बुधवार, २९ ऑगस्ट, २०१८


माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी

 डिआयएव्ही पोर्टल कार्यान्वित

·        माजी सैनिक, शहीद कुटुंबीयांचा मिलन सोहळा

अमरावती, दि. 29 : भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच सैनिकी कल्याण योजनांची माहिती देण्यासाठी वेटरन्स आऊटरिच उपक्रमातंर्गत डिआयएव्ही पोर्टलचा शुभांरभ करण्यात आला आहे. या संदर्भात सविस्तर माहिती पुलगाव स्टेशनचे स्पेशल ऑफीसर इसीएचएस, कर्नल एस.पी. वर्मा यांनी अमरावती येथे दिली.
वेटरन्स आऊटरिच उपक्रमातंर्गत माजी सैनिक, शहीद कुटुबीयांच्या मिलन शिबिराचे आयोजन मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात करण्यात आले होते. कार्यक्रमाला पुलगाव स्टेशन मुख्यालयाचे ब्रिगेडिअर गोल्डस्मिथ, कर्नल एस. पी. वर्मा, लेफ्टनंट कर्नल संजीव कुमार, कर्नल राजेंद्र सिंह, कर्नल बलबीरसिंग, कॅप्टन अरविंद चांडक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे, निवृत्त कर्नल विश्वास काळे व निवृत्त कर्नल लक्ष्मण गादे उपस्थित होते.
पोर्टल संदर्भात माहिती देतांना कर्नल वर्मा म्हणाले की, माजी सैनिकांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी भारतीय सैन्यातर्फे वेटरन्स ऑऊटरिच उपक्रमातंर्गत डिआयएव्ही (Directorate Iandian Armed forces Veterans) पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. या पोर्टलवर राज्यातील सर्व माजी सैनिकांनी नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. सदर पोर्टलवर माजी सैनिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविधि योजनांचा लाभ कसा घ्यावा तसेच वैद्यकीय सुविधेसंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पोर्टलच्या माध्यमातून कुठलीही तक्रार किंवा कॅन्टीन, ईसीएचएसच्या संदर्भात काही नवीन सुधारणा सुचवायचे असेल तर पोर्टलवर नोंद करता येईल. दुर्गम व ग्रामीण भागातील माजी सैनिकांच्या समस्या एकाच ठिकाणी जाणून घेणे व त्यांची सोडवणूक करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोजित शिबिरात माजी सैनिकांच्या विविध अडचणींचे निराकरण करण्यात आले. यावेळी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य तपासणी पुलगाव सैनिक रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली. शौर्यपदक प्राप्त वीरांचा शासकीय नियमाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात यावे, अशी मागणीही माजी सैनिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. माजी सैनिकांसाठी आयोजित या अनोख्या उपक्रमामुळे माजी सैनिकांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य निर्माण झाले होते.
कार्यक्रमास बहादूर माजी सैनिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व्ही. एस. राय, सचिव प्रदिप गायकवाड, विनायक इंगळे, श्रीकृष्ण सोनोने, जी. बी. चव्हाण, गजानन इंगळे, धर्मराज बोरकर, गजानन मेश्राम, उत्तम डोंगरे, दर्यापूरकर, सरदार, कॅप्टन महादेव सिरसाट, रमेश इंगळे, सुभेदार भातकुले, गजानन पवार माजी सैनिक, सैनिक महिला मंडळाच्या रुबिया गोवारे आदी माजी सैनिक व विरनारी विर विधवा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता इसीएचएस गाण, राष्ट्रगीताने झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा