
विद्यार्थ्यांना  सकाळी १०.३० ते दुपारी १२.४० या वेळेत मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्र वितरीत केले जातील. यात प्रथमेश घोशीकर (स्थापत्य),  हर्षल पाटील (यंत्र), दत्ता गाडेकर (विद्युत), एकता पांडे (अणुविद्युत), कस्तुरी वर्मा (संगणक विज्ञान), शुभम पटेल (माहिती तंत्रज्ञान), पूर्वा आवारे (उपकरणीकरण) या सात विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांकासाठी सुवर्ण पदक प्रदान करण्यात येतील.
नुकत्याच झालेल्या आऊटलूक मासिकाच्या सर्वेक्षणात अमरावती शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला २०१८ या वर्षासाठी अखिल भारतीय स्तरावर ३४ वे नामांकन प्राप्त झाले आहे.
0000


अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये 50 टक्के पाणीसाठा निर्माण


अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये 50 टक्के पाणीसाठा निर्माण

* मागील वर्षापेक्षा 25 टक्क्यांनी जलसाठयात वाढ
* विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये
सद्यस्थितीत 1632 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा

अमरावती, दि.21 : आठवडयाभरापासून सततधार सुरु असलेल्या पावसामुळे अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत 1632 दशलक्ष घनमीटर म्हणजे 50 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे.
            विभागातील नऊ मोठया प्रकल्पामध्ये 53 टक्के पाणीसाठा, मध्यम प्रकल्पामध्ये 59 टक्के तर लघु प्रकल्पामध्ये 40 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. मागीलवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील जलसाठयापेक्षा यावर्षी 25 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या प्रकल्पांमधून विभागातील अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जातो. यापुढेही पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा निर्माण होईल व पाण्याची टंचाई भासणार नाही.
अमरावती विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांची क्षमता 1 हजार 520 दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये 799 दलघमी (53 टक्के) जलसाठा निर्माण झाला आहे. 677 दलघमी क्षमतेच्या 24 मध्यम प्रकल्पांमध्ये 399 दलघमी  (59 टक्के), तर 1088 दलघमी क्षमतेच्या 466 लघु प्रकल्पांमध्ये 435 दलघमी (40 टक्के) पाणीसाठा निर्माण झाला आहे. सिंचनासाठी काही प्रकल्पांमधून पाणी वापरले जात असताना घट अपरिहार्य असली, तरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण ठेवले गेल्याने प्रकल्पातील पाणीसाठ्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.
विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा प्रकल्पातून अमरावती आणि इतर काही शहरांना पाणी पुरवठा केला जातो. ऋुतूतील सततधार पावसामुळे अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या 262 दलघमी (46 टक्के) पाणीसाठा निर्माण झाला आहे. अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 54 दलघमी (62 टक्के) तर वाण 59 दलघमी (72 टक्के) पाणीसाठा निर्माण झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प पूर्णपणे भरले असून प्रकल्पातून 360.79 घमीप्रसे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अरुणावती प्रकल्पात 149 दलघमी (87 टक्के), बेंबळा प्रकल्पात 169 दलघमी (56 टक्के), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात 11 दलघमी म्हणजे केवळ 15 टक्केच पाणीसाठा निर्माण झाला आहे. पेनटाकळी प्रकल्पात 6 दलघमी (9 टक्के) तर खडकपुर्णा प्रकल्पात कमी पर्जन्यमानामुळे पाणीसाठा निर्माण झाला नाही.
00000


अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांच्या
शिष्यवृत्ती प्रस्तावासाठी ई-पोर्टल कार्यान्वित
* 25 ऑगस्ट, अंतीम मुदत
*www.etribal.maharashtra.gov.in संकेतस्थळ कार्यान्वित

अमरावती, दि. 20:  प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी जि. अमरावती अंतर्गत येत असलेल्या अमरावती जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानीत, कायम विना अनुदानीत महाविद्यालयांना जाहिर सूचीत करण्यात येते की, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत सन 2012-13 ते 2017-18 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क योजनेसंबंधी प्रस्ताव/अर्ज  महाविद्यालय व विद्यार्थी पातळीवर प्रलंबित आहेत.
सदर प्रलंबित अर्जाबाबत प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी धारणी यांच्यातर्फे वेळोवेळी लेखी तसेच दूरध्वनीद्वारे तोंडी व Whats App ग्रुपद्वारे व वैयक्तिक संपर्क साधुन महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे परीपूर्ण प्रस्ताव मंजुरी करीता सादर करण्याबाबत संबंधित महाविद्यालयास कळविण्यात आले आहे. तथापी सुचना निर्गमित करुन सुध्दा धारणी प्रकल्प कार्यालयाकडे बऱ्याच महाविद्यालयाने परीपूर्ण प्रस्ताव जमा केलेले नाहीत.
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासुन शासनाने शिष्यवृत्ती करिता नविन पोर्टल तयार केलेले असुन सन 2017-18 पर्यंतची शिष्यवृत्तीचे पोर्टल दि. 31 ऑगस्ट, 2018 नंतर बंद होणार आहे. सर्व महाविद्यालयांना सुचित करण्यात येते की, सन 2012-13 ते 2017-18 पर्यंतचे शिष्यवृत्ती प्रस्ताव विद्यार्थ्यांच्या व महाविद्यालयाच्या परिपुर्ण कागदपत्रासह प्रकल्प कार्यालयाकडे सादर करण्याचे सूचना दिल्या आहेत.  तसेच www.etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन महाविद्यालयीन किंवा विद्यार्थ्यांच्या पातळीवर असलेल्या ऑनलाईन अर्जाची पुर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव दि. 25 ऑगस्ट्र, 2018 पर्यंत या कार्यालयात सादर करावे.
ज्या विद्यार्थ्यांना सन 2012-13 ते 2017-18 कालावधीतील शिष्यवृत्ती मिळालेली नाही. अशा विद्यार्थ्यांनी तात्काळ संबंधित महाविद्यालयास संपर्क साधुन परीपूर्ण प्रस्ताव महाविद्यालयांमार्फत दि. 27 ऑगस्ट, 2018 रोजी कार्यालयीन वेळेत संबंधित कार्यालयात जमा केल्याबाबतची खात्री करावी. शिष्यवृत्तीचे परिपूर्ण प्रस्ताव मुदतीत सादर झाले नाहित व त्यामुळे विद्यार्थी-विद्यार्थीनी शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क पासुन वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहिल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 07226-224803 आर. एम. नागराळे 9372747539, पी. एस. वानखडे 9405318996 याच्याशी संपर्क साधावा, असे राहुल कर्डिले (भा. प्र.से), प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. 

00000000