कृषी
विभाग व कृषी विज्ञान केंद्रानी
केम व कॉटन कनेक्टशी संलग्न होवून
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
-विभागीय आयुक्त
पियुष सिंह
अमरावती, दि. 14 : कृषी
व औद्योगिक क्रांतीचा कणा समजल्या जाणाऱ्या कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी केम व कॉटन कनेक्टच्या वतीने शेतकऱ्यांना प्रभावी उपाययोजनांची माहिती
देण्यात येते. कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रानी केम व कॉटन कनेक्टला संलग्न होवून
दर्जेदार कापूस निमिर्तीसाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करावे. असे निर्देश
विभागीय आयुक्त श्री पियुष सिंह यांनी कृषी विभागाला दिले. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह
वर्धा जिल्ह्यातील कापूस पिकावर आलेल्या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव व सद्यास्थितीबाबत
श्री पियुष सिंह यांनी नियोजन भवनात आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी
सहसंचालक सुभाष नांगरे, प्रादेशिक संशोधन केंद्राचे विषयतज्ञ डॉ. ठाकरे, पंजाबराव देशमुख
कृषी विद्यापीठाचे किटकशास्त्रज्ञ डॉ. अतुल
कोल्हे, जिल्हा कृषी अधिक्षक इंगळे, कॉटन कनेक्टचे संचालक हरदिप देसाई, कॉटन कनेक्टचे
केंद्रसंचालक सेल्वन लॉयड उपस्थित होते.
गुलाबी बोंड अळीला कापुस पिकाचा शत्रु समजले जाते. साठ ते शंभर
टक्क्यांपर्यंतचे पीक या अळीच्या प्रादुभार्वाने नष्ट होवू शकते. यातून दिलासा देण्यासाठी
केम व कॉटन कनेक्टच्या वतीने सर्वेक्षण व रोगनिवारणाबाबत अंमलबजावणी करण्यात येते.
सद्यास्थितीत 1203 गावांचा या उपक्रमात सहभाग असून दिड लाख शेतकरी या उपाययोजनांचा
लाभ घेत आहे. नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्याचाही यात समावेश आहे. विभागातील दिड लाख
शेतकऱ्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ व्हावा बोंड अळीच्या समस्येने ग्रस्त
सर्व शेतकऱ्यांपर्यंत या उपाययोजना तत्काळ पोहोचवाव्या अश्या सुचना श्री सिंह यांनी
कृषी विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या.कापूस पिकाचे निरिक्षण करुन सतर्कतेने योग्यवेळी
योग्य किटकनाशकांची प्रमाणशीर फवारणी करणे अत्यंत महत्वाचे असून सेंद्रीय किटकनाशके
देखील प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले.
केम व कॉटन कनेक्टचे 350 अधिकारी सर्वेक्षणाच्या माध्यमातून
शेतकऱ्यांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचतात. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व कापसाचे पीक
बोंडअळीच्या प्रादुर्भावातून मुक्त ठेवावे असे श्री सिंह यांनी सांगीतले. क्षेत्र सर्वेक्षण
करणाऱ्या उपस्थितांना यावेळी केम व कॉटन कनेक्ट राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती यावेळी
श्री. देसाई यांनी दिली. यावेळी पिकांच्या फेरपालटाच्या नियोजनाबाबत, पूर्व हंगामी
कापूस पीक घेतेवेळी दक्षता, कृषी विभागाची
क्रॉपसॅप योजना, पिकांचे निरिक्षणे, कीड व त्यावर उपायाबाबत मार्गदर्शन सुभाष नागरे
यांनी केले. बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक,
प्रादेशिक संशोधन केंद्राचे विषयतज्ञ, केम व कॉटन कनेक्टचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी
उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा