‘फेक न्यूज’च्या प्रतिबंधासाठी
माध्यमांसह नागरिकांनीही योगदान
द्यावे
-पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक
‘फेक न्यूज’ परिणाम व दक्षता
कार्यशाळा
अमरावती, दि. 1 : सोशल मिडियामुळे अफवा व खोट्या बातम्या प्रसृत करण्याचे
गैरप्रकार वाढले आहेत. या काळात वस्तुनिष्ठ व अचूक माहिती देण्याची जबाबदारी वृत्तपत्रे
व वाहिन्यांनी पार पाडावी तसेच अफवा व चुकीच्या माहितीला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनीही
योगदान द्यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी आज केले.
जिल्हा माहिती कार्यालय व पोलीस आयुक्तालय
येथील सायबर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयात आयोजित ‘फेक न्यूज परिणाम
व दक्षता’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत
होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, सायबर पोलीस ठाणे निरीक्षक अनिल कुरुळकर,
पोलीस उपनिरीक्षक श्री. वर्गे, जनसंज्ञापन शास्त्राचे अभ्यासक प्रशांत राठोड आदी यावेळी
उपस्थित होते.
श्री. मंडलिक म्हणाले की, समाजमाध्यमांचा
वापर करताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कुठलीही निराधार, अवास्तव, अतर्क्य माहिती
किंवा संदेश शेअर, फॉरवर्ड करु नये. समाजात
तेढ निर्माण करणारा मजकूर समाजमाध्यमांद्वारे पसरवू नये. फेक न्यूजमुळे निष्पाप नागरिकांचा
बळी जाऊ शकतो. धुळे जिल्ह्यात तशी घटना घडली आहे. प्रत्येक नागरिकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखून समाजमाध्यमांचा
वापर करावा आणि यासंदर्भात पारंपारिक माध्यमांनी अधिकाधिक जनजागृती लोकांमध्ये करावी,
असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
श्री. राठोड यांनी फेक न्यूज : परिणाम
व दक्षता याविषयी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. ते म्हणाले की, देशात शंभरहून अधिक वृत्तवाहिन्या आणि हजारो वृत्तपत्रे
आहेत. मुद्रित माध्यमांनी विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे. तथापि, सोशल मीडिया हे फेक
न्यूज पसरविण्याचे मोठे माध्यम झाले आहे. देशात
सुमारे 270 मिलीयन फेसबुकचे तर व्हाटस् ॲपचे 200 मिलीयन वापरकर्ते आहेत. इतक्या मोठ्या लोकसंख्येकडून वापरले जाणारे हे माध्यम
प्रचंड शक्तिशाली झाले आहे. त्यामुळे त्याचा विवेकाने वापर झाला पाहिजे व तशी जाणीव
जागृती झाली पाहिजे.
प्रत्येकाने
प्राप्त होणाऱ्या संदेशाची शहानिशा, तथ्यातथ्य तपासणे, माहितीचे उगमस्थान शोधणे, तसेच फसवणूक होत असल्याचे आढल्यास तात्काळ सायबर पोलीस
विभागाशी संपर्क साधणे ही काळजी घेतली पाहिजे, असेही श्री. राठोड म्हणाले.
श्री.
कुरुळकर म्हणाले की, सोशल मिडियाचा वापर करताना खासगी माहिती उघड करु नये. विशेषत:
बँक खाते क्रमांक, सीव्हीव्ही कोड, पीन कोड, ई मेल पासवर्ड आदींबाबत गोपनीयता ठेवावी.
त्याचप्रमाणे, आपले प्रोफाईल, अकाउंट हॅक होऊ नये यासाठी स्ट्राँग पासवर्ड आदी दक्षता
घ्यावी. माध्यमांप्रमाणेच नागरिकांनीही सजग
राहून फेक न्यूजला आळा घातला पाहिजे.
श्री.
वर्गे म्हणाले की, व्हॉटस्अपवरील मजकुराबाबत सतत तक्रारी प्राप्त होतात. तथापि, तपासादरम्यान
व्हॉटस्अपवरील मजकुर हा एन्क्रिप्टेड डाटा असून ते एक हॅगिंग सर्व्हर आहे. त्यामुळे
तो कंपनीकडून देण्यास नकार दिला जातो. अशावेळी तपासात अडथळे येतात. त्यामुळे व्हॉटस्अपवरील
मजकुराबाबत तक्रार करावयाची असल्यास मुळ डाटा नष्ट करु नये.
श्री.
पवार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. सहायक संचालक (माहिती)
गजानन कोटुरवार, विजय राऊत, योगेश गावंडे यांनी स्वागत केले. यावेळी पोलीस अधिकारी
– कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी तसेच श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पत्रकारिता
विभागाचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा