अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये 50 टक्के पाणीसाठा
निर्माण
* मागील वर्षापेक्षा 25 टक्क्यांनी जलसाठयात वाढ
* विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये
सद्यस्थितीत 1632 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा
अमरावती, दि.21 : आठवडयाभरापासून
सततधार सुरु असलेल्या पावसामुळे अमरावती विभागातील मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये
सद्यस्थितीत 1632 दशलक्ष घनमीटर म्हणजे 50 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे.
विभागातील
नऊ मोठया प्रकल्पामध्ये 53 टक्के पाणीसाठा, मध्यम प्रकल्पामध्ये 59 टक्के तर लघु प्रकल्पामध्ये
40 टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. मागीलवर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील जलसाठयापेक्षा
यावर्षी 25 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या प्रकल्पांमधून विभागातील अनेक शहरांना
पाणीपुरवठा केला जातो. यापुढेही पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या प्रकल्पांमध्ये
पुरेसा जलसाठा निर्माण होईल व पाण्याची टंचाई भासणार नाही.
अमरावती विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांची
क्षमता 1 हजार 520 दलघमी आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये 799 दलघमी (53 टक्के) जलसाठा
निर्माण झाला आहे. 677 दलघमी क्षमतेच्या 24 मध्यम प्रकल्पांमध्ये 399 दलघमी (59 टक्के), तर 1088 दलघमी क्षमतेच्या 466 लघु प्रकल्पांमध्ये
435 दलघमी (40 टक्के) पाणीसाठा निर्माण झाला आहे. सिंचनासाठी काही प्रकल्पांमधून पाणी
वापरले जात असताना घट अपरिहार्य असली, तरी पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण ठेवले गेल्याने
प्रकल्पातील पाणीसाठ्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल.
विभागातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा
प्रकल्पातून अमरावती आणि इतर काही शहरांना पाणी पुरवठा केला जातो. ऋुतूतील सततधार पावसामुळे
अप्पर वर्धा प्रकल्पात सध्या 262 दलघमी (46 टक्के) पाणीसाठा निर्माण झाला आहे. अकोला
जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात 54 दलघमी (62 टक्के) तर वाण 59 दलघमी (72 टक्के)
पाणीसाठा निर्माण झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्प पूर्णपणे भरले असून प्रकल्पातून
360.79 घमीप्रसे पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अरुणावती प्रकल्पात 149 दलघमी (87 टक्के),
बेंबळा प्रकल्पात 169 दलघमी (56 टक्के), बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात 11 दलघमी
म्हणजे केवळ 15 टक्केच पाणीसाठा निर्माण झाला आहे. पेनटाकळी प्रकल्पात 6 दलघमी (9 टक्के)
तर खडकपुर्णा प्रकल्पात कमी पर्जन्यमानामुळे पाणीसाठा निर्माण झाला नाही.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा