वृत्त क्र. 1 90 दिनांक- 27 डिसेंबर 2018
‘शिवाजी’च्या सर्व संस्थांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प
-ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
अमरावती, दि. 27 : ऊर्जेचा नवीन पर्याय म्हणून सौर ऊर्जेकडे पाहिजे जात आहे. प्रामुख्याने मोठ्या असलेल्या संस्थांना विजेचे देयके आणि त्यावरील कर यामुळे लाखांच्या घरात देयके येत आहे. त्यामुळे शिवाजी शिक्षण संस्थेने जागा उपलब्ध केल्यास करार करून सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येईल. यातून सर्व संस्था विजेवरील खर्चातून मुक्त होईल, असे प्रतिपादन ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आज येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 120व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार सुनील देशमुख, खासदार आनंदराव अडसूळ, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आदी उपस्थित होते.
श्री. बावनकुळे म्हणाले, मोठ्या शैक्षणिक संस्थांना विजेचे देयक मोठ्या रक्कमेचे येतात. त्यामुळे सर्व संस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास त्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारता येऊ शकतो. यासाठी संस्थेने 50 टक्के रक्कम आणि जागा उपलब्ध करून दिल्यास शासनातर्फे प्रयत्न करून येत्या तीन महिन्यात सर्व संस्थांनी वीज देयकांमधून सुटका होऊ शकते. स्वच्छ उर्जेच्या या पर्यायावर राज्य शासन चांगले काम करीत आहे. साडेचार हजार कोटी खर्च करून सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील दोन लाखाहून अधिक प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सुमारे साडेचार हजार कोटी रूपये खर्चून अत्यंत अल्प दरात वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकट्या अमरावती जिल्ह्यात 78 कोटींची सौरऊर्जेची कामे येत्या काळात करण्यात येतील. या माध्यमातून डॉ. पंजाबराव देशमुख यांनी पाहिलेले हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल.
श्री. पोटे-पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न देण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी तळागाळातील नागरिकांना शिक्षणाची संधी निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांच्या कार्याचा गौरव होणे आवश्यक आहे. या जनभावनेचा आदर करीत ही मागणी वरीष्ठ पातळीवर पोहोचविण्याची विनंती केली.
श्री. अडसूळ यांनी शिक्षणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना घेऊन डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षण संस्थांचे जाळे विणले. कृषी क्षेत्राला लाभ व्हावा, यासाठी कृषी महाविद्यालय उभे केले. या कार्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी स्पर्धा परिक्षा आणि कौशल्य विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या अनंत पंजाबराव देशमुख अकादमीचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम रेणूका मोरे, द्वितीय शिवगंगा सुरणकर, तृतीय सुवर्णा हिवाळे तर प्रजासत्ताक दिनानिमित्त एनसीसी पथसंचलनात सहभागी झालेला तुषार हूड यांचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते दैनंदिनी 2019, शिवसंस्था त्रैमासिक, सुर्यावर वादळे उठतात सीडीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शितल मेटकर यांच्या चमूने ओडीसी नृत्यू सादर केले.
यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांचे भाषण झाले. कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, डॉ. रामचंद्र शेळके ॲड. गजानन फुंडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी सर्व मान्यवरांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले.
वृत्त क्र. 191 दिनांक- 27 डिसेंबर 2018
सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी
-ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
* जिल्हाधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद
अमरावती, दि. 27 : राज्याने दोन हजार मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतला आहे. प्रकल्प उभारण्यासाठी प्रत्येक गावाने जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्याच्या पातळीवर थेट सरपंचांशी संवाद साधून सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयातून ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ. अनिल बोंडे, विभागीय आयुक्त पियूष सिंह आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सौर वाहिनीचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ज्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, त्या प्रमाणात हस्तांतरीत करण्यात याव्यात. सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा करणे शक्य होईल. तसेच गावातील प्रकल्प असलेल्या पाणी पुरवठा, सार्वजनिक दिवाबत्तीसाठीही अत्यल्प किंवा मोफत वीज देता येऊ शकेल.
एका ग्रामपंचायतीमध्ये किमान दोन मेगावॅटचा प्रकल्प व्हावा, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी सरपंचांची कार्यशाळा, बैठक घेऊन त्यांना सौर ऊर्जा प्रकल्पांना जागा उपलब्ध करून दिल्यास गावाच्या सार्वजनिक सोयींनाही सवलतीच्या दरात वीज उपलब्ध होणार असल्याचे सांगितल्यास त्यांचा यामध्ये सहभाग वाढण्यास मदत होईल. जागा उपलब्ध होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रयत्न करण्याच्या सुचना श्री. बावनकुळे यांनी दिल्या.
यवतमाळ जिल्ह्यात 146 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरीत जागा हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यात 46 एकर जागा दिलेली असून जागा उपलब्ध होण्यासाठी तालुकास्तरावर प्रयत्न करण्यात येतील. तसेच गावामध्ये जागा शोधण्याची मोहिम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा