नगरविकास राज्यमंत्र्यांची ‘पीडीएमसी’ला
भेट
डेंग्यू नियंत्रणासाठी व्यापक प्रतिबंधात्मक
उपाय करा
-नगरविकास
राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील
कामचुकार अधिका-यांवर कारवाई करण्याचे
आदेश
अमरावती, दि. 23 : अमरावती शहरात व जिल्हयात डेंग्यूसदृश कीटकजन्य आजाराचे
रुग्ण आढळून येत आहेत. हे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाचा उपाय
ठरतो. त्यामुळे महापालिकेने या उपाययोजना व्यापकपणे राबवाव्यात, तसेच या कामांमध्ये
कुचराई करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश नगरविकास राज्यमंत्री
डॉ. रणजित पाटील यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले.
नगरविकास राज्यमंत्री डॉ. पाटील यांनी येथील डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल
कॉलेज व रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि महापालिका अधिका-यांची बैठक घेऊन निर्देश
दिले. महापालिकेचे आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, पीडीएमसी कॉलेजचे
अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. मनोज निचत, डॉ. समीर चौधरी, डॉ. रोहणकर, डॉ. नितीन
सोनोने, मनपाच्या आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांचेसह आरोग्य व मनपा प्रशासनाचे अधिकारी
उपस्थित होते.
डॉ.पाटील म्हणाले की, रुग्णांची भेट घेतली
असता रुग्णाला तीनचार दिवस ताप, शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे अशी लक्षणे
आढळून आली आहेत. या आजारावर तातडीने उपचार केल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यामुळे
नागरिकांनी घाबरु नये. याबाबत काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांना संपर्क साधून त्यांच्या
सल्ल्यानुसार तातडीने रक्त चाचणी करावी.
महापालिकेने फवारणी, धूरळणी, डासनिर्मूलनाचे इतर उपाय यांची अंमलबजावणी
अधिक व्यापकपणे करावी. शहरातील ज्या परिसरात असे उपाय अवलंबले जाणार आहेत, त्याचे वेळापत्रक
आधीच माध्यमांतून जाहीर करावे व नागरिकांनीही पालिका प्रशासनाला सहकार्य करावे. पालिकेच्या
सर्व आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांनी आपापल्या क्षेत्राची पाहणी करुन व उपाययोजना
करावी. या कामात कामचुकारपणा करणा-या अधिकारी- कर्मचा-यांवर जबाबदारी निश्चित करुन
कडक कारवाई करावी, असेही निर्देश डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.
या पार्श्वभूमीवर आवश्यक प्लेटलेटस्, रक्त,
औषधे व इतर बाबी उपलब्ध करुन घ्याव्यात. डेंग्यू
निदानासाठी उपयुक्त असलेली एनएस-वन ही स्क्रिनिंग चाचणी व त्यानंतर इलायझा ही कन्फर्मेटिव्ह
चाचणी करावी लागते. ही सुविधा यवतमाळ येथील सेंटीनल सेंटर येथे उपलब्ध आहे. आरोग्य
विभागाने त्याचप्रकारच्या चाचणीच्या किट शासनाकडून मागणी करुन प्राप्त करुन घ्याव्यात.
र्डेंग्यू आजारावर आवश्यक उपायासाठी व चाचणीसाठी लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
डेंग्यू आजारावर पुर्णपणे नियंत्रणासाठी मनपा व आरोग्य विभागाने सर्व प्रतिबंधात्मक
उपाययोजना कराव्यात, असेही आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा