विभागातील सिंचन प्रकल्प तातडीने पुर्ण करावेत
-डॉ.
सुनील देशमुख
*पाटबंधारे महामंडळाची आढावा बैठक
*भूसंपादन, पुनर्वसनाबाबत सूचना
अमरावती, दि. 16 : संरक्षित सिंचनाची
व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर मर्यादा येत आहेत. यावर प्रभावी
उपाय म्हणून शाश्वत सिंचनाच्या सुविधांच्या उपलब्धतेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून
सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निधीचा
विनियोग प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करावा आणि भुसंपादन, पुनर्वसनाची कामे नियोजनबद्ध
पध्दतीने विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, असे निर्देश विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे
उपाध्यक्ष डॉ. सुनील देशमुख यांनी आज दिले.
विभागीय
आयुक्त कार्यालयात विभागातील सिंचन अनुशेष, अनुशेषाव्यतिरिक्त प्रकल्पाचे भूसंपादन
आणि पुनर्वसनबाबत आयोजित आढावा बैठकीत ते आज बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियूष
सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, पुनर्वसन
उपायुक्त प्रमोद देशमुख आदी उपस्थित होते.
श्री.
देशमुख म्हणाले, अमरावती विभागात एकूण 108 सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात येत
आहेत. या प्रकल्पासाठी संपादीत होणाऱ्या 22 हजार 175 हेक्टर जमिनीपैकी 9 हजार 894 हेक्टर
जमिनीचे संपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादनाचे कार्य संयुक्त मोजणीद्वारे संबंधीत शासकीय
यंत्रणेनी समन्वयातून करावे. जमिनीच्या मोबदल्यासह प्रकल्पबाधित नागरिकांचे पुनर्वसन
आणि पुनर्वसित ठिकाणी नागरी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी.
प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला देऊन
त्यांचे पर्यायी जागेवर किंवा गावठाण जमिनीवर पुनर्वसन करावे. पुनर्वसित क्षेत्रात
पिण्याचे पाणी, विद्युतीकरणाची कामे, वाहतुकीसाठी रस्ते आदी मुलभूत सुविधा तातडीने
पुरवाव्यात. प्रकल्पांच्या कामांबाबतचा तक्ता तयार करुन महामंडळास सादर करावा, तसेच
ज्याठिकाणी पाणीसाठा निर्माण झाला आहे, त्याठिकाणी बंद पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यासाठी
नियोजन करावे. बैठकीत चर्चा केलेल्या प्रकल्पांची कामे उत्कृष्ठ नियोजनातून पूर्ण करावीत,
असेही डॉ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
आढावा बैठकीला विभागातील सार्वजनिक
बांधकाम विभाग, भूसंपादन अधिकारी, भुमी अभिलेख, नगररचना, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी
उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा