अर्जित ज्ञानाचा उपयोग
राष्ट्र विकासासाठी करा
-पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ
अमरावती, दि. 24 : अभियांत्रिकी क्षेत्रामुळे ज्याने देशाच्या
सर्वांगीण विकासाला एक नवा आयाम मिळू शकतो. अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाच्या
माध्यमातून देश सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहून उच्चांक गाठू शकतो. हे ध्येय समोर
ठेवून अभियांत्रिकी पदवीधर विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग
राष्ट्र विकासासाठी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून करावा, असे उत्साहवर्धक आवाहन
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज पदवी प्रदान समारंभात केले.
विदर्भ महाविद्यालयाच्या परिसरातील संगीतसूर्य केशवराव भोसले
सभागृहात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा नववा पदवी प्रदान समारंभाचे आयोजन
करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी संत
गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर, प्रसिध्द उद्योजक
तथा व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, सहसंचालक डॉ. डी.व्ही. जाधव, नागपूर विद्यापीठाचे माजी
कुलगुरु डॉ. सपकाळ, प्राचार्य डॉ. आर. एस. दाळू, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रा. मो.
झुहेर, कुणाल टिकले, डॉ. अनंत धात्रक, परीक्षा नियंत्रक प्रा. वसंत जपे यांचेसह महाविद्यालयाचे
फॅकल्टी प्रमुख आदी उपस्थित होते.
श्री. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत असतांना
नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून समाजाच्या दैनंदिन उपयोगात येणाऱ्या यंत्रसामुग्री
निर्माण करावी. शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या
माध्यमातून उपकरणे तयार करावी. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वत:चे व्यक्तीमत्व ओळखून
आत्मसात केलेल्या ज्ञानाचा उपयोग करुन थोर शास्त्रज्ञ तथा माजी राष्ट्रपती स्व.
एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील देश निर्माण करण्यासाठी हातभार लावावा.
पदवीधरांनी केवळ भक्कम पगाराच्या नोकरीचे ध्येय न ठेवता सामाजिक बांधिलकी म्हणून
बेरोजगारांना रोजगार मिळवून देता येईल, असा व्यवसाय उभारण्याचे प्रयत्न करावे, असे
आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्राविण्यप्राप्त व उत्तीर्ण झालेल्या
विद्यार्थ्यांचा त्यांनी गौरव करुन शुभेच्छा दिल्या.
श्री. चांदेकर म्हणाले की, अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगतीमुळेच
देशाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो आणि अभियंते हे देशाच्या विकासात पाठीच्या
कण्यासारखे काम करणारे तंत्र आहे. विद्यार्थ्यांनी त्यांनी अर्जित केलेल्या पदवीचा
उपयोग समाजहितासाठी कसा होईल, यावर लक्ष केंद्रीत करावे. एका राष्ट्रीय सर्वेक्षणात असे
आढळून आले आहे की, अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी फक्त 30 टक्के विद्यार्थ्यांना
आवडीच्या क्षेत्रात नोकरी मिळते तर 70 टक्के विद्यार्थी हे अभियांत्रिकी क्षेत्र सोडून
इतर क्षेत्राकडे वळतात. विद्यार्थ्यांनी असे न करता नवीन शाखांमध्ये संशोधन करुन आपले
देशाच्या भवितव्य घडविण्यासाठी सहकार्य करावे.
श्री. जाधव म्हणाले की, सन 1770 दशकात वाफेच्या इंजीन शोधापासून अभियांत्रिकी
क्षेत्रात अनेक स्थित्येंतरे आली आहेत आणि अनेक संशोधनातून अत्याधुनिक यंत्र-उपकरणांचा
शोध लागला आहे. कृषी क्षेत्रात यंत्रसामुग्रीचा शोध, वीजेचा शोध व त्याचा कारखान्यांमध्ये
साहित्य निर्मितीसाठी उपयोग, इंटरनेटचा शोध आदी शोध मनुष्याच्या उत्क्रांतीसाठी हितकारक
ठरली आहेत. औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळाचा कमी उपयोग करुन यांत्रिकीकरणामुळे साहित्य
निर्मितीमध्ये व पर्यायाने आर्थिक विकासाला चालना मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे
वळून किंवा यापुढील पदवीत्तर शिक्षण घेतांना समाजोपयोगी संशोधनाला महत्व द्यावे, असे
आवाहन त्यांनी यावेळी केले.
सुवर्ण पदकांचे मानकरी :
समारंभात प्रथमेश घोशीकर (स्थापत्य अभियांत्रिकी), हर्षल पाटील (यंत्र
अभियांत्रिकी), दत्ता गाडेकर (विद्युत अभियांत्रिकी), एकता पांडे (अणुविद्युत अभि.),
कस्तुरी वर्मा (संगणक विज्ञान अभि.), शुभम पटेल (माहिती तंत्रज्ञान अभि.), पूर्वा आवारे
(उपकरणीकरण अभि.) या सात विद्यार्थ्यांना त्यांच्या विद्याशाखेमध्ये प्रथम क्रमांकासाठी
सुवर्ण पदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
तसेच विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण 470 बी. टेक आणि 99
एम. टेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे व गुणपत्रके प्रदान करण्यात आली.
प्राचार्य डॉ. आर.एस. दाळू यांनी महाविद्यालयाची स्थापना, फॅकल्टीज,
प्राध्यापक, अभ्यासक्रमाविषयी प्रास्ताविकातून माहिती दिली. शैक्षणिक अधिष्ठात डॉ.
अनंत धात्रक व प्रा. शुभदा ठाकरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. समारंभाला महाविद्यालयाचे
सर्व शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा