मंगळवार, २८ ऑगस्ट, २०१८


ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान
अभियानातंर्गत निवडलेल्या गावांची कामे प्राधान्याने पूर्ण करा
                                                  -जिल्हाधिकारी अभिजित बांगर
  
अमरावती, दि. 29 : ग्रामीण भागात मूलभूत सोयी-सुविधांच्या उपलब्धतेसह आर्थिक, सामाजिक, शाश्वत विकासासह गावे सक्षम बनविणे हे ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाच्या या महत्वाकांक्षी अभियानातंर्गत गावांमध्ये विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी शासकीय यंत्रणा, मुख्यमंत्री ग्राम परिवर्तक व ग्रामस्थांनी अभियानातंर्गत निवडलेल्या गावांची कामे समन्वयातून प्राधान्याने पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातंर्गत निवडलेल्या गावांमधील कामांचा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, सहा जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहूल कर्डीले, जिल्हा पुनवर्सन अधिकारी श्री. काळे यांचेसह बँकेचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. बांगर म्हणाले, ग्रामीण भागामध्ये मूलभूत सुविधांचे निर्मितीसह गावांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी तेथील ग्रामस्थांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, शेती पुरक व्यवसाय आदींच्या माध्यमातून सक्षम बनविणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे. संबंधित यंत्रणांनी ग्राम परिवर्तन अभियानातंर्गत प्राप्त झालेला निधीचा गावांतील नितांत आवश्यक असलेल्या कामे पूर्ण करण्यासाठी खर्च करावा. ज्या विकास कामांतून निरंतर फायदा मिळू शकतो तसेच ग्रामस्थांना कायमस्वरुपाचा व्यवसाय, रोजगार मिळत असेल अशी कामे प्राधान्याने करावीत. गावातील प्रत्येक विकास काम करतांना प्रथमत: ग्रामसभेची मंजूरात घ्यावी.
तिवसा, धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, अचलपूर या तालुक्यातील निवड झालेल्या गावांमध्ये नियुक्त केलेल्या ग्राम परिवर्तकांनी गावातील प्रत्येक कुंटुंबाला प्रत्यक्षपणे भेटी देऊन त्यांना योजनांची माहिती द्यावी. त्यांचेकडून कागदपत्रे गोळा करुन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. घरामागील अंगनात कुक्कुटपालन एक चांगला व्यवसाय आहे. यासाठी केम व वन विभागाच्या योजनातून लाभ देऊन किमान 100 कोंबडी पक्ष्यांचे लाभार्थ्यास वितरण करावे. या पक्ष्याच्या अंडीच्या विक्रीतून रोजगार मिळेल तसेच अंगणवाड्यांना पुरवठा केल्याने लहान मुलांना पोषण आहार सुध्दा प्राप्त होईल. व्हीएसटीएफ अंतर्गत मिळालेल्या निधीचा पहिला हफ्ता सप्टेंबर अखेर पर्यंत खर्च होईल यादृ्ष्टीने कामांचे नियोजन करावे. डिसेंबर 2018 अखेर पर्यंत मंजूर आराखडयानुसार गावातील सर्व कामे पूर्णत्वास जाईल यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी कशोसीने प्रयत्न करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत दिल्या.
            मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री म्हणाल्या की, जिल्हयातील अभियानातंर्गत निवडलेल्या गावांचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी ग्राम परिवर्तकाची भूमिका महत्वाची आहे. प्रत्येक ग्राम परिवर्तकाने गावातील कुटुंबांना भेटी देऊन योजनाच्या लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे.  अभियानातंर्गत येणारी नियोजित कामे, अडचणी व निधी संदर्भात केम प्रकल्पाचे समन्वयक, जि.प. अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांनी समन्वयातून कामे पूर्ण करावीत.
बैठकीला ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत निवडलेल्या तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्राम परिवर्तक, केम प्रकल्प, कृषी, पशुसंवर्धन आदी  विभागांचे अधिकारी व समन्वयक प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा